Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar- Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti Lok Sabha Seat Allocation : अजित पवार ‘नाशिक’वरील दावा सोडणार?; भाजपने दिला नवा प्रस्ताव...

Nashik Lok Sabha Constituency : महायुतीचा मुख्य भाग असलेल्या भाजपने नाशिक मतदारसंघावरून एक नवा डाव टाकला होता. मात्र, आता हा डाव भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पुढे करून भाजपला मिळविण्याचा घाट होता.

Sampat Devgire

Nashik, 28 March : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे नाशिक लोकसभा मतदारसंघाची मागणी सोडण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावरून महायुतीमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांना एक नवा प्रस्ताव देण्यात आल्याचे कळते. या प्रस्तावाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

महायुतीचा (Mahayuti) मुख्य भाग असलेल्या भाजपने नाशिक मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) एक नवा डाव टाकला होता. मात्र, आता हा डाव भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. नाशिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाला पुढे करून भाजपला (BJP) मिळविण्याचा घाट होता. त्यावरून आता शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे अत्यंत आक्रमक झाले आहेत. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दोन वेळा थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांवर मोठा दबाव निर्माण झाल्याने त्यांनी नाशिक मतदारसंघासाठी आग्रह धरल्याचे कळते. याबाबत बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत प्राधान्याने नाशिकची चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षाकडून नाशिक मतदारसंघात ओबीसी कार्ड खेळण्याचे ठरले होते. त्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव होता. यामध्ये शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी रद्द होणार होती. राज्यातील तीन ते चार ठिकाणी शिंदे गटाच्या उमेदवारांवर अतिक्रमण होत असल्याने शिंदे गटात असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे कळते.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बुधवारी बैठक झाली होती. त्यात मतदारसंघाबाबतचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री पवार यांना देण्यात आले होते. त्यानंतर भाजपकडून राज्यसभा सदस्यत्व अथवा नाशिक लोकसभा मतदारसंघ असा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली होती. यामध्ये राज्यसभा सदस्यत्वाचा प्रस्ताव अधिक सोयीचा वाटल्याने अजित पवार गटाकडून नाशिक मतदारसंघाचा आग्रह सोडून देण्याचा विचार आहे. त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. आज रात्री या संदर्भात महायुतीचे वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय घेतील.

राष्ट्रवादी काँग्रेस सध्या नमती भूमिका घेण्यात आल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला जाऊ शकतो. या संदर्भात महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी कोणाशीही संपर्क केलेले नाही. ते मुंबईत तळ ठोकून आहेत. या सर्व नाट्यमय घडामोडीत नाशिकचा मतदारसंघ पुन्हा शिंदे गटाला जाण्याची चर्चा आहे. तसे झाल्यास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत काय निर्णय होतो, याची प्रचंड उत्सुकता गोडसे समर्थकांना लागून राहिली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT