Solapur News : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यातील सख्य संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला माहिती आहे. पण, हे दोन्ही देशमुख आणि आमदार प्रणिती शिंदे हे बिल्डर असोसिएशनच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना सुभाष देशमुख यांनी सोलापूरचा उल्लेख ‘एक मोठं खेडं’ असा केला. तो शब्द विजयकुमार देशमुख यांना खटकला आणि त्यांनी तो आपल्या भाषणात बोलूनही दाखवला. (Vijay Deshmukh did not like Subhash Deshmukh's mention about Solapur)
बांधकाम क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या मशिनरीचे प्रदर्शन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सोलापुरात आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख प्रणिती शिंदे हे तीनही आमदार उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही देशमुखांमध्ये ‘मोठं खेडं’ यावरून जुगलंबदी रंगली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुभाष देशमुख म्हणाले की, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया यांनी विकासासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व घ्यावे. सामाजिक बांधिलकी म्हणून असोसिएशनने एक खेडं...मोठं खेड (सोलापूर) हे अधिक मोठं कसं करता येईल. राज्यभरात आमचं सोलापूरचं नाव कसं करता येईल, यासाठी देशमुख-देशमुख म्हणून आपण काम करू. माझ्या शब्दाला तुम्ही तेवढी तरी किंमत द्यावी, अशी आपल्याला विनंती करतो.
व्यासपीठावर उपस्थित असोसिएशनचे अध्यक्ष सचिन देशमुख यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत सुभाष देशमुख म्हणाले की, मी प्रणिती शिंदे यांना तेच म्हटलं. इथं स्टेजवर आणखी एक देशमुख आहे. या ठिकाणी तीन देशमुख आहेत. देशमुखांची मेजॉरिटी आहे. देशमुखांनी मागणी केलेली आहे, बहुमतानं मागणी केलेली आहे आणि मंजूर करणाराही देशमुख आहे, त्यामुळे मला खात्री आहे की बिल्डर असोसिएशन सोलापूरचे पालकत्व नक्की घेईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
सुभाष देशमुखांच्या भाषणानंतर बोलायला उठलेले विजयकुमार देशमुख म्हणाले की, सोलापूर हे एकेकाळी सोन्याचा धूर निघणारे शहर होते. अनेक मोठमोठे कारखाने आणि कापड उद्योग येथे होते. त्यानंतर चादर बनविण्याचे कारखाने सोलापूर शहरात चालू झाले. हे चादरीचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते. पण, सोलापूर शहराला सुभाषबापूंनी खेडं असं का म्हटलं, हे मला कळालं नाही. बापूंना असं का म्हणावं वाटलं, हे मला कळत नाही. कारण बापू एक वेळा खासदार, तीन टर्म आमदार आहेत, असा चिमटाही काढला.
सर्वांना सोबत घेऊन सोलापूर शहराचा विकास करणं, आम्हा लोकप्रतिनिधीचं काम आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण, सोलापूर शहराच्या विकासासाठी बिल्डर असोसिएशन बरोबर राहिल, असे मुळे आणि चुंबळकर यांनी सांगितले आहे. आपल्या गावचा विकास व्हावा, ते गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त व्हावे, यासाठी सातत्याने असोसिएशने सदस्य काम करत आहेत, त्याबद्दल असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो, असेही माजी पालकमंत्री यांनी नमूद केले.
विजयकुमार देशमुख म्हणाले की, सोलापूर हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार आहे. सोलापुरात रस्त्याचे जाळे आहे. रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे. सोलापुरात जमिनीच्या किंमतीही कमी आहेत आणि मॅन पॉवरही उपलब्ध आहे. त्यामुळे सोलापूरचा विकास आपण सर्व मिळून करूया.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.