Vikrambaba Patankar, Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai : पाटणमधून शंभूराज देसाई फिक्स, तरी भाजपची बांधणी! महायुतीत चाललंय तरी काय ?

Vishal Patil

Satara Political News : लोकसभा निवडणुका होण्यापूर्वीच विधानसभा मतदारसंघ सक्षम करण्यासाठी भाजपाकडून रणनीती आखली जावू लागली आहे. आगामी काळात कोणत्याही क्षणी लोकसभेचा बिगुल वाजेल यासाठी प्रत्येक पक्ष चाचपणी करत आहे.

काहींनी लोकसभेचे उमेदवार ठरवले असले तरी इच्छुकांची नाराजी ओढावू नये, यासाठी जाहीर केले नाहीत. अशातच लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेची महायुतीतील नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. यामध्ये सरकारमधील वजनदार मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघातच भाजपाने बांधणी सुरू केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

पाटण विधानसभा मतदारसंघात महायुतीतून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shanbhuraj Desai) शिवसेनेतून फिक्स आहे. मात्र भाजपाने आपली ताकद वाढविण्यावर भर देत पक्ष बांधणी करू लागला आहे. विधानसभा निवडणूक प्रमुखपदी आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची नियुक्ती केली आहे.

त्यांनी पाटण विधासभेतील गावागावात भाजपची ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. यामुळे पाटणमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता विधानसभेला राजकीय डावपेच कसे खेळले जाणार यांचा अंदाज पाटण तालुक्यातील जनता बांधू लागले आहे.

विक्रमबाबा पाटणकर (Vikrambaba Patankar) यांची नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीकांत भारतीय, लोकसभा संयोजक सुनील काटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

पाटण विधानसभा मतदारसंघात मंत्री शंभूराज देसाई महायुतीतून फिक्स उमेदवार आहेत. यातच भाजपाने मतदारसंघात बांधणी का सुरू केली, असा प्रश्न देसाईंच्या गोटातून उपस्थित केला जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी तात्काळ नियुक्तीचे आदेश देत पाटणकरांची निवड केल्याने पाटणमध्ये महायुतीत नेमके चाललंय तरी काय, अशी चर्चा सुरू आहे.

कोण आहेत विक्रमबाबा पाटणकर ?

सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर हे राष्ट्रवादीच्या विक्रमसिंह पाटणकर गटाचे कट्टर आणि निष्ठावंत होते. त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अर्थ खाते होते. पाटण नगरपंचायत, पाटण पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषद आणि पाटण विधानसभेला निर्णय घेणाऱ्या पहिल्या फळीतील सक्रीय पदाधिकारी म्हणून काम पाहत होते.

पाटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांच्या कानाखाली लावली होती. त्यांनी 2017 साली जिल्हा परिषदेचे तिकिट नाकारल्याने राष्ट्रवादीची साथ सोडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनेक दिवस चाचपणी..

राष्ट्रवादीतून बाहेर पडताच त्यांनी चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क वाढवला होता. तर 2019 साली आमदार शंभूराज देसाईंनी साथ देत पाटणकर गटाच्या विरोधात काम केले. राष्ट्रवादी फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अनेक बॅनरही त्यांनी लावले होते. त्यामुळे विक्रमबाबा पाटणकर राष्ट्रवादी (अजित पवार गट) की भाजपात जाणार याबाबात अनेक दिवसांपासून चर्चा होती. त्यांनी अखेर उदयनराजेंच्या (Udaynraje) पुढाकारातून भाजपाचे कमळ हाती घेतले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT