Samadhan Avtade-Prashant Paricharak  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur-Mangalvedha Politics : परिचारकांनी मनातील गोष्ट बोलून दाखवली; ‘आवताडेंना मी आमदार केलं, पक्षासाठी मी दोनदा माघार घेतली’

Prashant Paricharak VS Samadhan Avtade : तिळगूळ दिलं आणि सगळं गोड झालं, असे तुम्ही समजू नका. असं होत नसतं.

Vijaykumar Dudhale

Solapur News : माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या विधानामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मी आणि समाधान आवताडे यांनी एकमेकांच्या विरोधात दोन निवडणुका लढवल्या आहेत. ग्राउंड लेव्हलवर आमचे दोन गट आहेत. त्यामुळे तिळगूळ दिलं आणि सगळं गोड झालं, असे तुम्ही समजू नका. असं होत नसतं. तसेच, समाधान आवताडे यांना मी आमदार केलं आहे, असे सांगून परिचारक यांनी आपल्या मनातील गोष्टी बोलून दाखवली आहे, त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याचे राजकारण पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर येत आहे का, याची चर्चा रंगली आहे. (I made Samadhan Avtade MLA : Prashant Paricharak)

पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटात आलबेल नसल्याचे गेल्या वर्ष-दीड वर्षभरापासून जाणवत आहे. पोटनिवडणुकीत यशानंतर अवघ्या वर्ष-सहा महिन्यांत झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक आणि आवताडे गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यात परिचारक गटाने भालके गटाची मदत घेऊन आवताडेंना मात दिली होती. (Pandharpur-Mangalvedha Politics )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमधून, घटनांमधून भाजपमधील या आजी-माजी आमदारांमधील मतभेद पुढे आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या दिनदर्शिका प्रकाशनाच्या कार्यक्रमातही परिचारक यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ते विधानसभेची तयारी करीत आहेत का, असाही मुद्दा पुढे येत आहे.

दरम्यान, पंढरपुरात माध्यमांशी बोलताना परिचारक यांनी दोघांमधील संबंधावर भाष्य केले. ते म्हणाले, आम्ही दोघं एकमेकांविरोधात दोन निवडणुका लढलो आहोत. ग्राउंड लेव्हलवर आमचे दोन गट आहेत, त्यामुळे तिळगूळ दिलं आणि सगळं गोड झालं, असे तुम्ही समजू नका. असं होत नसतं. शेवटी कुटुंबप्रमुख म्हणून काम करताना आपण मन किती लहान करायचं, हे सर्वांनी ठरवायचं आहे. कार्यकर्त्यांमधील विषय समजून घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं, आवश्यक असतं.

समाधान आवताडे सध्या सत्तेवर आहेत, त्यांना मी आमदार केलेलं आहे. मी आमदार केलेल्या माझ्या पक्षाचा मी कमीपणा कशाकरिता करू. त्यामुळे मी असल्या गोष्टी करत नसतो आणि मी माध्यमांसमोरही कधी येत नाही, मी आपलं माझं काम करीत असतो. सगळ्यांनी मिळून केलं तरच हा रथ पुढे जाणार आहे. शेवटी पक्ष, पक्षश्रेष्ठी हे सर्वांच्या बाबत निर्णय घ्यायला समर्थ आहेत, असेही परिचारक यांनी नमूद केले.

त्यावेळी फक्त पंढरपुरात भाजपला यश आलं होतं

परिचारक म्हणाले, मी पक्षासाठी एकदा नव्हे; तर दोन वेगळा माघार घेतलेली आहे. मी २००९ मध्ये माघार घेतली, तर २०१९ च्या पोटनिवडणुकीतही पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा आपल्याला काहीही करून निवडून आणायची आहे, ही जागा जिंकल्यानंतर राज्यात परिवर्तन सुरू होईल, असे पक्षश्रेष्ठींनी सांगितले. त्यामुळे आमच्या सर्व सहकाऱ्यांनी तन-मन-धनाने काम केलं. त्यावेळी झालेल्या इतर कुठल्याही पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश आले नाही. पण, पंढरपूर-मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीत यश आलं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही गोष्टी घडत असल्या तरी नेते म्हणून आम्ही सर्वांनीच मन मोठं करून पुढे गेलं पाहिजे. पक्ष जो निर्णय देईल, तो अंतिम असेल, असेही सांगायला परिचारक विसरले नाहीत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT