छत्रपती संभाजीनगर : राजकारणात महत्वकांक्षा नाही असा एकही नेता सापडणार नाही. अगदी आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी कितीही स्पर्धा करावी लागली, भांडावे लागले तरी मागे न हटणारे अनेकजण आपण पाहतो. पण तीस-पस्तीस वर्ष राजकारणात असूनही कधी ना खंत, ना अपेक्षा, ना नाराजी असा नेता शोधून सापडणे अशक्यच. पण औरंगाबा मध्य मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना (Pradip Jaiswal) आमदार प्रदीप जैस्वाल मात्र याला अपवाद ठरतात.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर बहुमताने आलेले महायुतीचे सरकार व त्यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. सत्ताधारी (Shivsena) शिवसेना-राष्ट्रवादी-भाजप या तीनही पक्षातील आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश करताना बरीच कसरत करावी लागली. त्यानंतरही डावलले गेल्यामुळे तीनही पक्षातील अनेक इच्छुक आणि माजी मंत्र्यांचे नाराजी नाट्य घडलेच.
विशेषतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत ही नाराजी जास्त प्रमाणात दिसून आली होती. या सगळ्या नाराजी नाट्यापासून लांब असलेले औरंगाबाद मध्यचे विद्यमान शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल लांबच होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या, नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार पदावर काम करण्याची संधी प्रदीप जैस्वाल यांना मिळाली. गेल्या 36 वर्षापासून राजकारणात असलेल्या प्रदीप जैस्वाल यांना पक्षाकडे एखादी जबादारी, मोठे पद किंवा नाही कॅबिनेट तर राज्यमंत्री पद मागण्याची संधी होती.
पण जैस्वाल यांनी स्वतःहून पक्षाकडे कधी या पैकी काही मागितले नाही. पक्षाने अगदीच त्यांची झोळी रिकामी ठेवली असेही नाही, पण एखाद्या पक्षात निष्ठेने 35-40 वर्ष काम करणाऱ्या नेत्याला अपेक्षीही असतेच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकाळापासून पक्षात काम करणारे प्रदीप जैस्वाल यांच्या समाजाची जिल्ह्यात अत्यंत कमी संख्या आहे. महापालिकेच्या एखाद्या वार्डातून समाजाच्या मतावर निवडून यावे इतकीही मते जैस्वाल यांच्या समाजाची शहरात नाही.
तरीही शिवसेनेने त्यांना नगरसेवक, महापौर, एकदा खासदार, आमदार केले. जैस्वाल यांना याची जाणीव असून अनेकदा त्यांनी याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांचे आभारही मानले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला महापौर, आमदार, खासदार होता आले, याचा अभिमान आणि आनंद जैस्वाल व्यक्त करतात. सर्वजाती धर्मामध्ये वजन असलेल्या प्रदीप जैस्वाल यांनी 2009 मध्ये पक्षाने ऐनवेळी उमेदवारी कापल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत बंड केले होते.
पण यानंतरही ते निवडून आले आणि त्यांनी पक्षाचा निर्णय कसा चुकला हे दाखवून दिले होते. हाडाचा शिवसैनिक असल्यामुळे अवघ्या वर्षभरात प्रदीप जैस्वाल पुन्हा स्वगृही परतले. 2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली आणि भाजपच्या तनवाणींच्या उमेदवारीमुळे जैस्वाल पराभूत झाले. त्यानंतर 2019 आणि 2024 मध्ये जैस्वाल सलग दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडामध्ये प्रदीप जैस्वाल यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली.
राजकीय अपरिहार्यता किंवा भविष्याची पावले ओळखत जैस्वाल यांनी त्यावेळी हा निर्णय घेतला असला तरी मातोश्री व ठाकरे कुटुंबियांवर आपण टीका करणार नाही, असा निर्धार जैस्वाल यांनी केला. राज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादामुळे शिवसेनेत मोठे झालेले अनेक नेते उद्धव ठाकरेंवर थेट टीका करत होते. पण प्रदीप जैस्वाल यांनी शिवसेनेतील बंड झाल्यापासून आजतागायत ठाकरे किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल एक अवक्षारही काढले नाही.
अडीच वर्षाने तरी संधी मिळेल का?
शांत स्वभाव असल्यामुळे पक्षाने दिले त्यात समाधान मानणारा हा नेता कधी मंत्रीपदाच्या शर्यतीत धावलाच नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारमध्ये बाहेरच्या पक्षातून आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळाले, पण जैस्वाल यांनी दावा केला नाही, की त्यांच्या नावाचा पक्षाच्या नेतृत्वाने विचार केला नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही जैस्वाल यांच्या वाट्याला एकप्रकारे उपेक्षाच आली अस म्हणावे लागेल.
तसे पाहिले तर संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांचा शिवसेनेतील राजकीय प्रवास सारखाच. पण खैरे, भुमरे, शिरसाट यांना शिवसेनेत भरभरून मिळाले. पण प्रदीप जैस्वाल मात्र या स्पर्धेत कधीच नव्हते. जे मिळाले त्यात समाधान मानत त्यांचे राजकारण सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेला जिल्ह्यात एक मंत्रीपद मिळाले. त्यावर संजय शिरसाट यांची वर्णी लागली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांनापासून शिरसाट यांचा मंत्रीपदावर दावा होता, पण एका जिल्ह्यात शिवसेनेचे भुमरे-सत्तार हे दोन मंत्री दिल्यामुळे शिरसाट यांना थांबावे लागले. त्यामुळे आता मंत्रीपदासाठी पहिले प्राधान्य शिंदेंनी त्यांनाच दिले. जैस्वाल यांचा विचार यावेळीही झाला नाही. अडीच वर्षानंतर तरी जैस्वाल यांच्या या शांत, संयमी आणि कोणाताही हट्ट पक्षाकडे न धरण्याच्या गुणांचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.