Sangola News : निवडणुकीत दिलेल्या आश्वासनातील एकही काम येत्या वर्षभरात राहणार नाही, एवढा शब्द मी देतो. निवडणुकीच्या निकालात विजयी होणं महत्त्वाचं असतं, त्यामध्ये मताधिक्य किती आहे? कमी आहे की जास्त आहे? हे मी पाहत नाही. जिंकलं तरच विधानभवनात प्रवेश असतो, त्यामुळे मी मताधिक्याचा विचार कधीच करत नाही, अशा शब्दांत आमदार शहाजीबापू पाटील यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे आपल्या मताधिक्याबाबत भाष्य केले. (Winning elections is important; I do not care about vote share: MLA Shahaji Patil)
आमदार शहाजी पाटील यांचे गाव असलेल्या महूद ते सांगोला या रस्ताच्या काँक्रीटकरण कामाचे भूमिपूजन दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार पाटील यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली. या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. त्यावरून सर्वसामान्यांतूनही आमदार पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याच कार्यक्रमात शहाजी पाटील यांनी निवडणुकीतील मताधिक्याबाबत भाष्य केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शहाजी पाटील हे ७६८ मतांनी विजयी झाले होते. त्यांना शेकापचे तरुण उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांनी जोरदार लढत दिली होती. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंखे यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या शहाजी पाटील यांना पाठिंबा दिला होता.
सांगोला तालुक्याच्या पाणीप्रश्नावर आमदार शहाजी पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले की, सांगोला तालुक्याच्या हक्काच्या पाण्याचं आडवा कितीही मोठा नेता आला, तर मी पाहिला नाही. पाण्यासाठी आडवा आलेल्या नेत्याला मी सोडला नाही. पाण्यासाठी मी माझी राजकीय अस्तित्व पणाला लावले आहे.
सांगोला तालुक्यातील जनतेने मला मोठ्या विश्वासाने आमदार केले आहे, त्यामुळे मी प्रामाणिकपणे जनतेचा सेवक म्हणूनच काम करीत आलो आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आपल्यासोबत असल्याने तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे. सांगोला तालुक्यातील पाण्याच्या आडवा कितीही मोठा नेता आला, तर तो मी पाहत नाही. मी माझे राजकीय अस्तित्व त्यासाठी पणाला लावले आहे, असेही आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.
या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.