Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Shivsena News : संभाजीनगरात शिंदेंची शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : आमदार अपात्रतेची टांगती तलवार निघाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नव्या आत्मविश्वासाने कामाला लागली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची भूमिका महत्वाची ठरली होती. जिल्ह्यातील पाच आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता.

आमदार पक्षातून फूटन गेले तरी पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिकांनासोबत घेण्यात शिंदेंच्या स्थानिक नेते, लोकप्रतिनिधींना यश आले नव्हते. शिवाय ठाकरेंची शिवसेनाच मुळ सेना ठरेल, अशा अपेक्षेवर असलेल्या तळ्यात-मळ्यातच्या भूमिकेतील अनेकजण थांबून होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना शिंदेंचीच यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी ठाकरे गटाला मोठा दणका देण्याच्या तयारीत स्थानिक नेते आहे.

यासाठी जाळे टाकण्यास सुरूवात झाली असून ठाकरे गटाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना पदांचे अमिष दाखवले जात असल्याची माहिती आहे. यात काहीजणांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे आश्वासनही दिले जात आहे. आतापर्यंत ठाकरेंशी निष्ठा राखून असलेले काठावरचे पदाधिकारी सत्तेसाठी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतात का? हे पुढील काळत स्पष्ट होईल. एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) चाळीस आमदारासंह केलेल्या बंडानंतर राज्यात उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाली.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ती अधिक वाढल्याची चर्चा आणि दावे केले जात आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटाच्या विरोधात रणशिंग फूकत राज्याचा दौरा करण्याचे जाहीर केले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आक्रमक भूमिकेत गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मैदानात उतरलेले असतांना छत्रपती संभाजीनगरात मात्र त्यांनाच येत्या काही दिवसांत मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आतापर्यंत सुस्तावलेल्या शिंदेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही निकाल बाजूने लागताच कात टाकल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी जिल्हाभरात मेळावे घेऊन ठाकरे गटाच्या नेत्यांसाठी गळ टाकण्यास सुरूवात केली आहे. आज कन्नडमध्ये या नेत्यांच्या उपस्थितीत शिवसंकल्प शिवदूत मेळावा पार पडला. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा पाहता या मेळाव्याला महत्व प्राप्त झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) कोणाची याचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना आणि ठाकरेंची युवासेना क्रांतीचौकात आमने-सामने आली होती. शिवसेनेच्या जल्लोष आणि घोषणाबाजीपुढे ठाकरे गटाचा विरोध झाकोळला गेला. युवासेनेने क्रांतीचौकात येऊन शिवसेनेला प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला ठाकरे गटाच्या स्थानिक नेते व शिवसैनिकांची त्यांना भक्कम साथ मिळाली नाही. असेच चित्र यापुढे जिल्ह्यात राहिले, तर ठाकरेंशी निष्ठा बाळगून असलेले काठावरील पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चितच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT