Mumbai News : राज्याच्या राजकारणात गेल्या चार दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शनिवारी सायंकाळी शपथ घेतली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिवसभर घडत असलेल्या घडामोडीवर ट्विट करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रफुल पटेलांच्या स्वप्नांना सुरुंग लावल्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बारामतीजवळील विमान अपघातात अजित पवार यांचे बुधवारी निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या दोन दिवसापासून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री धनंजय मुंडे बैठकांवर बैठका घेत आहेत. त्यातच सीएम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे एकीकडे नाराजी व्यक्त केली जात होती. दुसरीकडे प्रफुल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या पदावर दावा करणार का? अशी चर्चा रंगली होती.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नेहमीच 'मराठी माणूस' आणि 'महाराष्ट्र' या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादीसारख्या ग्रामीण महाराष्ट्रात पाळेमुळे असलेल्या पक्षाचा अध्यक्ष अमराठी नसावा, अशी भूमिका घेऊन त्यांनी अजितदादांच्या समर्थकांमध्ये भावनिक साद घातली आहे. त्यातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सर्व प्रकाराबाबत सूचक ट्विट करताना प्रफुल पटेलांच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे.
'महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !' असे ट्विट त्यांनी केले आहे.
यापूर्वीही राज ठाकरे यांनी अनेक बाबतीत ट्विट करीत राज्यातील जनतेचे डोळे उघडले आहेत. मात्र, यावेळेस त्यांनी प्रफुल पटेलांच्या स्वप्नांना सुरुंग लावताना केलेल्या ट्विटची मात्र, जोरदार चर्चा रंगली आहे. विशेषता राजकीय वर्तुळात यावर खुमसदार चर्चा ऐकावयास मिळत आहे
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल हे दिल्लीत वजन असलेले नेते आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर जर पटेलांची निवड झाली, तर विरोधक विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि मनसेकडून याला "महाराष्ट्रावर दिल्लीचे वर्चस्व" असा रंग देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ट्विटमुळे प्रफुल पटेलांची कोंडी झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.