Bhagirath Bhalke Meet Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke Meet Sharad Pawar : अभिजीत पाटील फडणवीसांसोबत जाताच भगीरथ भालकेंनी घेतली पवारांची भेट; घरवापसीची चर्चा!

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 July : विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारत राष्ट्र समितीत प्रवेश केलेले भगीरथ भालके यांनी आज (ता. 07 जुलै) बारामतीत गोविंद बागेत येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. भालके हे पंढरपूर-मंगळवेढ्यातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. पवारांच्या भेटीला जाताना भालकेंनी विठ्ठल परिवारातील नेत्यांनाही सोबत घेतले होते. त्यामुळे भालकेंच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यानंतर भगीरथ भालकेंनी (Bhagirath Bhalke) गोविंद बागेत जाऊन भेट घेणे, महत्वाचे मानले जात आहे. अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भालकेंनी पवारांची (Sharad Pawar) साथ सोडत बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. आता भगीरथ भालके आणि पवारांची भेट घेतल्याने एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे.

भगीरथ भालके यांच्यासोबत युवराज पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील प्रमुख नेते होते. या भेटीचा तपशील मिळू शकला नसला तरी भालके हे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महाविकास आघाडीकडून संधी मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. आता ते पवारांच्या पक्षात प्रवेश करणार की काँग्रेसकडून निवडणूक लढवणार, हे पाहावे लागेल.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंढरपूरची पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा निसटता पराभव झाला होता. भगीरथ भालके आत्ताही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्याबाबतची घोषणा त्यांनी काही महिन्यांपूर्वीच केली आहे.

आताही महाविकास आघाडीकडून आपल्याला संधी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात शब्द घेतल्याचे सांगितले जात आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी कारखान्यावर पडलेल्या छाप्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीत भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय भगीरथ भालके यांच्या पत्त्यावर पडला असून अभिजीत पाटील गेल्यामुळे शरद पवार गटाकडून भालके हे उमेदवारीची चाचपणी करू शकतात. त्यातूनच त्यांच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे.

महाविकास आघाडीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते नेतृत्वाशी संधान साधले असले तरी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून घेण्याचे मोठे दिव्य सोलापुरातील काँग्रेस नेत्यांना करावे लागणार आहे.

विठ्ठल परिवारातील प्रमुख नेते असलेले युवराज पाटील आणि गणेश पाटील यांना सोबत आणून विठ्ठल परिवार आपल्या सोबतच असल्याचे भालके यांनी दाखवून दिल्याचे बोलले जात आहे. कारण, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सत्ता जरी अभिजीत पाटील यांची असली तरी मूळ विठ्ठल परिवार आपल्यासोबत असल्याचे भगीरथ भालके यांनी दाखवून दिल्याचे बोलले जात आहे. या भेटीमुळे भालकेंच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT