chhagan bhujbal sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Loksabha Election 2024 : छगन भुजबळांच्या उमेदवारीत 'हे' आहेत मोठे अडथळे

Sampat Devgire

मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी नाशिकमध्ये उमेदवारी करावी अशी व्यवस्था घडवून आणण्यात आली आहे. त्यात भुजबळ यांचादेखील मनापासून सहभाग असावा, असे वाटते. मात्र, यामध्ये महायुतीतील दोन पक्षांचा मोठा अडथळा आहे. तो तिढा सोडविणे सोपे दिसत नाही.

नाशिक मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे ( Hemant Godse ) हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी दोन महिन्यांपासून प्रचार सुरू केलेला आहे. खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा देखील झालेली आहे. अशा स्थितीत शिंदे सेनेचे मनोबल टिकविण्यासाठी गोडसे हे उमेदवार असणे ही राजकीय सोय आहे. तसे न घडल्यास नकारात्मक संदेश महायुतीमध्ये जाऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भुजबळांच्या ( Chhagan Bhujbal ) उमेदवारीचा थेट संबंध सातारा मतदारसंघाची जोडला जात आहे. सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले ( Chhatrapati Udayanraje Bhosale ) यांनी थेट दिल्लीतून भाजपची उमेदवारी मिळवीली आहे. प्रत्यक्षात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे. अशा स्थितीत उदयनराजे यांना उमेदवारी दिल्यास अजित पवार गटाच्या मतदारसंघांमध्ये भाजपचे अतिक्रमण होणार आहे. त्याची भरपाई करण्यासाठी भाजपने स्वतःचा मतदारसंघ पवार गटाला देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र वाटाघाटी भाजप आणि पवार गटाच्या आणि मतदारसंघाचे बलिदान शिंदे गटाने द्यावे, अशी ही राजकीय सोय आहे. त्याला शिंदे गट राजी होईल का? हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) त्यासाठी तयार झाल्यास विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचे पुनर्वसन कसे होणार याचे उत्तर शोधावे लागणार आहे.

मंत्री भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याच विद्यमान खासदाराची फसवणूक केली, असा संदेश जाईल. नाशिकमध्ये समाज माध्यमांवर अशा पोस्टही व्हायरल होत आहेत. भुजबळांच्या उमेदवारीत हा मोठा अडथळा आहे. त्यावर सहज सोपा पर्याय शोधणे महायुतीच्या घटक पक्षांना काहीसे अवघड आहे. यात सगळी सोय भाजपची होत असल्याने सहकारी पक्षांना दुय्यम वागणूक दिल्याची भावना कार्यकर्त्यांत निर्माण होऊ शकते.

मंत्री छगन भुजबळांनी नाशिक मतदारसंघातून उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या निवडक समर्थकांची मंगळवारी बंद दाराआड खलबते केली. त्यानंतर गंगापूर धरणावरील रिसॉर्टमध्ये निवडक समर्थकांशी संवाद केला. भारतीय जनता पक्षाने दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाला मतदारसंघ सोडण्यास जो विरोध केला होता. त्या विरोधाचे काय? असा प्रश्न यातून निर्माण होतो. भाजपने हे सर्व भुजबळांसाठी तर केले नाही ना, अशी चर्चा आता शिंदे गट करू लागला आहे.

राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री पवार गटात नाशिकमधून उमेदवारी करण्यासाठी सर्वप्रथम निवृत्ती अरिंगळे यांनी दावा केला होता. उपमुख्यमंत्री पवार यांनीदेखील अरींगळे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर अरींगळे यांनी मतदारसंघात संपर्क दौरा केलेला आहे. अरिंगळे आजच्या पुणे येथील बैठकीसाठी पूर्ण तयारीनिशी आणि समर्थकांसह सहभागी होणार आहेत. भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास अरिंगळे यांचे काय? हा राष्ट्रवादीच्या पवार गटात प्रश्न असेल. दुसरीकडे खासदार गोडसे हेदेखील अतिशय सावध आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT