Solapur Political : सोलापूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून बांधण्यात आलेल्या 'रे' नगरातील 30 हजारपैकी 15 हजार घरांचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्याचे ट्रीपल इंजिन म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही व्यासपीठावर उपस्थित होते.
परंतु या कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान अजित पवारांसमोरच राज्यात पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार सत्तेत येणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच पंतप्रधान मोदी यांनीदेखील ट्रीपलऐवजी महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारच्या नेतृत्वात विकासाची कामे झपाट्याने होत असल्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे महायुती सरकारमध्ये अजित पवार गटाला बेदखल केले जात आहे का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करून राज्यात शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले होते. सत्तेचा हातचा घास हिरावल्यामुळे विरोधकांकडून या सरकारला तीनचाकी रिक्षा म्हणून वारंवार हिणवण्यात आले. त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करीत ठाकरे सरकार अस्थिर केले आणि महाविकास आघाडी सरकारची रिक्षा उलटली. पुढे भाजपला शरण गेलेल्या शिंदे गटाने राज्यात डबल इंजिन सरकार अस्तित्वात आणले.
अजित पवारांना न जमलेला प्रयोग शिंदेनी यशस्वी करून दाखवला होता. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा फारसा फायदा होणार नसल्याचा अंदाज भाजपला सहा महिन्यातच आला. दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करीत नवा डाव टाकला अन् आठवडाभरातच राष्ट्रवादीला खिंडार पडले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षातील अडचणीत आलेल्या शिलेदारांना एकत्र करून अजित पवारांनी आपला स्वतंत्र गट "तिसरे इंजिन" म्हणून शिंदे - फडणवीसांच्या "डबल इंजिन" सरकारला जोडून टाकला. महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, त्यामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, असेही एक कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाकडून देण्यात आले होते.
मात्र ज्यावेळी अजित पवार राष्ट्रवादी फोडून सत्तेत सहभागी झाले त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचे सहर्ष स्वागत केले. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात चालवले जाणारे ‘डबल इंजिन’ सरकार आता ‘ट्रीपल इंजिन’ सरकार झाल्याची फुशारकी त्यांनी मारली. मात्र अलिकडच्या काळात अजित पवारांचे तिसरे इंजिन भाजप - शिवसेना (शिंदे गट) सरकारकडून बेदखल केले जात असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहे.
सोलापुरातील रे-नगरच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी दावोसला गेलो होतो. त्या ठिकाणी फक्त मोदींच्या नावाची चर्चा होत होती. तिथे जगभरातून आलेले उद्योजक, राज्यकर्त्या प्रतिनिधींनी भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे मत व्यक्त केले. त्यांना तशी खात्रीच असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.
तसेच देशात मोदी सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातही "आमचे डबल इंजिन सरकार" पुन्हा सत्ता स्थापन करेल, त्यामुळे दावोसमधील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रावरही विश्वास व्यक्त केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यातून शिंदे यांनीदेखील ट्रीपलऐवजी "डबल इंजिन" सरकार असा उल्लेख करीत अप्रत्यक्षपणे अजित पवार गटाला सत्तेतूनच बेदखल केल्याचे दिसून येते.
पंतप्रधान मोदी यांनीदेखील आपल्या भाषणात सुरुवातीलाच महाराष्ट्राचा गौरव हा येथील कष्टकरी आणि प्रगतिशील सरकारमुळे होत असल्याचा उल्लेख केला. त्याच वेळी मोदी यांनी अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख करणे टाळल्याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील "डबल इंजिन" सरकारमुळे विकासाची कामे झपाट्याने होत असल्याचा उल्लेख केला होता.
त्यामुळे राज्यात ट्रीपल इंजिन सरकार अस्तित्वात असल्याचा विसर मोदी यांना पडला, की अजित पवार गट भाजप आणि शिवसेनेकडून जाणिवपूर्वक बेदखल केला जात आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून शरद पवारांसह सर्वसामान्य जनतेनेदेखील अजित पवारांवर झालेल्या 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
त्यातच पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांनी गतनिवडणुकीत राष्ट्रवादीवर निशाणा साधताना अजित पवारांच्या घोटाळ्याचाच उल्लेख वारंवार केला होता. त्यासंबंधीचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे नव्याने अस्तित्वात आलेल्या भाजप-शिवसेना युतीला अजित पवार गटाच्या तिसऱ्या इंजिनाची ताकद लोकसभेपुरतीच मर्यादित ठेवायची आहे काय? अशी शंका ट्रीपलऐवजी डबल इंजिनच्या उल्लेखावरून उपस्थित केली जात आहे.
(Edited by Amol Sutar)
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.