Girish Mahajan Solapur Tour Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Girish Mahajan Solapur Tour : दोन वेळा जिंकलेले सोलापूर भाजपच्या ‘संकटमोचका’ने रातोरात का गाठले?

Vijaykumar Dudhale

Solapur News : सलग दोन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या सोलापुरात यंदा भारतीय जनता पक्षापुढे उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे. काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्यासारखा तगडा उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता गृहीत धरून भाजपकडून त्याच तोडीचा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी चालवली आहे. मात्र, दोन देशमुखांमधील उमेदवारीसंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह, फडणवीसांच्या यंग ब्रिगेडमधील नेत्याची लोकसभा लढण्याबाबत असलेली अनुत्सकता, यामुळे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी रातोरात सोलापूर गाठून आमदारांशी चर्चा केली. या चर्चेतून अनेक नावे पुढे आली असली तरी ठोस उमेदवार ठरू शकलेला नाही.

भारतीय जनता पक्षाने (BJP) 2014 आणि 2019 या निवडणुका या समोर ताकदवान सुशीलकुमार शिंदे असतानाही मोदी लाटेत जिंकल्या आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे या सोलापूर (Solapur) मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपलाही त्याच तोडीचा आणि महिला उमेदवार असावा, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. तसेच, स्थानिक आणि बाहेरचा असाही वाद सोलापूर भाजपमध्ये रंगला आहे. त्यातून इच्छुकांमधील एका नावावर भाजपचे एकमत होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा गुरुवारी रात्री उशिरा सोलापूर दौरा ठरला आणि महाजनांनी सकाळीच सोलापूर गाठले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप मेळाव्याच्या निमित्ताने महाजन सोलापुरात आले असले तरी महाजन मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले तरी त्याची तयारी झाली नव्हती. महाजन आल्यानंतर मेळाव्याचे बॅनरही लावण्यात आले. सोलापूरच्या उमेदवारीबाबत शहरातील नेते स्थानिक उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही आहेत. त्यांना आमदार विजयकुमार देशमुख यांचीही साथ आहे, त्यांच्या गटाकडून भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव सुचविण्यात आले आहे. इकडे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाकडूनही माजी नगरसेविकेचे नाव पुढे केले जात आहे. याशिवाय इतरही नावे चर्चेत आहेत.

सोलापूरसाठी माजी खासदार अमर साबळे, शरद बनसोडे, आमदार राम सातपुते, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. यात सातपुते यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, त्यांच्याकडून अजूनही होकार आलेला नाही. मध्यंतरी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचेही नाव चर्चेत आले होते. या नावाव्यतिरिक्त भाजपकडून ऐनवेळी चर्चेबाहेरील नावही पुढे येऊ शकते.

सोलापुरातील उमेदवारीचा कानोसा घेण्यासाठी आलेल्या महाजन यांच्यापुढे स्थानिक उमेदवाराचा धोशा शहरातील नेत्यांनी लावला खरा. पण, काँग्रेस उमेदवारीच्या तोडीचे नाव पुढे येऊ शकलेले नाही. त्यामुळे महाजन यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे संकटमोचक महाजन तरी सोलापूरच्या उमेदवारीला तिढा सोडवणार का, याकडे अख्ख्या सोलापूरचे लक्ष लागले आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT