Om rajeNimabalkar  Sarkarnama
मराठवाडा

Om Rajenimbalkar : ठाकरेंवर टीका करणार नाही, पण...; एकनाथ शिंदेंसोबत जाण्याच्या चर्चांवर ओम राजेनिंबाळकरांचे मोठे वक्तव्य

Opration tiger News : धक्कादायक निकालानंतर पवन राजेनिंबाळकर यांचे पुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली.

Sudesh Mitkar

Pune News : महाराष्ट्र राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्या खटल्याचा शनिवारी अखेर निकाल लागला. न्यायालयाने पुराव्या अभावी या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या धक्कादायक निकालानंतर पवन राजेनिंबाळकर यांचे पुत्र आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली.

कोर्टाच्या या निकालानंतर आता माझ्या वडिलांची हत्या नक्की कोणी केली? असा आर्त सवाल त्यांनी उपस्थित केला असून, पुढील न्याय्य हक्कासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, याच वेळी त्यांनी आपल्या आगामी राजकीय प्रवासाबाबत आणि शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाच्या चर्चांवर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले असून पुढील दोन दिवसांत ते आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.

पवन राजेनिंबाळकर हत्या खटल्याच्या निकालावर पुण्यात बोलताना ओम राजेनिंबाळकर म्हणाले, 'सुरुवातीला राज्य सरकारच्या पोलिसांनी या प्रकरणाचा जो तपास केला, त्यामध्ये प्रचंड त्रुटी होत्या हे आता स्पष्ट झाले आहे. आम्ही सातत्याने मागणी केल्यानंतर या केसचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला, मात्र तोपर्यंत तब्बल तीन वर्षांचा मोठा कालावधी निघून गेला होता.

सीबीआयने त्यांच्या बाजूने चांगला तपास केला होता. पण आज लागलेला निकाल पाहता, जर सगळेच आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटत असतील, तर मग पवनराजे निंबाळकर यांना मारले कोणी? हा मोठा प्रश्न आज माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासमोर उभा राहिला आहे. समाजातील चांगल्या माणसाला कायम निराशाच पदरात पाडावी लागते का, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

वडिलांच्या हत्येचा निकाल लागला असला तरी यावरून हत्या नेमकी कोणी केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. आम्ही गेल्या 20 वर्षांपासून या निकालाची वाट पाहत होतो, वडिलांची अशी निर्घृण हत्या झाल्यावर एका मुलाला आणि कुटुंबाला काय वाटलं असेल याची कल्पना न केलेली बरी. दोषींना कडक शिक्षा व्हावी हीच माझी शासनाकडून अपेक्षा आहे आणि आता हा निकाल सविस्तर वाचल्यानंतर आम्ही या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे ओमराजे यांनी सांगितले.

सध्या राजकीय वर्तुळात ओम राजेनिंबाळकर यांच्या पक्षांतराच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. याबाबत बोलताना राजेनिंबाळकर म्हणाले, 'माझा आगामी राजकीय निर्णय काहीही असला, तरी मी उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्याबद्दल कधीच काही वाईट बोललो नाही आणि भविष्यातही त्यांच्यावर कधीही कसलीही टीका-टिपणी करणार नाही.

2022 मध्ये जेव्हा शिवसेना फुटली, तेव्हाच मला इतर नेत्यांप्रमाणे जाता आले असते, मग मी तेव्हा गेलो नाही आणि आताच का जातोय? असा आरोप माझ्यावर केला जात आहे. मी माझी पुढील राजकीय भूमिका काय असणार आहे, याबाबत माझ्या मतदारसंघातील जनतेशी सविस्तर चर्चा करणार आहे. जनतेशी चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच मी माझा अंतिम राजकीय निर्णय पुढील दोन दिवसांत स्पष्ट करेन असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT