Eknath Shinde, Uddhav Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Vs BJP: मुख्यमंत्री शिंदेंचा 'हा' आमदार आला उद्धव ठाकरेंच्या मदतीला

Shivsena Political News : उद्धव ठाकरे यांना 2019 च्या निवडणुकीनंतर भाजपसोबत जायचे नव्हते, मात्र शिवसेना आणि भाजपने मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घ्यायचे, असे ठरले होते, असा दावा करून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खळबळ उडवून दिली आहे.

अय्यूब कादरी

Dharashiv News : शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद विभागून घ्यायचे, असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता, असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने करत आहेत. भाजपकडून मात्र त्याचा सातत्याने इन्कार केला जात आहे. याच मुद्द्यावरूनच 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपची युती तुटली होती. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत जात मुख्यमंत्रिपद मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांनीही भाजपचीच री ओढली होती, मात्र आता शिंदे यांच्याच एका आमदारानेही अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असे सांगत भाजपला धक्का दिला आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सात आणि आठ मार्च असे दोन दिवस धाराशिव जिल्ह्यात जनसंवाद यात्रा झाली. या यात्रेदरम्यान उमरगा येथे आयोजित सभेत त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत शाह यांनी मुख्यमंत्रिपद विभागून घेण्याबाबत शब्द दिला होता, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. यासाठी त्यांनी तुळजाभवानी मातेची शपथ घेतली. तुळजाभानी मातेची शपथ घेऊन सांगतो की, मी खोटे बोलत नाही, अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेण्याबाबत शब्द दिला होता, असे ठाकरे जाहीर सभेत म्हणाले. तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन कुणी खोटे बोलत नाही, अशी श्रद्धा लोकांमध्ये आहे. त्यामुळे ठाकरे यांनी भाजपची एकप्रकारे कोंडी करून टाकली आहे.

लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपकडून एक आकडी जागा देण्यात येणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांत नाराजी निर्माण झाली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी यावरून भाजपला फैलावर घेतले आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चोख उत्तर दिले आहे.

भाजपचे सर्वाधिक आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे, असे म्हणत फडणवीस यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले नसते तर भाजपला सत्तेत यायची संधी मिळाली नसती, असे कदम यांचे म्हणणे आहे.

मंत्रिपद न मिळाल्यामुळे सतत आगपाखड करणारे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आता या वादात उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जायचे नव्हते, मात्र 2019 च्या निवडणुकीनंतर प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद विभागून घ्यायचे ठरले होते, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. उद्धव ठाकरे हे तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन जे सांगत आहेत, त्याला शिरसाट यांनी एकप्रकारे दुजोरा दिला आहे.

जागावाटपावरून निर्माण झालेल्या नाराजीतून शिरसाट यांनी हे वक्तव्य केले असून, त्यामुळे भाजपचीही कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या दाव्याला खोटे ठरवत मुख्यमंत्रिपद विभागून घेण्याचा शब्द अमित शाह यांनी दिला नव्हता, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दाव्याला आता त्यांच्याच आमदाराने तडा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे जे बोलत आहेत, ते खरे आहे, असा संदेश ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गेला आहे. ते भाजपला आणि शिंदे गटालाही परवडणारे नाही. त्याचवेळी शिरसाट यांनी ठाकरे यांना भाजपसोबत जायचे नव्हते असेही स्पष्ट केले आहे. असे असले तरी सध्याच्या घडीला शिरसाट यांचे वक्तव्य भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठीच अडचणीचे ठरणारे आहे. कारण एकच दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन तसा दावा केला होता.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आमदार शिरसाट हे आघाडीवर होते. त्यांनी वेळोवेळी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कठोर टीका केली आहे. मात्र मंत्रिमडळात त्यांना संधी मिळाली नाही, विस्तारातही त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे ते स्वाभाविकपणे नाराज होतेच. आता जागावाटपावरून भाजपसोबत मतभेद निर्माण झाल्यामुळे आमदार शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे. तसे करताना त्यांनी भाजपसह ठाकरे यांच्यावरही बाण सोडला आहे, मात्र हा बाण भाजपच्याच अधिक जिव्हारी लागेल असा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT