Congress-Shivsena Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahaaghadi Seats Allotment : 'कोल्हापूर सोडतो; पण सांगली द्या' : ठाकरेंच्या मागणीमुळे काँग्रेस हडबडली!

Loksabha Election 2024 : काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी या घडामोडीत 'मी कदापी काँग्रेस सोडणार नाही, अन्य कोणत्याही पक्षाकडून लढण्याचा प्रश्नच नाही. हा काँग्रेसचा मतदार संघ आहे. आमदार विश्वजित कदम योग्य तो मार्ग काढून निर्णय घेतील', अशी भूमिका मांडली आहे.

Anil Kadam

Sangli News : सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, त्या बदल्यात कोल्हापूर सोडायला तयार आहोत, असा प्रस्ताव महाविकास आघाडीत चर्चेत आल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत आहे. मागील 2019 मधील निवडणुकीत काँग्रेसला पारंपरिक मतदारसंघावर पाणी सोडावे लागले होते. तेव्हा वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्याची वेळ आली होती. आता पुन्हा शिवसेनेला मतदारसंघ गेल्यास काँग्रेसची फरफट होण्याची भीती आहे.

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी या घडामोडीत 'मी कदापी काँग्रेस सोडणार नाही, अन्य कोणत्याही पक्षाकडून लढण्याचा प्रश्नच नाही. हा काँग्रेसचा मतदार संघ आहे. आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) योग्य तो मार्ग काढून निर्णय घेतील', अशी भूमिका मांडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे, शिवसेनेच्या (Shivsena) जिल्ह्यातील नेत्यांना या अचानक 'एंट्री'ने उकळ्या फुटू लागल्या आहेत. सांगली (Sangli) मागायची, असा मुद्दा आधीच चर्चेला आला होता आणि त्यामुळेच प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीत राहा, शिवसैनिकाला मैदानात उतरवायचे ठरले, तर आपल्यातील एखाद्याला संधी मिळू शकते, असा दावा केला होता.

शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे सांगलीची जबाबदारी आहे आणि त्यांनी हा विषय रेटला आहे. त्यात खासदार संजय राऊत यांनीही थेट लक्ष घातले आहे. त्यामुळे 'कोल्हापूरसाठी (Kolhapur) सांगलीचा हात काँग्रेस सोडणार का?' असा प्रश्न आता चर्चेला आला आहे. या घडामोडीत आमदार विश्वजित कदम यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला जाऊ नये, यासाठी कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याशी लोक संपर्क करीत आहेत. जिल्हा काँग्रेस आणि शहर काँग्रेसतर्फे या हालचाली थांबवा, काँग्रेसची जिल्ह्यात मजबूत मोट बांधली गेली आहे, विजयाच्या संधी आहेत, त्या हिरावू नका, असा निरोप पोहोचविला गेला आहे. विशाल पाटील यांची संपूर्ण मदार आता विश्वजित कदम यांच्या खांद्यावर आहे. आता कदम हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे कोणती भूमिका मांडणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

सांगली लोकसभेवर शिवसेनेने दावा केल्याने महाविकास आघाडीमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. यावर वरिष्ठ नेते कशाप्रकारे तोडगा काढणार, याकडे आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT