Uttam Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : राष्ट्रवादीचा नेता भाजपकडून लढवणार सोलापूर लोकसभा; तिकीट निश्चित, प्रचाराला सुरुवात

Vijaykumar Dudhale

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर हे भारतीय जनता पक्षाकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. जानकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतली असून, त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्यांनी वेळापूर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला असून, त्यात सोलापूर लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जानकर यांच्याकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. (Solapur political New)

राज्यात सध्या सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेल्यास सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपविरोधात काँग्रेस अशी सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांचे नाव निश्चित समजले जात आहे. भाजपकडून मात्र विविध नावांचा पर्याय शोधला जात आहे. त्यात उत्तम जानकर यांचीही पडताळणी पक्षाकडून केली जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना सोलापूर लोकसभेबाबत विचारणाही झाली आहे. विशेष म्हणजे जानकर यांच्याकडे ‘एसटी’चे जात प्रमाणपत्रही आहे. (BJP Candidate)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उत्तम जानकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाबरोबर महायुतीमध्ये आहेत. जानकर मूळचे हे भारतीय जनता पक्षाचे कट्टर नेते राहिले आहेत. माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांसारख्या बलाढ्य राजकीय कुटुंबाच्या विरोधात त्यांनी आजपर्यंत राजकीय लढा दिलेला आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. (Madha Loksabha)

जानकर यांनी माळशिरस मतदारसंघातून २०१९ ची विधानभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. त्यात त्यांचा राम सातपुते यांच्याकडून अवघ्या काही हजारांनी निसटता पराभव झाला होता. त्यामुळे जानकर हे माळशिरसमध्ये ताकद राखून आहेत. ते सध्या राष्ट्रवादीत असले तरी महायुतीत असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

जानकर यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील शीर्षस्थ नेत्याची भेट घेतली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली असून, जानकर यांचे तिकीट निश्चित समजले जात आहे. आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून जानकर यांच्या उमेदवारीबाबत काय प्रतिसाद येतो, हे पाहावे लागेल.

जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात धनगर मते निर्णायक आहेत. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून जानकर यांना उमेदवारी देऊन माढ्यातील बहुसंख्य धनगर मतांचे गणित भाजपकडून घातले जात आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही धनगर समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जानकर यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो.

सोलापुरातून लोकसभा लढवणार : जानकर

सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत उत्तम जानकर ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले, वेळापूर येथील मेळाव्यातून आम्ही सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेला आहे. आमचे कार्यकर्ते सध्या कामालाही लागले आहेत. माझी भाजपश्रेष्ठींशी सोलापूर लोकसभेबाबत चर्चा झाली आहे, त्यामुळेच आम्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरू केली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT