Satara Mahayuti : लोकसभा निवडणूक लवकरच जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर आज सातारा लोकसभेसाठी महायुतीच्या घटक पक्षांचा महामेळावा साताऱ्यात होत आहे. उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळून महायुती आज (ता.14) गांधी मैदानावरून लोकसभेचे रणशिंग फुंकणार आहेत.
सातारा लोकसभा मतदारसंघ सध्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या मतदारसंघात लक्ष घातले आहे. महायुतीत तर येथून उमेदवार देण्यासाठी स्पर्धा लागली आहे. एकीकडे भाजपकडून पहिल्यापासून तयारी सुरू आहे, तर हा मतदारसंघ आमच्या हक्काचा म्हणून एकनाथ शिंदे गट शिवसेनेने शड्डू ठोकला आहे.
तर अजित पवार गट राष्ट्रवादीने उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सातारा लोकसभेवरून महायुतीत सध्या अंतर्गत धुसफुस सुरू आहे. पण ही धुसफुस न दाखवता आम्ही लोकसभेसाठी एकत्र आहोत हे दाखवण्यासाठी आज साताऱ्यातील गांधी मैदानावर महायुतीचा महामेळावा होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, महेश शिंदे, दीपक चव्हाण, नितीन पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, विक्रम पावसकर, धैर्यशील कदम, पुरुषोत्तम जाधव, संजीवराजे निंबाळकर, चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यातून महायुतीची ताकद आज जिल्ह्यात दिसणार आहे. एकमेकातील वाद, द्वेष विसरून जिल्ह्यातील महायुतीचे नेते एका व्यासपीठावर दिसणार आहेत. मेळाव्यातून महायुतीचे शक्तिप्रदर्शन पहायला मिळणार आहे. तर महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांवर महायुतीचे नेते कोणती तोफ डागणार यांचीच उत्सुकता आहे.
महायुतीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. तर मतदारसंघावरून शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीत दावे प्रतिदावे रंगले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक उमेदवारांच्या साक्षीने आज साताऱ्यात महायुती लोकसभेचे रणशिंग फुंकत आहे. उमेदवारीबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली आहे. सातारा व माढा दोन्ही मध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून आणण्याचा चंग जिल्ह्यातील नेत्यांनी बांधला आहे. आजच्या मेळाव्यात महायुतीची ताकत पाहायला मिळणार आहे.
हे आहेत इच्छुक...
भाजप : खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील.
शिवसेना : पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव.
राष्ट्रवादी : रामराजे नाईक निंबाळकर, नितीन पाटील.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.