Eknath Shinde-Abdul Sattar  Sarkarnama
मराठवाडा

Cabinet expansion news : 'मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे', म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांनाच शिंदेंनी बदलले?

The power to change the Chief Minister was given to Abdul Sattar by the statement. : 'मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो तर हे किडे मकोडे माझे काय बिघडवणार'? असा दावा अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना उद्देशून केला होता.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील (Cabinet expansion) मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत आहे. या मंत्रिमंडळात शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातून कोणाची वर्णी लागणार? याच्या याद्या आता समोर येऊ लागल्या आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांनी मंत्रिमंडळात अनेक बदल केले असून जुन्या चेहऱ्यांऐवजी नव्या आमदारांना संधी देण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. शिवसेना शिंदे गटातून मराठवाड्यातील माजीमंत्री अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना डच्चू देण्यात आल्याचे समजते.

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे कायम वादग्रस्त राहिलेले नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा सिल्लोड-सोयगाव मतदार संघातून अवघ्या 2420 मतांनी त्यांचा विजय झाला. त्यांच्या या विजयावरही विरोधकांनी संशय घेत न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालवली आहे. याशिवाय गेल्या महिनाभरात अब्दुल सत्तार यांच्याशी संबंधित अनेक जुनी न्यायालयीन प्रकरणे नव्याने समोर आली.

याशिवाय कायम वरिष्ठ नेत्यांबद्दल चुकीची विधाने करणे, आपले राजकीय वर्चस्व आणि अस्तित्व दाखवण्यासाठी पक्षातील नेत्यांना कमी लेखणे असे प्रकार सत्तार यांच्याकडून वारंवार घडत गेले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानअसेच एक वादग्रस्त विधान अब्दुल सत्तार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत केले होते. भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी असलेल्या वादातून अब्दुल सत्तार यांनी हे विधान केले असले तरी यातून त्यांनी एकनाथ शिंदे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता.

उद्दाम भाषा मारक..

'मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो तर हे किडे मकोडे माझे काय बिघडवणार'? असा दावा अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना उद्देशून केला होता. त्यांचे हे विधान शिवसेनेतील त्यांच्या हितचिंतकांनी व्यवस्थितपणे एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवले. सत्तार यांची ही उद्दाम भाषा शिंदे यांनाही बहुदा खटकली. मुख्यमंत्री बदलण्याची ताकद असल्याचे सांगणाऱ्या अब्दुल सत्तार यांनाच शिंदे यांनी नव्या मंत्रिमंडळातून बदलण्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्येही अब्दुल सत्तार यांच्या वाचाळपणाची अनेक उदाहरणे समोर आली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री असतांना सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सळे यांच्या विरोधात आपल्या मतदारसंघात केलेल्या वादग्रस्त विधानाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील गायरान जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या आरोपातून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अब्दुल सत्तार यांची खरडपट्टी केली होती. टीईटी घोटाळ्यात कुटुंबातील सदस्यांचीच नावे आल्याने अब्दुल सत्तार तेव्हाही अडचणीत सापडले होते. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांना अभय दिले. उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केले होते.

शिंदेंचे विश्वासू अशी होती ओळख..

तर एकनाथ शिंदे यांच्य नेतृत्वात झालेल्या बंडात अब्दुल सत्तार यांनी उडी घेत आपल्या स्वार्थाच्या राजकारणाचे दर्शन तेव्हा घडवले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये अनपेक्षित पणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आधी राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांची थेट कॅबिनेट पदी वर्णी लागली. अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे आपल्या मतदारसंघात जंगी स्वागत केले होते. या स्वागताने भारावलेल्या शिंदे यांचे सत्तार तेव्हापासूनच विश्वासू झाले होते.

मंत्रीपदासह सिल्लोड-सोयगाव मतदार संघासाठी एकनाथ शिंदे यांनी जणू तिजोरीच उघडी करून दिली होती, अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक प्रकल्प सिंचनाच्या योजना आणि कोट्यावधींचा निधी सत्तार यांना मिळाला. मात्र महत्त्वाकांक्षी सत्तार यांचे एवढ्यानेही समाधान झाले नाही. लोकसभेच्या जालना मतदारसंघात महायुतीचे रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर सिल्लोड- सोयगाव तालुक्यातील राजकारण पूर्णपणे बदलले. रावसाहेब दानवे यांना विरोध करताना अब्दुल सत्तार यांनी महायुतीलाच वेठीस धरल्याचा प्रकारही घडला.

माझ्या विरोधात काम केले तर मी ही भाजपाच्या विरोधात उमेदवार उभे करीन, अशी जाहीर धमकीच अब्दुल सत्तार यांनी दिली होती. या सगळ्याचा परिणाम 'मी एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार', असा दावा करणाऱ्या सत्तारांचा विजय अवघ्या 2420 मतांनी होण्यात झाला. एकूणच महाविकास आघाडीतील अडीच वर्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील दोन वर्ष, असा साडेचार वर्षांचा अब्दुल सत्तार यांचा राजकीय प्रवास वादग्रस्त ठरला.

आता महायुती सरकारची कमान देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असणार आहे. त्यामुळे माझ्या मंत्रिमंडळात वादग्रस्त, वाचाळवीर आणि गोपनीयता न पाळणाऱ्या मंत्र्यांना स्थान नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील वादग्रस्त चेहऱ्यांना डावलण्यात आल्याचे चित्र आहे. या यादीत अब्दुल सत्तार यांचा अगदी वरचा क्रमांक असल्याचे दिसून आले आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अब्दुल सत्तार पाण्याविना मासा जसा तडफडतो तसे तडफणार एवढे मात्र निश्चित. तूर्तास सत्तार यांच्यासमोर इतर कुठला पर्याय नसल्यामुळे ते योग्य संधीची वाट पाहतील आणि आपल्याला साजेसे असे राजकारण भविष्यात करतील, असे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT