Poornima-Prasad Engagement  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress-Shivsena Leader News : काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची नात होणार शिवसेनेच्या माजी आमदाराची सूनबाई...

Poornima-Prasad Engagement : सोलापुरात झालेल्या साखरपुड्यात धाराशिवकरांच्या पाहुणचारामुळे भारावून गेले पुणेकर

सरकारनामा ब्यूरो

पाहुण्यांनी खचाखच भरलेले सोलापुरातील हेरिटेज लॉन, सर्वत्र झगमगाट...पाहुण्यांची लगबग, पुणेकरांची सरबराई करण्यासाठी, त्यांना काय हवे काय नको हे पाहण्यासाठी तत्पर असलेले धाराशिवकर...अशा मंगलमय वातावरणात काँग्रसचे दिग्गज नेते, माजी मंत्री, तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांची नात पौर्णिमा हिचा साखरपुडा हडपसरचे (पुणे) शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी आमदार महादेव बाबर यांचे पुत्र प्रसाद यांच्याशी झाला. (Granddaughter of former minister of Congress will Daughter-in-law of former Shiv Sena MLA...)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मधुकरराव चव्हाण यांची नात पौर्णिमा ही हडपसरचे (पुणे) माजी आमदार महादेव बाबर यांची सून होणार आहे. महादेव बाबर यांचे पुत्र प्रसाद बाबर आणि बाबूराव मधुकरराव चव्हाण यांची कन्या पौर्णिमा हिचा साखरपुडा 10 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे झाला. धाराशिवकरांनी केलेला मान-सन्मान आणि पाहुणचारामुळे पुणेकर पाहुणे भारावून गेले होते. पौर्णिमा ही कॉम्प्युटर इंजिनियर आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमधून तिने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तत्पूर्वी, तिचे शिक्षण सोलापूर येथील महेश इंग्लिश स्कूलमधून झाले. प्रसाद बाबर हे एमबीए असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मूळचे अणदूर (ता. तुळजापूर) येथील रहिवासी असलेले मधुकरराव चव्हाण हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यापूर्वी उस्मानाबाद (आताचा धाराशिव) मतदारसंघातून 1985 च्या निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. ते 1990 मध्ये तुळजापूर मतदारसंघातून विजयी झाले. तुळजापूरमध्ये 1995 मध्ये शेकापचे माणिकराव खपले यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 1999, 2004, 2009 आणि 2014 असे सलग चार वेळा ते तुळजापुरातून विजयी झाले. मात्र, 2019 मध्ये भाजपचे राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचा पराभव केला.

मधुकरराव चव्हाण हे काँग्रेस सरकारमध्ये पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. मतदारसंघात त्यांनी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला. पौर्णिमा चव्हाण हिचे बंधू अभिजित हे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. निवडणूक लढवून त्यांनी हे पद मिळवले आहे. त्यांना एक लाखापेक्षा अधिक मते मिळाली होती. पौर्णिमा हिचे वडील बाबूराव चव्हाण हे अत्यंत चाणाक्ष व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. एकदा जिल्हा परिषद सदस्य वगळता राजकारणात ते सक्रिय नव्हते. मात्र, मधुकरराव चव्हाण यांच्या निवडणुकीत पडद्यामागून सर्व सूत्रे तेच हलवायचे. बाबूराव यांचे बंधू सुनील चव्हाण हे तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

प्रसाद बाबर हे युवा सेनेचे (ठाकरे गट) हडपसर मतदारसंघ प्रमुख आहेत. त्यांनी एमबीए केले असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे वडील महादेव बाबर हे निष्ठावंत शिवसैनिक असून, 2009 मध्ये ते पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तत्पूर्वी, 1997, 2002 आणि 2007 असे तीन वेळा ते पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्यांना 2003 मध्ये पुण्याचे उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नंतर ते विरोधी पक्षनेते बनले. शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, शिवाजी सावंत, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय सावंत, युवा सेनेचे (शिंदे गट) मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, भूम-परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रकाश यलगुलवार आदी उपस्थित होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT