VasantDada Patil - Rajiv Gandhi- Vishal Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Loksabha Election : 'राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार आणि...'

Deepak Kulkarni

Sangli News : महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम होता.पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीरही करुन टाकली.आणि तिथेच महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला.मागील 5 वर्षांपासून लोकसभेची तयारी सुरू केलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी ठाकरेंच्या या कुरघोडीवरुन उघड-उघड नाराजीही व्यक्त केली. ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सांगलीवरुन गेल्या 15 दिवसांपासून घमासान सुरु होते.पण ठाकरेंनी माघार घेतलीच नाही उलट काँग्रेसलाच दोन पावलं माघारी यावं लागलं.मोठा राजकीय वारसा पाठिशी असतानाही विशाल पाटलांना आपली तलवार म्यान करावी लागली.

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांसाठी (Vishal Patil) आमदार विश्वजित कदमांनी दिल्लीवारीही केली. त्यांनी सांगलीचा मुद्दा हायकमांडपर्यंत पोटतिडकीने पोहचवला. पण विशाल पाटलांच्या पदरी निराशाच आली.याच पार्श्वभूमीवर प्रसिध्द साहित्यिक विश्वास पाटलांची सोशल मीडियावरील पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

विशाल पाटलांना उमेदवारी न मिळाल्याने सांगली काँग्रेसमध्ये तीव्र नाराजीची लाट आहे.विशेष म्हणजे विश्वजित कदमांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत विशाल पाटलांनी अवाक्षरही काढले नाही.त्यांच्या चेहर्यावरची नाराजी लपून राहिली नव्हती.आता याच नाराजीवर विश्वास पाटलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

लेखक विश्वास पाटील यांनी सांगलीतील नाट्यमय घडामोडींवर भाष्य केले आहे.ते म्हणाले, वसंतदादा पाटील (VasantDada Patil) यांच्या व्यक्तिमत्वाची आणि काँग्रेस पक्षावरील निष्ठेची आठवण करुन देतानाच बोफोर्समध्ये राजीव गांधी यांचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांना काय वाटलं असेल? असा सवाल केला आहे. त्यांनी राजीव गांधींचे पंतप्रधानपद वाचवणाऱ्या वसंतदादांचा नातू निराधार आणि बेदखल झाला असून सांगलीत काँग्रेसचा करूण अंत झाला असल्याचं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

विश्वास पाटील पोस्टमध्ये म्हणतात, काल सांगलीतील स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटीच्या इतिहास प्रसिद्ध कार्यालयाच्या डोक्यावरील “काँग्रेस” हा शब्दच कार्यकर्त्यांनी पुसून काढल्याचे दृश्य टीव्हीवर पाहिले. पाठोपाठ मिरज काँग्रेस कमिटीच बरखास्त केल्याच्या ठराव ऐकला आणि अंगावर काटा उभा राहिला. एकेकाळी काँग्रेसच्या त्या इमारतीच्या बांधकामासाठी सांगलीतल्या रस्त्या रस्त्यात आपल्या धोतराचा सोगा करून वर्गणी गोळा करण्यासाठी वसंतदादा नावाचे शेतकरी लोकनेते पायपीट करत हिंडले होते. महाराष्ट्रात रक्तघाम गाळून काँग्रेस वाढवणारे दोन बलाढ्य नेते म्हणजे एक यशवंतराव आणि दुसरे वसंतदादा यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दादा तुम्हीच नांगर हातात घ्या, तरच नांगरट चांगली होईल. दादा स्वातंत्र्यलढ्यातील एक महान सैनिक, ज्यांनी सांगलीच्या तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून ब्रिटिशांच्या हातावर तुरी दिल्या होत्या.

दादा आम्हाला नेहमीच सांगत, “माझे शालेय शिक्षण फारसे झाले नसल्याने मी मंत्री व्हायचे कधी माझ्या डोक्यात नव्हते. तेव्हा आमच्या मिरज तालुक्यात तीन बॅरिस्टर होते.पैकी काहीना मी राजकारणात आणले. पण त्यांची कार्यपद्धती बघून कार्यकर्तेच माझ्याकडे ओरड करू लागले की, दादा तुम्हीच नांगर हातात घ्या, तरच नांगरट चांगली होईल. म्हणूनच मी नाईलाजाने राजकारणात आलो. मंत्री झालो.”

दादा महाराष्ट्राचे अनेकदा मुख्यमंत्री कोणा बुवाच्या किंवा बाबाच्या आशीर्वादाने नव्हे तर जनतेच्या पाठिंब्याच्या रेट्यामुळेच झाले होते. 1987 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सच्या तोफा खरेदीतील भ्रष्टाचाराचे मोठे वादळ घोंगावत आले होते. त्याचे स्वरूप इतके विराट होते की, कोणत्याही क्षणी राजीव गांधींना (Rajiv Gandhi) राजीनामा द्यावा लागणार होता. काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात प्रचंड खदखद होती. त्यावेळी ग्यानी झेलसिंग हे राष्ट्रपती होते. त्यांनी जाहीरपणे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडे बोफोर्सचे डॉक्युमेंट्स अवलोकनार्थ मागितले होते. जे भारत सरकारने त्यांना अजिबात दिले नाहीत.

त्यावेळी राजीव गांधींचे सरकारच बरखास्त करायचे राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी मनोमन ठरविले होते, हा इतिहास आहे. त्याच काळात वसंतदादा हे राजस्थानचे राज्यपाल होते. मी नुकताच कॉलेजातून बाहेर पडल्यावर क्रांतिसिंह नाना पाटील आणि पत्री सरकार या विषयावर “क्रांतीसुर्य” नावाची कादंबरी लिहिली होती. ती वसंतदादांना खूप आवडली होती. त्यांनी मला कौतुकाने बोलावून घेतले. त्या दिवसात दादा व मी संयुक्तपणे आझादीनंतरचा महाराष्ट्र या विषयावर पुस्तक लिहायचे ठरविले होते. त्यानिमित्ताने मी जयपुरला चार-पाच वेळा गेलो होतो. दादांचे तिथले राजभवन, त्या पाठीमागची ती 8-10 एकराची विस्तीर्ण हिरवळ, त्यावर पिसारा फुलवत नाचणारे साठसत्तर मोर मला अजून आठवतात.

दादांच्या नकारानंतर पक्षातील संभावित बंड शमले

बोफर्सच्या त्या वादळात राजीव गांधींना पंतप्रधानपदावरून हटविण्यासाठी ग्यानी झेलसिंग इतके पेटून उठले होते की, त्यांनी काँग्रेस अंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. राजीवजींच्या ठिकाणी व्यंकटरमण किंवा पी. व्ही. नरसिंहराव यांना पंतप्रधान बनवायचे त्यांनी नक्की ठरवले होते. मात्र ऐनवेळी नरसिंहराव यांनी माघार घेतली. “एवढे मोठे बंड करायचे तर माझ्या ऐवजी ग्यानीजी आपण वसंतदादांचा विचार करा. ते स्वतंत्रता सेनानी आहेत. त्यांचा देशातला लोकसंग्रह माझ्यापेक्षा कितीतरी मोठा आहे” असा सल्ला नरसिंहरावांनी ग्यानीजीना दिला. तेव्हा राष्ट्रपती ग्यानीजीनी वसंतदादांना जयपूरहून तातडीने बोलावून घेतले. पक्षाला आणि राष्ट्राला आपल्या नेतृत्वाची गरज कशी आहे हे पटवून सांगितले.

दादांच्या रक्तात आणि हाडामांसात काँग्रेस (Congress) इतकी भिनलेली होती की, त्यांनी त्यापुढे इतिहासाने व कळीकाळाने देऊ केलेल्या सर्वोच्च सिंहासनाचा स्वार्थ आपल्या अंगाला चिकटूही दिला नाही. ते तडक राष्ट्रपती भवनातून राजीव गांधी यांच्या निवासस्थानी गेले. त्यांनी “राजीवजी आपका सिंहासन खतरे मे है” असे सांगितलेच. शिवाय काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभावित बंडामध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत, याची इत्यंभूत माहिती राजीव गांधींना दिली.

दादांच्या नकारानंतर पक्षातील संभावित बंड शमले. हळूहळू बोफर्सचे वादळही शांत होत गेले. ग्यानी झेलसिंग यांचा कार्यकाल सुद्धा लवकरच संपला. राजीवजींनी त्यांना राष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म दिली नाही. त्यांनी मागितलीही नाही.

यशवंतराव व वसंतदादांचे या महाराष्ट्रावर प्रचंड उपकार आहेत. पण त्यांच्या पक्षाचे लोक सुद्धा त्यांना लोणच्या पुरते वापरतात. एकच उदाहरण सांगायचे तर अंधेरी पश्चिमला मंत्रालयातील अनेक निम्नस्तर सरकारी कर्मचाऱ्यांना निवासी संकुले व स्वतःचे फ्लॅट्स मिळाले आहेत. ते केवळ वसंतदादा यांच्यामुळेच. वसंतदादा आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांमध्येही एक धमाल असे वेगळे नाते होते. जेव्हा मुंबईत मुरली देवरा मराठी माणसांची कळ काढायचे. तेव्हा मुख्यमंत्रीपदी असलेले दादा ऐनवेळी असे एखादे वाक्य बोलायचे की, ज्यामुळे शिवसेनेचे अनेक उमेदवार निवडून यायचे हा इतिहास आहे.

स्वर्गामध्ये वसंतदादांच्या आत्म्याला काय वाटले असेल?

काल जेव्हा स्टेशन रोडवरच्या त्या ऐतिहासिक इमारतीवरील “काँग्रेस” हा शब्द डोळ्यात पाणी आणत पुसून काढण्याचे दुर्दैव सांगलीकरावंर ओढवले. तेव्हा स्वर्गामध्ये वसंतदादांच्या आत्म्याला काय वाटले असेल? ते संपतनाना, ते विठ्ठल दाजी, ते विठ्ठल आण्णा, विजयराव धुळूबुळू, देवाप्पांना आवटी, पैलवान मारुती माने, डॉ. चोपडे, नवले जी, गौरीहर सिंहासने, विष्णूअण्णा, आज या साऱ्यांच्या जीवाला काय वाटत असेल? वसंतदादांच्या ध्येयासाठी झटलेल्या डॉ.शालिनीताई पाटील ह्यांचे कर्तृत्व सुद्धा डोळ्याआड करता येणार नाही, ते मान्यच करावे लागेल!

...ते पाहताना मन रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहत नाही!

मी कोणा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. पण आज दादांच्या आशीर्वादावर अनेक सहकार सम्राट झाले. शिक्षण सम्राट झाले. कोट्याधीशांची मांदियाळी या भूमीत निर्माण झाली. पण जनता आणि सर्वच पक्षांचे नेते वसंतदादा आणि यशवंतराव यांना ज्या प्रकारे विसरत चालले आहेत. हा महाराष्ट्र फक्त दगडांचा नव्हे तर दगडाच्या काळजाचा आहे हे सिद्ध करत सुटले आहेत, ते पाहताना मन रक्तबंबाळ झाल्याशिवाय राहत नाही.

चालून आलेल्या पंतप्रधानपदावर “निष्ठा” ह्या एका शब्दासाठी ज्या वसंतदादांनी लाथ मारली होती. त्याच महापुरुषाच्या नातवाला दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या पद्धतीने आज नाकारले जात आहे. ज्या प्रकारे वसंतदादांची परंपराच मोडीत काढण्याचे काम सुरू आहे ते बघून मात्र मनाला खूप क्लेश वाटतो.

कालाय तस्मय नमः या शिवाय दुसरे काय!

असेही विश्वास पाटलांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. तूर्तास तरी विशाल पाटलांचं बंड थोपवण्यात काँग्रेससह महाविकास आघाडीला यश आलं आहे. पण भविष्यात विशाल पाटील सांगलीत काँग्रेससह आघाडीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT