Sushilkumar Shinde- V. G. Shivdare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : मी निवडून आलो नसतो तर शिवदारेअण्णा मंत्री झाले असते; सुशीलकुमारांनी सांगितली १९७४ ची आठवण

विश्वभूषण लिमये

Solapur News : मी १९७३-७४ मध्ये अचानक धुमकेतूसारखा राजकारणात उतरलो. आमदार झालो आणि मंत्री झालो. त्यावेळी मंत्रिपदावर खरा अधिकार हा वि. गु. शिवदारे यांचा होता. मी जर निवडून आलो नसतो, तर शिवदारे मंत्री झाले असते, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माजी आमदार शिवदारे यांच्या आठवणींना उजाळा दिला. (If I had not been elected Then Shivdare anna would have been a minister : Sushilkumar Shinde)

सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी आमदार वि. गु. शिवदारे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिंदे म्हणाले की, वसंतराव नाईकांचा शिवदारे यांच्यावर खूप जीव होता. पण, राजकारणात कधी कधी वेगळे फासे पडतात आणि त्यात मी १९७४ मध्ये मंत्री झालो. पण, शिवदारे कधी असं म्हणाले नाहीत की, तुमच्यामुळे माझं मंत्रिपद गेलं... पुढे तर मी त्यांच्याच मतदारसंघातून निवडून आलो आणि मुख्यमंत्री झालो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवदारेअण्णा हे दुष्काळात काम करत असताना रात्रंदिवस फिरायचे. त्यावेळी इंदिरा गांधीही आल्या होत्या. गांधींना दुष्काळाची परिस्थिती सांगत असताना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापुढे त्यांनी मांडलेली भूमिका आजही माझ्या लक्षात आहे. त्यांच्यासारखा सखोल अभ्यास करणारा आमदार अजूनपर्यंत झालेला नाही आणि यापुढे होईल की नाही, हे मला माहिती नाही. आम्हाला पद-पदव्या मिळत गेल्या, पण शिवदारे यांच्यासारखा अभ्यास आम्हाला करता आला नाही, अशी कबुलीही शिंदे यांनी दिली.

सिद्धेश्वर सहकारी बॅंकेचा मी १९७३ पासून साक्षीदार आहे. शिवदारेंसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या माणसाकडून ही बँक चालवली जाईल का? अशी शंका त्यावेळी अनेकांच्या मनात होती. शिवदारे यांनी अवघ्या तीन लाखांच्या भांडवलात ही बँक उभी केली. आज ४६० कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेने निर्माण केल्या आहेत, असे गौरवोद्‌गारही बॅंकेबाबत काढले.

गोडबोले... प्रकाश वाले...!

बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले यांना काँग्रेस पक्षाने सोलापूर शहराच अध्यक्षपद दिलं. बँक त्यांच्या हातात आहे; म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कर्ज द्यावं असं सांगून बघितलं. पण ते करतो करतो म्हणायचे आणि हळूच येऊन सांगायचे की संबंधित कार्यकर्त्याची कर्ज घेण्याची क्रेडिबिलिटी नाही. वाले हे पैशाचं काम करायचे नाहीत. पण, गोड बोलायचे, याबदल मला त्यांचा अभिमान आहे, असंच गोडबोले असलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी वाले यांना लगावला.

वसंतदादांचा हजरजबाबीपणा

तुम्ही बँकेचं ७५ वं वर्ष साजरं करणार आहात. मात्र, यापुढे कठीण काळातून तुम्ही जाणार आहात, हे तुम्हाला सांगतो. एक एक पैशाचा हिशेब तुम्हाला ठेवावा लागेल, असा इशारा देऊन शिंदे म्हणाले की, मला सारखी वसंतदादा पाटलांची आठवण येते. आम्ही निवडणूक रणनीतीबाबत बोलत होतो. तेवढ्यात एक नेत्या दादांकडे आल्या. त्याचं नाव कोकणात प्रचारासाठी दिलं होतं. त्या म्हणाल्या की, तुम्ही मला तिकडे पाठवताय, त्याबद्दल धन्यवाद. मात्र,कोकणात फिरायला तुम्ही मला १० हजार दिले आहेत. कोकणात बरेच चढ आहेत. मात्र, वसंतदादा हजरजबाबी होते. ते त्यांना म्हणाले, ‘बाई, कोकणात जसे चढ आहेत, तसे उतारही आहेत.’ एवढं बोलून त्यांनी त्या महिलेला वाटेला लावलं, असेही शिंदे यांनी सांगितलं.

शेवटपर्यंत मला कॉन्फिडन्स नव्हता

ते म्हणाले की, वसंतदादा १९८३ मध्ये मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खात दिलं. मी त्यांना म्हटलं, हे मला जमणार नाही. पण ते म्हणाले की, मला पूर्ण खात्री आहे. पण, शेवटपर्यंत मला कॉन्फिडन्स नव्हता. मी कसंतरी ते खात सांभाळू शकलो. पण दादांची काय दृष्टी असेल की सगळे सोडून मला त्यांनी ते खातं दिल. गरीब माणसाकडे असं एखादं खात दिल्यानंतर जी जबाबदारी येते, तो सांभाळून काम करतो.

पायलट-गेहलोत वादानंतरही राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकेल

मराठा आरक्षण देण्याबाबत सरकारने होय म्हटलेले आहे, तर ते केलं पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत, ते सांगतील ते आम्हाला मान्य आहे. सचिन पायलट-अशोक गेहलोत वादावर ते म्हणाले की, राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील वाद आजचा नसून खूप वर्षांपासूनचा आहे. मात्र तरीसुद्धा राजस्थानमध्ये काँग्रेस निवडून येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT