Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Food Excellence Center : अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार, बारामतीला नेणार नाही; अजितदादांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar Clarification Solapur Project : श्री अन्न उत्कृष्टता केंद्राचा प्रकल्प वेगळा आहे आणि बारामतीत होणारा प्रकल्प वेगळा आहे. त्याबाबत गल्लत करण्यात आलेली आहे.

मिलिंद संगई

Baramati News : सोलापूर येथील नियोजित श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे बारामतीला आणण्यात आलेला नाही, तो प्रकल्प सोलापूरसाठीच आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केला. (Solapur's Center of Food Excellence will not move to Baramati : Ajit Pawar)

सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्यात आले आहे, अशा स्वरूपाच्या बातम्या आज (ता. २६ नोव्हेंबर) सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याची तीव्र प्रतिक्रिया सोलापुरात उमटली असून विशेषतः भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. एरवी शांत असणारे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनीही या प्रश्नावर विरोधाची भूमिका घेतली होती. त्याची चर्चा आज दिवसभर सोलापुरात होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दक्षिण सोलापूरचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांनी टोकदार टीका करताना कोणत्याही परिस्थितीत सोलापुरातील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बाहेर जाऊ देणार नाही. प्रसंगी आमदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. सर्वच बारामतीत नेण्याची प्रथा सुरू केली आहे काय, असा सवाल त्यांनी विचारला होता.

या सर्व प्रकारावर बारामतीच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा कोणताही विचार नाही. स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत मिलेट व्हॅल्यूचेंज डेव्हलपमेंट अँड कॅपसिटी बिल्डींग या योजनेचे फूड इनक्युबेशन सेंटर बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, श्री अन्न उत्कृष्टता केंद्राबाबत सोलापुरात विविध स्वरूपाच्या बातम्या आलेल्या आहेत. हे केंद्र सोलापुरातून बारामतीला हलविण्यात आले आहे, असे नमूद करण्यात आलेले आहे. पण, श्री अन्न उत्कृष्टता केंद्राचा प्रकल्प वेगळा आहे आणि बारामतीत होणारा प्रकल्प वेगळा आहे. त्याबाबत गल्लत करण्यात आलेली आहे.

सोलापूरमध्ये श्री अन्न उत्कृष्टता केंद्र करण्याचा निर्णय मागेच घेण्यात आलेला आहे. बारामतीमधील प्रकल्प वेगळा आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने साठ टक्के म्हणजेच चार कोटींचा, तर केंद्र सरकारने पावणे तीन कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. हैदराबादनंतर देशात महाराष्ट्रात असे केंद्र होत आहे. बारामतीच्या जनतेने मला निवडून दिलेले आहे, त्यांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT