Udayshankar Patil
Udayshankar Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur BJP : सोलापूर ‘शहर मध्य’साठी भाजपचा हुकमी हिंदुत्ववादी चेहरा

प्रमोद बोडके

Solapur Political News : लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूर मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत पराभूत झाले. लोकसभा निवडणुकीत शहर मध्यमधून भाजपच्या उमेदवाराला मताधिक्य मिळते; परंतु विधानसभा निवडणुकीत शहर मध्यमधून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विजयी होतात. हे कोडे अनेकांना सुटले नाही. (Selection of Udayshankar Patil as the in-charge of Solapur City Central Constituency)

सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या आतापर्यंत तीन वेळा विजयी झाल्या आहेत. या मतदार संघात लोकसभा निवडणुकीला एकवटणाऱ्या हिंदुत्ववादी मतांची विधानसभा निवडणुकीला विभागणी होते.

ही विभागणी काँग्रेससाठी फायद्याची ठरते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळून थेट ताकदीचा युवा आणि नवा चेहरा देण्याचा प्रयत्न भाजपने उदयशंकर पाटील यांच्या माध्यमातून केल्याचे स्पष्ट होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर शहरातील तीन विधानसभा मतदार संघापैकी दोन विधानसभा मतदारसंघात विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांच्या रुपाने भाजपचे आमदार आहेत. दोन विद्यमान आमदार असताना उदयशंकर पाटील यांना भाजपने का घेतले? हा प्रश्‍न त्यांच्या प्रवेशावेळी उपस्थित झाला होता.

देशभरात भाजपने उमेदवारी देण्यासाठी लावलेला वयाचा निकष, दोन्ही आमदारांचे सध्याचे वय पाहता पाटलांचा राजकीय पत्ता भाजप उत्तरमध्ये टाकणार की दक्षिणमध्ये? याचे कोडे अनेकांना पडले होते. महाविजय-२०२४ डोळ्यासमोर ठेवून भाजपने पाटलांवर शहर मध्यच्या प्रभारीची जबाबदारी सोपविली आहे. भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुवर्ण मध्य साधल्याचे दिसत आहे.

सोलापूर शहर उत्तर आणि सोलापूर दक्षिण या दोन्ही विधानसभा मतदार संघात लिंगायत समाज निर्णायक आहे. पाटील यांच्या घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे. उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदार संघात पाटील घराण्याला मानणारा सर्वजातीय वर्ग आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीत उदयशंकर पाटील हे उत्तर किंवा दक्षिणमधून उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात, असाच अनेकांचा अंदाज होता. त्यामुळे भाजपच्या दोन्ही विद्यमान आमदारांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता दिसत होती. भाजपने सोलापूर शहरातील तीनही मतदार संघ ताब्यात घेऊन शतप्रतिशत भाजपसाठी वाटचाल सुरू केल्याचे या नियुक्तीवरून दिसत आहे.

शहर मध्य मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या मोहिनी पत्की व शिवसेनेचे महेश कोठे यांच्यात हिंदू मतांची विभागणी झाली. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष महेश कोठे व शिवसेना उमेदवार दिलीप माने यांच्यात हिंदू मतांची विभागणी झाली.

लोकसभेसाठी एकवटणारा हिंदू मतदार विधानसभा निवडणुकीत कोठे जातो? याचा शोध अनेकांना अद्यापही लागलेला नाही. लोकसभेला एकवटणारा हिंदू मतदार विधानसभा निवडणुकीतही एकत्रित करण्यासाठी उदयशंकर पाटील यांच्या रुपाने युवा हिंदुत्ववादी चेहरा भाजपने पुढे केल्याचे दिसत आहे.

शिंदे सेनेचे सावंत, अजितदादांचे कोण?

सोलापुरातील तीनपैकी दोन मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार असल्याने महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शहर मध्यवर लक्ष्य केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतर्फे प्रा. शिवाजी सावंत यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही आगामी काळात इच्छुक समोर येण्याची शक्यता आहे. या मतदार संघात कन्नड व तेलुगु बहुभाषिक समाज आहे. या मतदार संघात बाहेरचा उमेदवार चालेल का? या बद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT