jayant patil eknath shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde News : अखेर ठरलं! मुख्यमंत्री 'या' दिवशी जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात; महायुतीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न

Anil Kadam

मागील महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) यांचा चर्चेत असलेला इस्लामपूर दौरा अखेर फायनल झाला. शिंदेंच्या सेनेकडून या दौऱ्याबाबतची जोरदार तयारी करण्यात आली. पण, अचानक दौरा रद्द झाल्याने तयारीवर पाणी फिरले होते. इस्लामपुरात शुक्रवारी 'शासन आपल्या दारी'सह विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. महायुतीच्या नेत्यांकडून शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार जयंत पाटील ( Jayant Patil ) यांना इस्लामपुरात येऊन लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath shinde ) यांच्यासह अनेक मंत्री इस्लामपूर शहरात येणार असल्याने त्याबाबतची तयारी प्रशासनाने सुरू आहे. संपूर्ण राज्यभर शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रशासन राबवत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शासन आपल्या दारीची चर्चा होती. जिल्ह्यातही मुख्यमंत्र्यांनाच या कार्यक्रमासाठी आणण्याचा चंग शिंदे गटाने बांधला होता. मागील महिन्यात तयारी झाली, मात्र ऐनवेळी दौरा रद्द करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शासकीय कार्यक्रम कुठे घ्यायचा याबाबत एकमत होत नव्हते. परंतु, शिंदे सेना आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने इस्लामपूरमध्ये कार्यक्रम फायनल झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा शहरातील खुले नाट्यगृह या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होईल. यशिवाय विविध विकासकामांचे उद्घाटन शिंदे यांच्यासह मंत्री करतील. शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील ( Jayant Patil ) यांचा इस्लामपूर हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी बालेकिल्ला घेरला आहे. महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते.

महायुतीच्या घटक पक्षातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इस्लामपुरात येऊन गेले होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे घटक पक्षातील एकनाथ शिंदे यांचा गट अस्वस्थ होता. मुख्यमंत्री शिंदे यांचा अखेर दौरा फायनल झाला. त्यामुळे शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांचा जीव भांड्यात पडल्याचे चित्र दिसत आहे.

इस्लामपुरात महायुतीचे मातब्बर नेते सातत्याने येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच दहा दिवसांपूर्वी जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. खुद्द जयंत पाटील यांनी भाजप प्रवेशाचा इन्कार केला होता. मात्र, भाजप प्रवेशाची हवा अद्याप ताजीच आहे, या परिस्थितीत जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रम होणार असल्याने ते काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT