Rahul Sonvane,Uddhav thackeray Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : आधी नगरसेवक होईन, मगच लग्न; उद्धव ठाकरेंचा शिलेदाराला फोन, आता चांगली मुलगी बघ!

Rahul Sonawane vow News : राजकारणात यशस्वी होण्यासाठी जिद्दीला पेटलेला कार्यकर्ता काय करू शकतो? याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : राजकारणात यशस्वी होण्यासाठी जिद्दीला पेटलेला कार्यकर्ता काय करू शकतो? याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात. कोणी आपला नेता आमदार, खासदार मंत्री व्हावा म्हणून दाढी राखतो, डोक्यावरचे केस वाढवतो, पायात चप्पल न घालता फिरतो. नेत्यांवरील प्रेमापोटी केलेला हा प्रण कधी कधी वर्षानुवर्षे पूर्ण होत नाही. तर काहीचे नशीब लगेच खुलते.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत शहरातील प्रभाग क्रमांक सात ब मधून शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शाखाप्रमुख असलेल्या राहुल मधुकर सोनवणे या शिवसैनिकाने असाच प्रण केला होता. जोपर्यंत नगरसेवक होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. उमेदवारीसाठी बराच संघर्ष करावा लागला, पण उशीरा का होईना संधी मिळाली. पण प्रभागातील वार्ड महिला राखीव झाल्याने राहुल सोनवणे यांना स्वतःऐवजी आई सुनिला यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवावे लागले.

प्रामाणिक, लोकांच्या मदतीला धावून जाण्यामुळे राहुल सोनवणे यांच्या मातोश्री निवडून आल्या. निवडणूक लढवणे सोपी नाही, त्यासाठी पैसे लागतात. पण नगरसेवक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून कष्ट करणाऱ्या राहुल सोनवणे यांनी स्वतःला नगरसेवक होता आले नाही, तरी आईसाठी रात्रंदिवस एक केला. वार्डातील लोकांच्या घरोघरी जाऊन केलेल्या आणि भविष्यात करणार असलेल्या कामांची माहिती दिली.

मतदारांनीही राहुल आणि त्यांच्या आईवर विश्वास ठेवला. निवडणूक खर्चासाठी राहुल सोनवणे यांनी स्वतः राहते घर विकून पैसा उभा केला. पण आईला नगरसेवक केलेच. आई नगरसेवक झाल्यानंतर राहुल सोनवणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. पण स्वतः नगरसेवक झाल्यानंतरच लग्न करण्याच्या वचनाचे काय? असा प्रश्न निर्माण झाला.

राहुल सोनवणे यांच्या या वचनाबद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना सांगितले. यावर त्यांनी राहुल सोनवणे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. दानवे यांनी फोन लावून राहुल सोनवणे यांना आधी लग्नासाठी मुलगी बघितली का? असा प्रश्न विचारला आणि उद्धव साहबे तुझ्याशी बोलणार आहेत, म्हणत त्यांच्याकडे फोन दिला.

चांगली मुलगी बघ, सुखाचा संसार कर..

उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम आई नगरसेविका झाल्याबद्दल राहुल सोनवणे यांचे अभिनंदन केले. त्यानंतर आता तरी चांगली मुलगी बघितली की नाही? असा मिश्किल प्रश्न केला. यावर काहीसे लाजतच 'नाही साहेब, खैरे साहेब माझ्यासाठी चांगली मुलगी शोधत आहे. ती मिळाली की लग्न करतो' असे म्हणत उत्तर दिले. चांगल काम करा, आईलाही माझ्या शुभेच्छा सांगा. एकदा भेटा, मी संभाजीनगरला आलो तर तिथे भेटू किंवा तुम्ही मुंबईला आलात, तर नक्की भेटू म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदनही केले.

उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून आस्थेवाईकपणे चौकशी केल्यामुळे राहुल सोनवणे भारावून गेले होते. एखादा कुटुंब प्रमुख जशी चौकशी करतो, त्याच आपुलकीने उद्धव साहेब माझ्याशी बोलले. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी माझ्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला फोन केला, यावरूनच ते आपल्या कार्यकर्त्यांची किती काळजी घेतात हे स्पष्ट झाल्याचे राहुल सोनवणे यांनी सांगत समाधान व्यक्त केले.

ठाकरे गटाचे शाखाप्रमुख राहुल सोनवणेंना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोन आलेला. नगरसेवक होईपर्यंत लग्न करणार नाही असा पण राहुल सोनवणेंनी केला होता. यंदा प्रभाग महिलांसाठी आरक्षित असल्याने सोनवणेंनी आईला निवडणुकीत उभं केलं. स्वतःचं घर विकून राहुल सोनवणेंनी महानगरपालिकेची निवडणूक लढवली आणि जिंकली. सोनवणेंच्या संघर्षाची माहिती कळताच स्वतः ठाकरेंनी फोन करून त्यांची विचारपूस केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT