Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तशी राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. महायुती-महाविकास आघाडी व इतर छोट्या-मोठ्या पक्षांच्या उमेदवारी याद्या आता यायला सुरवात होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठवाड्याकडे यंदा संपुर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे.
या निमित्ताने मराठवाड्यातील मंत्री अब्दुल सत्तार, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजप नेते रावसाहेब दानवे, शिवसेनेचे नेते अंबादास दानवे, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, त्यांच्या बहीण भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि लातूरचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या जरांगे फॅक्टरने महायुती `फॅक्टर` झाली होती. मराठवाड्यातील आठ पैकी सात लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडीने यश मिळवले होते. यात (Amit Dehsmukh) अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लातूर, नांदेड आणि जालना या तीन महत्वाच्या जागा जिंकत शंभर टक्के रिझल्ट दिला होता.
तर छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा शिवसेनेने संदीपान भुमरे यांच्या रुपाने जिंकली होती. लोकसभेचा ट्रेंड विधनासभेला कायम राहतो ? की महायुती आपापले गड राखत कमबॅक करतात यावर मराठवाड्यातील पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.
सत्तार-दानवेंचे बिनसले
शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात लोकसभेच्या जालना मतदारसंघातील पराभवानंतर बिनसले आहे. दानवेंकडून सिल्लोडमध्ये सत्तारांना चकवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तर मला त्रास दिला तर भोकरदनमध्ये येऊन तुमचा `सुपडा साफ` करीन असा इशारा सत्तारांनी दिला आहे. त्यादृष्टीने सत्तार यांनी हालचाली सुरू केल्या असून विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपकडे असलेल्या मतदारसंघात ते खेळ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याचा फटका अर्थातच भाजप-शिवसेना आणि पर्यायाने महायुतीला बसणार आहे. याचा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कसा उठवतात? हे पहावे लागणार आहे. (Abdul Sattar) अब्दुल सत्तार, रावसाहेब दानवे हे दोघेही मराठवाड्यात प्रभाव असलेले नेते आहेत. आपापले जिल्हे आणि मतदारसंघ सांभाळून आपल्या पक्षाला, महायुतीला यश मिळवून देण्यासाठी या दोघांनाही काम करावे लागणार आहे.
सत्तार आपल्या मतदारसंघात अडकून पडतील, तर रावसाहेब दानवे मुलाचा भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघ सुरक्षित करत मराठवाड्यासह राज्यातही फिरतील. सत्तार-दानवे यांच्या वादाचा फटका संभाजीनगर जिल्ह्यात अधिक बसण्याची शक्यता आहे.
महायुतीचे राज्यातील नेते या दोन नेत्यांची समजूत कशी काढतात? यावर सगळे काही अवलंबून असणार आहे. अब्दुल सत्तार यांची उपद्रव शक्ती वेळोवेळी दिसून आली आहे.
तर रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात माहीर म्हणून ओलळखले जातात. मराठवाड्यात मात्र आता ते मित्र पक्षाच्या नेत्यालाच चकवा देण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. दानवे सत्तार यांना चकवा देण्यात यशस्वी ठरतात? की सत्तार त्यांच्यावरच डाव उलटवतात? हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला.
पक्षाचे आणि महायुतीचे झालेले हे नुकसान विधानसभेत भरून काढण्याची मोठी जबाबदारी विधानसभा निवडणुकीचे भाजपचे महाराष्ट्र संयोजक म्हणून रावसाहेब दानवे यांच्यावर असणार आहे. तर शिवसेनेला संभाजीनगरमध्ये लोकसभेला मिळालेले यश विधानसभेला मिळवून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांच्या खांद्यावर दिली आहे. या निमित्ताने या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
धनंजय मुंडेंना लाडक्या बहीणीची साथ मिळणार
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्यांच्या बहीण भाजप आमदार पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर संपुष्टात येऊन हे दोघेही एकत्र आले आहेत. महायुतीसाठी हे शुभसंकेत मानले जातात. दोघे एकत्र असतांना लोकसभेच्या बीड मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.
मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण संघर्षात पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. मुंडे बहीण-भावासाठी ही धोक्याची घंटा होती. विधानसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी आरक्षण संघर्ष कामय असला तरी महायुतीने यावर महिला, ज्येष्ठ नागरिक, बेरोजगार तरुण, वृद्ध अशा सगळ्यांसाठी योजना आणत विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
याचा प्रचारात योग्य वापर करत मतदारांना महायुतीच्या बाजूला वळवण्याचे मोठे काम पंकजा आणि धनंजय मुंडे या बहीण-भावावर असणार आहे. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात भगवान-भक्तीगडावर एका तपानंतर पंकजा-धनंजय मुंडे एकत्र आले होते. यावेळी दोघांनी केलेल्या भाषणातून विधानसभा निवडणुकीत मैदान मारण्याची घोषणा केली होती. पकंजा मुंडे यांची विधान परिषदेवर निवड करत भाजपने त्यांना विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी राज्यभरात फिरवण्याचा निर्णय घेतला आहे.
तर धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री म्हणून दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या कामांचा दाखला देत महायुतीला ताकद देण्याचा प्रयत्न करणार आहेत. (Mahavikas Aghadi) बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीला `क्लीन स्वीप` देण्याचा मुंडे जोडीचा प्रयत्न असणार आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र विधानसभेलाही मराठावाड्यातील अनेक मतदारसंघात असणार आहे.
हक्काचे ओबीसी मतदान राखत काही प्रमाणात मराठा मतदारांना महायुतीकडे ओढण्याचे काम या दोन्ही महायुतीच्या नेत्यांना करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव विधानसभेला बीड जिल्ह्यातील सर्व सहा जागा निवडून विसरण्याचा प्रयत्न या निमित्ताने धनंजय आणि पंकजा मुंडे करतात का ? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
देशमुखांची परीक्षा, अंबादास दानवेंना संधी..
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सात मतदारसंघात विजय मिळवत महायुतीला (Mahayuti) झटका दिला. यात काँग्रेसचे लातूरमधील नेते अमित देशमुख यांचा मोठा वाटा होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी अमित देशमुख यांच्या खांद्यावर आली.
काँग्रेसने मराठवाड्यात लातूर, नांदेड आणि जालना या तीन जागा लढवल्या होत्या. या तीनही जागा जिंकत काँग्रेस पक्ष शंभर टक्के रिझल्ट देणारा ठरला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या विरोधात असलेल्या वातावरणाचा महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना फायदा झाला. परंतु काँग्रेसच्या प्रचाराची धुरा अमित देशमुख यांच्या एकट्याच्या खांद्यावर होती. जिंकलेल्या तीनही मतदारसंघात अमित देशमुख यांनी प्रचार सभा, बैठका घेतल्या होत्या.
नांदेडमध्ये काँग्रेसने अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेले यश अधिक महत्वाचे मानले जाते. विधानसभा निवडणुकीत हाच करिश्मा अमित देशमुख दाखवू शकतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Marathwada) लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार करायचा होता, आता ते स्वतः लातूर शहर मधून तर त्यांचे बंधू धीरज हे लातूर ग्रामीणमधून लढणार आहेत. अशावेळी स्वतःचे मतदारसंघ, जिल्हा सांभाळून इतर जिल्ह्यात अमित देशमुख किती लक्ष देऊ शकतील? हा मोठा प्रश्न आहे.
महायुतीचे आव्हान पेलतानाच स्वतःचे नेतृत्व लातूर, मराठवाड्यापुरते मर्यादित नाही, तर ते राज्यव्यापी आहे हे दाखवण्याची संधी या निमित्ताने अमित देशमुख यांना चालून आली आहे. दुसरीकडे गेली दोन वर्ष विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे संधी ठरणार आहे. संघटनात्मक कामात अंबादास दानवे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पक्षाच्या नशिबी पराभव आल्यानंतर विधानसभेला दणक्यात पुनरागमन करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संधी आहे. आक्रमक, अभ्यासू आणि पुराव्यासह विरोधकांवर तुटून पडण्याची दानवे यांची स्टाईल महायुतीला डोकेदुखी ठरू शकते. (Shivsena) शिवसेनेतील महत्वाचे असे नेते पद, त्याचबरोबर मराठवाड्यातील पाच जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्यावर नुकतीच सोपवली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून मराठवाड्यासह राज्यात त्यांचा संपर्क आहे. याचा फायदा पक्षाचे अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी दानवे कसा करुन घेतात? यावर `उबाठा` चे संख्याबळ ठरणार आहे. संभाजीनगर जिल्ह्यात पक्षाची गद्दारी करून मंत्रीपद मिळवलेल्या माजी मंत्री संदीपान भुमरे, पालकमंत्री अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांना पराभूत करण्याचे मोठे आव्हान दानवे यांना पेलावे लागणार आहे.
एकीकडे महायुतीच्या दिग्गजांशी त्यांना दोन हात करावे लागणार आहे. तर दुसरीकडे पक्षातील ज्येष्ठ पण सध्या काहीसे दुरावलेले शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना सक्रीय करावे लागणार आहे. दोन वेळा आमदार, मंत्री, सलग चार वेळा खासदार राहिलेल्या खैरेंचा संभाजीनगरसह मराठवाड्यात चांगला जनसंपर्क आहे. त्यांना टाळून पुढे जाणे अंबादास दानवे यांच्यासाठी धाडसाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना फ्री हॅन्ड दिला आहे, त्याचा किती फायदा पक्षाला होतो, हे लवकरच स्पष्ट होईले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.