योगेश पायघन
Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मराठवाडा सचिव राहिलेले चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक अशोक पटवर्धन यांना पक्ष सोडल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतही हेच पद देण्यात आले आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्यानंतर सर्वात आधी बाहेर पडलेल्या विकास जैन यांना संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जिल्ह्यावर आपले वर्चस्व कायम राहावे यासाठी केलेली ही खेळी असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे रांगेने शिवसेनेत दाखल झालेल्या किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडेले यांना मात्र अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार, असे दिसते. मराठवाड्याच्या शिवसेनेची खडा न् खडा माहिती असलेले अशोक पटवर्धन हे उद्धव ठाकरे, चंद्रकांत खैरे यांच्या अत्यंत विश्वासातले पदाधिकारी होते.
पक्षाला गळती लागली तशी त्यांनी महिनाभरापुर्वी शिंदे यांच्या शिवसेनेत उडी मारली. (Shivsena) आता पक्षाने लगेच त्यांच्यावर आधीच्या पक्षात होती तीच म्हणजे मराठवाडा सचिव पदाचीच जबाबदारी सोपवण्यात आली. 1998 पासून अशोक पटवर्धन यांच्याकडे मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील ठाकरे परिवाराच्या दौऱ्यांच्या नियोजनाची आणि समन्वयाची जबाबदारी होती. ठाकरे परिवाराच्या तीनही पिढ्यांसोबत त्यांनी काम केले.
मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अचानक त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवारी त्यांच्यावर मराठवाडा सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यांची नियुक्ती पुढील एक वर्षासाठी असेल, असे सचिव संजय मोरे यांनी दिलेल्या नियुक्तिपत्रात म्हटले आहे. दरम्यान, माजी महापौर विकास जैन यांच्याकडे सहसंपर्कप्रमुखाची धुरा सोपवण्यात आली. ते सुरवातीपासूनच शिरसाट समर्थक म्हणून सक्रिय आहेत.
शिरसाट यांचाच वरचष्मा
शिवसेनेकडून राज्यभरात अकरा मंत्र्यांना विविध जिल्ह्यांत संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र मुंबई, नाशिक, ठाणे येथे कुणावर जबाबदारी दिली नव्हती. जिल्ह्यात खासदार, आमदार आणि पालकमत्र्यांची तोंडे विरुद्ध दिशेने असताना पालकमंत्री संजय शिरसाट यांचाच जिल्ह्यातील संघटनेवर वरचष्मा असेल, असे संकेत आहेत. त्यात सहसंपर्कप्रमुख आणि मराठवाडा विभागीय सचिव ही पदेही त्यांच्याच निकटवर्तीयांना दिल्याने त्याला एकप्रकारची पुष्टी मिळाली आहे.
रांगेत आलेले ‘वेटिंग’वर
पटवर्धन यांच्या अगोदर माजी महापौर, किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, अद्याप त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. पैकी नंदकुमार घोडेले हे संजय शिरसाट यांच्या दौऱ्यात सावली प्रमाणे दिसतात. तर किशनचंद तनवाणी हे अजूनही संघटनेशी सुरक्षित अंतर राखून आहेत.
दुसरीकडे काही माजी नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश घडवून आणणाऱ्या आमदार प्रदीप जैस्वाल सध्या संघटनेत एकला चलो रे च्या भूमिकेत आहेत. शिवाय त्यांच्याकडेही संघटनेची इतर कुठली मोठी जबाबदारीही सोपवण्यात आलेली नाही. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने पक्षांतर केलेल्या माजी नगरसेवकांमध्ये आपण चुक तर केली नाही ना? अशी शंका त्यांना यायला लागली आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.