Ajit Pawar, Rajesh Vitekar Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha : राजेश विटेकरांसाठी जोर लावणाऱ्या अजितदादांना परभणीत माघार घ्यावी लागणार ?

Prasad Shivaji Joshi

Parbhani Loksabha Constitency : महाराष्ट्राच्या सत्तेत अचानक एन्ट्री घेऊन महत्वाची मंत्रीपदे पदरात पाडून घेत 'दादा' ठरलेल्या अजित पवारांना महायुती म्हणून काही तडजोडीही कराव्या लागत आहेत. लोकसभा निवडणुकीचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते, अशावेळी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचे जागावाटप अंतिम टप्यात आले आहे. अनेक मतदारसंघात फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यामुळे एखाद्या मतदारसंघावर सांगितलेला दावाही महायुतीतल्या तीन्ही पक्षांना सोडावा लागणार आहे. मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी अजित पवार आग्रही आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या राजेश विटेकरांना येथून उमेदवारी मिळावी, यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत.

शिवसेना शिंदे गटानेही या जागेवर दावा सांगितला, पण त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने ही जागा भाजप लढण्याची अधिक शक्यता आहे. जिंतूरच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांचे नाव यासाठी आघाडीवर आहे. राजेश विटेकर हे अजित पवारांचे खंदेसमर्थक आणि लाडके म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळावी असा त्यांचा आग्रह होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण भाजपने या मतदारसंघात सुरू केलेली तयारी पाहता अजित पवार यांना परभणीतून माघार घ्यावी लागणार असे दिसते. एवढेच नाही तर मनावर दगड ठेवून महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पुर्ण ताकदही लावावी लागणार आहे. राज्यात शिवसेना - भाजप युती असताना परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असायचा. शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती दौऱ्यात परभणीची सभा ठरलेली असायची.

बाळासाहेबांनी दिलेल्या उमेदवाराला मतदारसंघातील जनतेने नेहमीच विजयी केले. विद्यमान खासदार संजय जाधव यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ दिली. त्यामुळे महाविकास आघाडीचे तेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे. यावेळी तिसऱ्यांदा ते नशीब आजमावणार आहेत.

आजपर्यंत शिवसेनेकडे असलेली ही जागा लढवण्याची संधी असल्याने भाजपने पूर्ण तयारी केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीनंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजेश विटेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ दिली. परभणीत राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे, अजित पवारांचेही सातत्याने या जिल्ह्यावर बारीक लक्ष राहिले आहे.

लोकसभा निवडणुकीत परभणीतून लढण्याच्या विचारातूनच अजित पवारांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांची नियुक्ती केली. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला झुकते माप देत फिल्डिंग लावली. पण आता हे सगळं वाया जाणार की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महायुतीच्या जागावाटपात ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाचे उमेदवार उभे करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील पक्षाच्या अधिवेशनात सांगितले होते. या पार्श्वभूमीवर परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र महायुतीच्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटात कुठलीही हालचाल दिसून आली नाही.

त्या तूलनेत भाजपने मात्र बूथ स्तरावरील आढावा बैठका, कार्यकर्त्यांचे मेळावे घेत तयारीला वेग दिला आहे. पक्षाने नुकतेच गाव चलो अभियानही सुरू केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील शांतता आणि भारतीय जनता पक्षातील आक्रमक प्रचारयंत्रणा बघता राजेश विटेकर यांच्यासाठी जोर लावणाऱ्या अजितदादांना परभणीत माघार घ्यावी, लागणार असे दिसते.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT