Lok Sabha Election 2024 : शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हेदेखील सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. नाशिकच्या शिवसेनेसाठी हा अनपेक्षित धक्का होता. मात्र, नाशिक मतदारसंघात महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांनी या मतदारसंघावर दावा सांगितल्याने, निवडणुकीला सामोरे जाण्याआधी गोडसे यांना उमेदवारीसाठी लढावे लागणार आहे. (Latest Marathi News)
दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे (ठाकरे गट) आहे. शिवसेनेत उमेदवार आयात करण्यावर एकमत झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून खासदार गोडसे यांनीही जोरात तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपशी सख्य केले आहे. भाजपने सहा स्तरांची यंत्रणा उभी केली आहे. मात्र जागावाटपात ज्या पक्षाचा खासदार त्या पक्षाला ती देण्याची धोरणात्मक घोषणा चर्चेत आहे. अशा स्थितीत महायुतीने 'मिशन 45' मध्ये नाशिकलाही गृहीत धरले आहे. (Latest Political News)
हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळणार हे नक्की झाले आहे. महायुतीत काय होणार याची अनिश्चितता कायम आहे. उमेदवार शिंदे गटाचा आणि चिन्ह भाजपचे, हादेखील एक पर्याय चर्चेत आहे. शिंदे गटाला ही जागा मिळाल्यास त्यांच्याकडे हेमंत गोडसे वगळता अन्य उमेदवार नाही. असे असले तरी नाशिक मतदारसंघात महायुतीकडून गोडसे यांना हॅटट्रिकची संधी मिळणार का हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, कारण सहकारी भाजपमधील काही इच्छुकांकडून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. गोडसे हे कधीही पक्षसंघटनेत आपला ठसा उमटवू शकलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध राहिला आहे. मात्र कोणत्या वेळी कोणत्या हवेवर स्वार व्हावे, हे चातुर्य त्यांना अवगत आहे. याचा त्यांना लाभदेखील झालेला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर ते ठाकरे गटाला सोडून ते शिंदे गटाच्या जहाजात स्वार झाले. अशा स्थितीत शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये किती व काय स्थान मिळते, या संधीची ते वाट पाहत आहेत. हेमंत गोडसे हे संसरी (ता. नाशिक) या लहान गावातील रहिवासी आहेत. या गावातून या आधी 1996 मध्ये गोडसे कुटुंबीयांतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ गोडसे हे खासदार झाले होते. राजाभाऊ यांचे राजकीय वारस म्हणूनही हेमंत गोडसे यांच्याकडे पाहिले जाते. यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
हेमंत तुकाराम गोडसे
3 ऑगस्ट 1970
पदविका, सिव्हिल इंजिनिअरिंग
हेमंत गोडसे यांचे वडील तुकाराम गोडसे हे शेतकरी तसेच लष्कराच्या एमईएस विभागात नोकरीस होते. आई द्रौपदाबाई या गृहिणी आणि ग्रामपंचायतीच्या सदस्या होत्या. पत्नी अनिता या गृहिणी आहेत. हेमंत गोडसे यांना अजिंक्य आणि सागर ही दोन मुले आहेत. शरद तुकाराम गोडसे हे त्यांचे बंधू.
बांधकाम व्यावसायिक
नाशिक
शिवसेना (शिंदे गट)
हेमंत गोडसे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू केला. 2007 ते 2012 ते एकलहरे (ता. नाशिक) गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते. 2008 मध्ये पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले. 2009 मध्ये त्यांनी मनसेचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यात ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 2012 मध्ये ते नाशिक महापालिकेच्या विहितगाव प्रभागाच्या पोटनिवडणुकीत विजयी झाले. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते नाशिकचे खासदार झाले. यंदा त्यांनी विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारी मागितली आहे.
नाशिक मतदारसंघात हेमंत गोडसे यांनी पहिल्यांदा 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवडणूक लढवून 2,16,674 मते मिळवली. नंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या लाटेत त्यांनी 4,94,375 मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा पराभव केला. गोडसे यांच्यासाठी 2019 ची निवडणूक महत्त्वाची मानली गेली. या निवडणुकीत त्यांच्या मतांत वाढ झाली. त्यांनी 5,63,599 (50.58 टक्के) मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. यावेळी त्यांच्याविरोधात मतविभागणीची व्यूहरचना भुजबळ गटाकडून करण्यात आली होती. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला 1,09,981, तर अपक्ष उमेदवार आमदार माणिकराव कोकाटे यांना 1,34,527 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 2,71,395 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा 2009 चा फॉर्म्युला येथे उपयोगी पडला नाही. गोडसे यांनी दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली.
खासदार हेमंत गोडसे यांनी शेतकरी, शेतमजूर, गरजू रुग्णांना मदत केली आहे. कोरोना महामारीत त्यांनी केलेल्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेतली. खासदारांचा लेखाजोखा घेण्यात आला. त्यात कोरोनायोद्ध्यांच्या यादीत ते सहाव्या, तर राज्यात पहिल्या स्थानी होते. जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्टिंग लॅब उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. कोरोनाबाधितांसाठी त्यांनी दहा हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे डोस उपलब्ध केले. सिन्नर, गिरणारे, सय्यद पिंप्री येथे सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ड्रोनद्वारे सॅनिटायझर्सची फवारणी करून घेतली. विमानसेवेद्वारे नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न केले. मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ महाविद्यालयापासून विस्तारित उड्डाणपूल केला. विद्यार्थ्यांसाठी एनईईटी आणि यूपीएससी, एमपीएससी परीक्षा केंद्र सुरू केले. 26,000 सीजीएचएस सुरू केले. राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. शंभर एकरांत इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब सुरू केली. नाशिक विमानतळाचा कुरिअर हबमध्ये समावेश केला. खासगी तत्त्वावर नाशिक व निफाड साखर कारखाना चालविण्यास घेतला. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठीही त्यांनी पाठपुरावा केला. दिल्ली - मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी काम केले. 159 कोटींच्या सारथी प्रकल्पास मंजुरी मिळवून घेतली.
हेमंत गोडसे 2019 च्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी झाले.
हेमंत गोडसे यांनी 2019 च्या निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधकांवर मात करून शिवसेनेची उमेदवारी मिळवली. यावेळी त्यांच्यापुढे मतविभागणीचे मोठे आव्हान होते. विशेषतः सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात मतदारांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा संदेश देण्यात ते यशस्वी झाले. भुजबळ यांच्याविषयीची नाराजी आणि विरोधातील मते गोडसे यांच्या बाजूने वळविण्यात पडद्यामागून दोन्ही काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रयत्न केले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने वारे वाहत असल्याने खासदार गोडसे दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजयी झाले. गोडसे यांना 50 टक्क्यांहून अधिक, तर त्यांच्या विरोधकांना एकत्रितपणे 46 टक्के मते मिळाली होती.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोडसे यांनी गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचे भूमिपूजन, प्रचारासाठी बॅक ऑफिस यंत्रणा, वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी यांसह विविध स्तरांवर जोरात तयारी सुरू केली आहे. त्यांनी मतदारसंघात चर्चा होईल, असे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे. जनतेशी संपर्क, तसेच जिल्हा परिषद गटनिहाय विकासकामांना मिळालेल्या मंजुरीची प्रसिद्धी करण्यावर त्यांचा भर आहे. आचारसंहिता जाहीर होण्याआधी भूमिपूजन करण्याचा धडाका त्यांनी लावला आहे. विवाह समारंभ, वैयक्तिक गाठीभेटी, अंत्यसंस्कार, दशक्रिया आदी कार्यक्रमांना हजेरी लावण्यावर त्यांचा अनेक वर्षांपासूनचा पायंडा त्यांनी जपला आहे. गरजू रुग्णांना मदतीसाठी धार्मिक संस्था, मुख्यमंत्री निधी यांसह केंद्र शासनाच्या योजनांतून लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. नाशिकसह विविध भागांत अवकाळी पाऊस, दुष्काळाच्या पाहणीचा दौरा आणि सिन्नरला निळवंडे धरणाच्या पाण्याचे रोटेशन मिळावे, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
खासदार गोडसे यांनी समाजमाध्यमांवर सक्रिय राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. फेसबुक पेज, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातूनही त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. व्यक्तिगत कामे आणि मतदारसंघतील विकासकामांची, तसेच आपल्या दौऱ्याची माहिती ते समाजमाध्यमांद्वारे पाठवतात. गोडसे यांचा मतदारसंघात फ्लेक्स लावण्यावर भर असतो. शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांच्या उपक्रमांचे अनेक फ्लेक्स लावले जातात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 13 खासदारांनी बंड केले. त्यात गोडसे यांचा समावेश होता. नाशिक मतदारसंघाच्या विकासासाठी बंडात सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांचे घोटी तसेच अन्य काही ठिकाणी स्वागताचे कार्यक्रम घडविले गेले. त्यात उद्धव ठाकरे आणि पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी टीका केली. खासदार राऊत हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करतात व शिवसेनेचे नुकसान करतात, अशी विधाने त्यांनी केली होती. राज्यात नुकतेच मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाले होते. त्यात राज्य सरकारविरोधात वातावरण तापले होते. त्यात लोकप्रतिनिधींवर रोष वाढू लागल्यावर त्यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी आहे, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला होता.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी खासदार राजाभाऊ गोडसे.
खासदार गोडसे सातत्याने राज्य व केंद्र शासनाची विविध प्रशासकीय कार्यालये, मंत्री आणि सचिव स्तरावर मतदारसंघाच्या प्रश्नांबाबत सातत्याने पत्रव्यवहार करत असतात. विविध भागांत जनसंपर्क, सरपंच ते नगरसेवक या स्तरावर विविध भागासाठी खासदार निधीद्वारे विकासकामे त्यांनी मंजूर केली आहेत. त्यामुळे मतदारसंघात त्यांचा चांगला परिचय व संपर्क टिकून आहे. जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक ते खासदार अशी पदे भूषविल्याने त्यांनी विकासकामे कशी केली जातात, याची जाण आहे. त्याला व्यापक प्रसिद्धीची हातोटी त्यांच्याकडे आहे. नाशिक मतदारसंघात नाशिक-पुणे लोहमार्गाचा 17,889 कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजूर केल्याचा त्यांचा दावा आहे. मतदारसंघात नाशिक रोड येथे 55 कोटी रुपयांच्या रेल्वे व्हील रिपेअरिंग कारखान्याच्या प्रकल्पाची चाचणी झाली आहे. दुष्काळी सिन्नर भागासाठी अप्पर वैतरणा-कडवा-देवनदी जोड प्रकल्पासाठी डीपीआर मंजूर करण्यात आला आहे. द्राक्ष, ॲपल बोर, पालेभाज्यांच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या भाड्यात अनुदान, वडपे ते गोंदे दरम्यान सहापदरीकरणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विविध रस्त्यांच्या विकासासाठी मंजुरी मिळवली आहे.
हेमंत गोडसे हे सातत्याने अनेक प्रकल्पांची घोषणा करून श्रेय घेण्यासाठी घाई करतात, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. गेली टोन टर्म मतदारांनी त्यांना विजयी केले. त्या तुलनेत प्रभाव निर्माण करण्यात ते यशस्वी झाले नाहीत. मराठा आरक्षणासाठी नाशिक जिल्ह्यात तीव्र आंदोलन झाले. यावेळी १०५ दिवस उपोषण सुरू होते. खासदार गोडसे तिकडे फिरकलेही नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात तीव्र रोष निर्माण झाला होता. खासदार गोडसे यांनी आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला. हे प्रकरण बूमरँग झाले आणि त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. खासदार गोडसे यांनी गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत शिवसेना ठाकरे गट तसेच सध्याच्या एकनाथ शिंदे गट पक्षवाढीसाठी काहीही काम केलेले नाही, असा आरोप त्यांच्यावर होतो.
मतदारसंघात त्यांच्याकडे पक्ष तसेच व्यक्तिगत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कमतरता आहे. शिंदे गटात गेल्याने त्यांच्याविषयी शिवसेनेसह नागरिकांतदेखील रोष आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर गोडसे शिवसेनेतून बाहेर पडल्याने उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे. गोडसे यांचा पराभव होणारच, अशी घोषणा खासदार राऊत यांनी केली आहे. या मतदारसंघावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यात शिंदे गटाचे राजकीय भवितव्य अस्थिर असल्याने गोडसे यांच्या राजकीय भवितव्याबाबत शंका व्यक्त केली जाते. महाविकास आघाडीत शिवसेना हा मोठा पक्ष आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांविषयी सहानुभूतीचे वातावरण आहे.
हेमंत गोडसे यांना शिवसेना शिंदे गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी निश्चित मानले जाते. ते दोन टर्म खासदार असून ठाकरे गट सोडून त्यांनी शिंदे गटाच्या बंडखोरीला साथ दिल्याने महायुतीमध्ये त्याचा उमेदवारीवर प्रबळ दावा आहे. हेमंत गोडसे यांना 2024 मध्ये उमेदवारी मिळू नये, सासाठी भाजपमधील एक मोठा गट तसेच इच्छुक उमेदवार नेटाने कामाला लागले आहेत. तसे झाल्यास काही प्रमाणात महायुतीवर नकारात्मक परिणाम होईल.
हेमंत गोडसे यांची नाशिकच्या ग्रामीण भागात स्वतःची ‘व्होट बॅंक’ तयार करण्यात ते यशस्वी झाले आहेत, मात्र ती मर्यादित आहे. अशा स्थितीत भाजपकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यात भाजप किती यशस्वी होतो, यावर गोडसे यांचे लोकसभा निवडणुकीतील राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
ॲ
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.