Rohit Pawar-Tanaji Sawant-Narayan Patil-Ram Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Adinath Sugar Factory : ‘सावंत, राम शिंदे अन्‌ नारायण पाटलांनी बारामती ॲग्रोला आदिनाथ मिळू दिला नाही’

Karmala Politics : ‘बारामती ॲग्रो’च्या बरोबरीने उसाला दर द्यावा लागेल, या भीतीतून तालुक्यातील खासगी कारखानदारांनीही आम्हाला विरोध केला : रोहित पवार

​अण्णा काळे

Karmala News : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला मिळू नये, यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतला. त्याला कर्जत जामखेडचे आमदार राम शिंदे यांनी मदत केली, त्यात करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनीही भाग घेतला. या सर्वांनी स्वतःचं राजकारण बघितलं. तसेच, ‘बारामती ॲग्रो’च्या बरोबरीने उसाला दर द्यावा लागेल, या भीतीतून खासगी कारखानदारांनी आम्हाला विरोध केला, अशा शब्दांत आदिनाथ कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला न मिळण्याचे राजकारण आमदार रोहित पवार यांनी सांगितले. (Private factories in Karmala did not allow Baramati Agro to get Adinath : Rohit Pawar)

जामखेड तालुक्यातील हळगाव येथे बोलताना आमदार रोहित पवार यांनी आदिनाथ कारखान्यावरून सावंत आणि विरोधकांवर आरोप केले. ते म्हणाले की, आदिनाथ कारखाना ‘बारामती ॲग्रो’ला मिळू नये, यासाठी राजकारण केलं गेलं. करमाळा तालुक्यातील खासगी कारखानदारांना ‘बारामती ॲग्रो’च्या ऊसदाराची भीती वाटली. ‘बारामती ॲग्रो’च्या बरोबरीने भाव द्यावा लागेल; म्हणून आदिनाथ आम्हाला मिळू नये, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा भैरवनाथ शुगर, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे दोन साखर कारखाने करमाळा तालुक्यात आहेत. त्यामुळे रोहित पवार यांचा रोख सावंत व शिंदे यांच्याकडे असल्याचे यातून स्पष्ट होते. करमाळा तालुक्यातील खासगी कारखानदारांना ‘बारामती ॲग्रो’च्या बरोबरीने दर द्यावा लागला असता. त्यात त्यांना ४०० ते ५०० रुपये जादा द्यावे लागले असते. त्यामुळे ‘बारामती ॲग्रो’च्या विरोधात सर्वजण एकत्र आले. मात्र, राजकारण्यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

आदिनाथला विरोध झाल्यानंतर हळगावचा कारखाना घेतला

आदिनाथ साखर कारखान्यास विरोध झाल्यानंतर आम्ही हळगाव येथील साखर कारखाना चालवायला घेतला. तो कारखाना आता बारामती ॲग्रोच्या मालकीचा झाला आहे. त्याशिवाय बारामती ॲग्रोची गाळप क्षमताही आम्ही वाढवली आहे. करमाळा तालुक्यातील दररोज सहा ते सात हजार टन उसाचे गाळप आम्ही सध्या करत आहोत, असेही स्पष्ट केले.

सावंत कर भरतील, असं वाटत नाही

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा करमाळा तालुक्यातील विहाळ येथे भैरवनाथ शुगर कारखाना आहे. या कारखान्याला विहाळ ग्रामपंचायतीने कर भरण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. सत्तेवर असलेल्या लोकांना अहंकार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कारखान्याने ग्रामपंचायतीचा कर भरला पाहिजे. पण सावंत कर भरतील असं वाटत नाही. आदिनाथ कारखान्याबाबत सावंतांनी स्वतःचं हित पाहूनच तो बारामती ॲग्रोला मिळू दिला नाही, असा दावाही पवार यांनी केला.

‘आदिनाथ’बाबत आम्ही आशावादी

‘बारामती ॲग्रो’ला आदिनाथ कारखाना मिळण्याच्या संदर्भात मी अजूनही आशावादी आहे. आदिनाथचा वाद सध्या न्यायालयात सुरू आहे. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल. कारखाना आमच्या ताब्यात येईल. त्यानंतर आम्ही आदिनाथ सुरळीत चालवून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT