Solapur News : सोलापूरच्या श्री अन्न उत्कृष्टता केंद्राला (मिलेट सेंटर) कोणताही धक्का लागलेला नाही. कोणाला दिलेले खेचून न्यायचं, हे माझ्या स्वभावात आणि रक्तातही नाही. मिलेट सेंटर सोलापूरऐवजी बारामतीला नेलेले नाही. मागील काळात तसे परिपत्रक निघाले असेल तर येत्या सोमवारी तो दुरुस्त करण्याचाही प्रयत्न केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (Millet Center of Solapur was not shifted to Baramti: Ajit Pawar)
सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामती येथे हलविण्याचा शासकीय निर्णय जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. तसेच, त्यांनी विधानसभेतही प्रश्न उपस्थित केला होता. त्याचबरोबर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनीही मिलेट सेंटरबाबत अधिवेशनात प्रश्न मांडला होता. हे केंद्र सोलापूरमध्ये व्हावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
श्री अन्न उत्कृष्टता केंद्रावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण रंगलेले आहे. त्यावर आज सोलापूरमध्ये आलेल्या अजित पवार यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, मिलेट सेंटरसंदर्भात पाठीमागच्या काळामध्ये गैरसमज निर्माण करण्यात आला आहे. सोलापूरच्या मिलेट सेंटरला धक्का लागलेला नाही. यासंदर्भात मी अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, असं काहीही झालं नाही. आमचं आम्हालाच ठेवलेले आहे. अशी मिलेट सेंटर दोन ते तीन करायची होती, त्यातील एक बारामतीला गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी मी, देवेंद्र फडणवीस आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत चर्चा केली. त्या वेळी त्यांनी कृषी विभागाशी चर्चा केली. सोलापूरचे मिलेट सेंटर बारामतीला हलवलेले नाही, असे त्यांनी सांगितले. मी सोलापूरकरांना सांगतो की, मी ३२ ते ३३ वर्षांपासून राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. कोणाला दिलेला, असं खेचून आणायचं, हे माझ्या स्वभावात नाही आणि रक्तातही नाही. त्यामुळे जे ज्या जिल्ह्यासाठी मंजूर झालं आहे, ते त्यांनाच मिळेल, असा शब्दही अजित पवार यांनी दिला.
अजित पवार म्हणाले, माझ्याकडेच अर्थ विभाग आहे. दुसरीकडे आपण नवीन गोष्ट करू शकतो, त्यामुळे सोलापूरला दिलेले मिलेट सेंटर सोलापूरसाठीच राहील. सोमवारी या संबंधित सचिवांना बोलावून घेण्यात येईल. जर सोलापूर मिलेट सेंटर बारामतीला हलविण्यात आले आहे, असे परिपत्रक असेल तर त्यात दुरुस्ती करण्यात येईल.
तुम्ही सोलापूरचं मिलेट पळवलं, असं म्हणत असाल तर मी माझं कॅन्सल करतो. सरकारने दोन ते तीन मिलेट सेंटरसाठी मान्यता दिली होती, त्यातील एक मिलेट सेंटर बारामतीला सुरु होणार आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.