Sadabhau Khot, Devendra Fadanvis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : सदाभाऊंचं गाऱ्हाणं भाजप ऐकणार.. ? हातकणंगलेच्या जागेसाठी रयत संघटना आग्रही

Chaitanya Machale

Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागा जिंकून आणण्याचा ध्यास केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने घेतला आहे. महाराष्ट्रातून लोकसभेच्या अधिकाधिक जागा निवडून आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघनिहाय रणनीती आखली जात आहे.

लोकसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची असल्याने जो उमेदवार विजयी होऊ शकतो, त्यालाच तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी काही मतदारसंघांतील विद्यमान खासदारांचे पत्ते कटदेखील केले जाणार असून, त्या जागी मतदारांच्या मनातील चेहरा देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष यांच्या महायुतीकडून केला जाणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरसह हातकणंगले लोकसभेच्या जागेचा विचार होऊ शकतो.

शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहणे पसंत केले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत या जागेवर शिंदे गटाचा दावा राहणार आहे. ही जागा शिंदे यांच्या गटाकडे असल्याने महायुतीमध्ये खासदार माने यांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे.

मात्र, त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेली पराभवाची सावली हटवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी या मतदारसंघात कंबर कसली आहे. ही जागा भाजपच्या उमेदवाराने लढवावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे. त्यातच आता भाजप महायुतीत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ही जागा रयत क्रांती संघटनेला द्यावी, अशी मागणी केली आहे. खोत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या जागेची मागणी केली आहे.

विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या अगोदर या मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी खोत हे शेट्टी यांच्यासोबत होते. त्यानंतर या दोघांमध्ये मतभेद होऊन सदाभाऊ खोत यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर मंत्रिमंडळात खोत यांना स्थान मिळाले होते. आगामी लोकसभेसाठी महाविकास आपली योजना ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी दाखवली आहे.

मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत जाण्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही ठरलेला नाही. विद्यमान खासदार माने यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेल्या नाराजीमुळे त्या जागेवर विजय मिळेल याची खात्री भाजपला नाही. त्यामुळे माने यांच्याऐवजी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या नावाची चाचपणी भाजपकडून सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे असतानाच भाजपला पाठिंबा दिलेल्या सदाभाऊ खोत यांनीदेखील ही जागा आपल्याला द्यावी, अशी मागणी करत भाजपला पेचात पकडले आहे. या जागेवर भाजपने दुसरा उमेदवार उभा करायचा ठरवल्यास माजी मंत्री सदाभाऊ खोत हे नाराज होतील. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपला त्यांना इतर पद द्यावे लागेल. लोकसभेच्या निमित्ताने भाजपवर दबाव टाकण्यासाठीच खोत यांच्या संघटनेने या जागेवर दावा केल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT