Narsayya Adam-Praniti Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Lok Sabha 2024 : प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर करताना आडम मास्तरांचा ‘शहर मध्य’बाबत मोठा दावा...

Mahavikas Aghadi : शहर मध्यच्या जागेबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटाेले यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामध्ये शरद पवारांनी सुचवले की, शहर मध्यची जागा माकपला द्यावी. त्याबाबत सीताराम येचुरी यांनी चर्चा करावी. त्यानुसार सीताराम येचुरी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी शिंदे यांनी त्याला संमती दर्शविली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 08 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघात वेगवान राजकीय हालचाली होत आहेत. लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांची आज भेट घेतली. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आमदार शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा करताना इंडिया आघाडीत तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देण्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी मान्य केल्याचा दावा आडम मास्तर यांनी केला आहे.

सोलापूरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (CPM) आज (ता. 08 एप्रिल) काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पाठिंबा देतानाच प्रणिती शिंदे आमदार असलेल्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर नरसय्या आडम (Narsayya Adam) यांचा दावा केला आहे. शहर मध्यची जागा माकपला देण्याबाबत सुशीलकुमार शिंदे यांचा आक्षेप नसल्याचाही आडम यांनी दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपविरोधात असलेल्या सर्व विरोधी पक्षांना ताकद देण्यासाठी आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. सोलापूर ‘शहर मध्य’च्या जागेवर आम्ही ठाम असून, आम्ही ती जागा विधानसभेला लढणार आहोत. शहर मध्यच्या जागेबाबत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामध्ये शरद पवारांनी सुचवले की, शहर मध्यची जागा माकपला द्यावी. त्याबाबत सीताराम येचुरी यांनी चर्चा करावी. त्यानुसार सीताराम येचुरी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी शिंदे यांनी त्याला संमती दर्शविली आहे. मात्र, काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असेही शिंदेंनी सांगितल्याचा दावा आडम यांनी केला.

दरम्यान, प्रणिती शिंदे लोकसभेला पराभूत झाल्या तर मात्र त्यांनी केंद्रात काम करावं. एकदा केंद्राचे नेतृत्व म्हणून पुढे आल्यानंतर पुन्हा राज्यात येणं योग्य नाही. प्रणिती शिंदे या राज्यसभेवरही जाऊ शकतात. त्यांचे वडील केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत. याबाबत ज्यांच्याकडे तोडगा असेल, त्यांनी तो काढावा ते माझ्या हातात नाही, असेही आडम यांनी सुचविले.

माजी आमदार आडम म्हणाले, प्रणिती शिंदे माझ्याकडे १५ मार्चला आल्या होत्या. आमची अर्धा तास चर्चा झाली. त्यावेळी आम्ही आठ एप्रिल रोजी निर्णय जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज पाठिंब्याची घोषणा करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसंदर्भात आमची तपशीलवार चर्चा झाली आहे. त्यात सोनिया गांधी, सीताराम येचुरी हे शहर मध्य मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला देण्याचा निर्णय घेतील, असा फार्म्युला आमच्याकडे आला आहे. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे हे पाच तारखेला सीताराम येचुरी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलले. हे येचुरी यांनी मला सहा तारखेला कळविले. त्यांचा जो निर्णय असेल तो आम्ही अंमलात आणू.

काहीही झालं तरी विधानसभेची आगामी निवडणूक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढविल्याशिवाय राहणार नाही. या वेळी शहर मध्य मतदारसंघातून आमचा माणूस विधानसभेत पाठविण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे आम्हाला लोकसभेची काळजी नाही. भाजपचे पाच आमदार असतानाही प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून येतील, असा दावा आडम यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT