Satej patil press  Sarakarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil tractor GPS opposition : देशातील ट्रॅक्टरला लागणार जीपीएस, ब्लॅक बॉक्स; कोल्हापुरातून सतेज पाटलांनी विरोध करत फोडले बिंग

GPS in tractors India News : आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीलादेखील ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे. त्याशिवाय जीपीएस लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : केंद्र सरकार येत्या काळात शेतकऱ्यांना संताप आणणारा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलीलादेखील ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे. त्याशिवाय जीपीएस लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याला कोल्हापुरातून पहिला विरोध होत आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाविरोधात मोहीम हाती घेतली आहे. देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर, ट्रॉलीसाठी हा निर्णय बंधनकारक करण्यात आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका नवीन मसुदा अधिसूचनेमुळे (G.S.R. 485(E)) महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालकांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणारा हा निर्णय आहे. हा नियम म्हणजे शेतकऱ्यांवर लादलेला अनावश्यक तंत्रज्ञानाचा मोठा आर्थिक भुर्दंड असल्याची तीव्र भावना आमदार सतेज पाटलांनी (Satej patil ) व्यक्त केली.

काय आहे हा नवीन नियम आणि आक्षेप?

ही अधिसूचना "हॉलेज ट्रॅक्टर" (मालवाहू ट्रॅक्टर) साठी काही नवीन नियम लागू करते. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यात शेतकरी अडकण्याची भीती आहे. यातील प्रमुख जाचक अटी खालीलप्रमाणे आहेत:

● GPS ट्रॅकिंगची सक्ती: या नियमानुसार, प्रत्येक ट्रॅक्टरला AIS-140 प्रमाणित 'व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस' (VLTD) बसवणे अनिवार्य होईल. जो ट्रॅक्टर फक्त शेत आणि गाव परिसरात फिरतो, त्याला GPS ने ट्रॅक करण्याची गरज काय? यासाठी शेतकऱ्याला 8,000 ते 15,000 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

● 'ब्लॅक बॉक्स'ची अट: अपघात झाल्यास माहिती रेकॉर्ड करण्यासाठी विमानात असतो तसा 'इव्हेंट डेटा रेकॉर्डर' (EDR) किंवा 'ब्लॅक बॉक्स' ट्रॅक्टरमध्ये बसवावा लागेल. शेतात10-15 किमी प्रतितास वेगाने चालणाऱ्या ट्रॅक्टरसाठी ही अट पूर्णपणे निरर्थक असून, यासाठी 15,000 ते 25,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे.

● ट्रॉलीसाठी नवीन मानके : ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीसाठी नवीन आणि महागडे मेकॅनिकल कपलिंग आणि इलेक्ट्रिकल कनेक्टर बंधनकारक केले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जुन्या, वापरात असलेल्या ट्रॉली बदलाव्या लागतील किंवा त्यावर मोठा खर्च करावा लागेल.

दिल्लीत एसी कार्यालयात बसून शेतकऱ्यांसाठी कायदे बनवणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्याच्या व्यथा कळत नाहीत. आमचा बळीराजा शेतात राबतो, महामार्गावर व्यावसायिक वाहतूक करत नाही. त्याच्या ट्रॅक्टरवर हजारो रुपयांची अनावश्यक उपकरणे बसवण्याची सक्ती करणे हा थेट शेतकऱ्याच्या खिशावर दरोडा घालण्यासारखेच आहे. आधीच महागाई आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्याला हा खर्च परवडणारा नाही. सरकारने वास्तवाचे भान ठेवून ही जाचक अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, अशी भूमिका सतेज पाटलांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याचे आवाहन

सरकारने 18 ऑगस्ट 2024 पर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत दिली असून आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी, ट्रॅक्टर मालक व शेतकरी संघटनांना या जाचक नियमांविरोधात comments-morth@gov.in या ईमेलवर लेखी हरकती पाठवण्याचे आवाहन केले आहे.

शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व ट्रॅक्टरना वगळावे

हा नियम शेतकऱ्याला अधिक कर्जबाजारी करेल आणि त्याच्यावर अनावश्यक तंत्रज्ञानाचा भार टाकेल. एका बाजूला सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गोष्टी करते आणि दुसऱ्या बाजूला असे खर्चिक नियम लादून त्यांचा आर्थिक कणा मोडत आहे. त्यामुळे, सरकारने 'हॉलेज ट्रॅक्टर' या शब्दाची व्याख्या स्पष्ट करून त्यातून शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व ट्रॅक्टरना वगळावे किंवा ही संपूर्ण अधिसूचना तात्काळ रद्द करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT