Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. मोहोळ याच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पिस्तुले पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. (Latest Marathi News)
पुण्यातील कोथरुडमधील सुतारदरा परिसरात गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता. 5 जानेवारीला) दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर मोहोळ त्याच्या साथीदारांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले. दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे (Pune) पोलिसांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि आठ आरोपींना ताब्यातही घेतलं.
दहा वर्षांपूर्वीचे भांडण तसेच जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला असून त्यानुसार तपास केला जात आहे. या खूनाच्या मागे अजून दुसरी काही कारणे आहेत का? याचा तपास पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जात आहे. गुंड मोहोळ गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक क्षेत्रात काम करण्यात सक्रिय झाला होता, तसेच राजकीय लोकांची देखील त्याने संबंध जोडण्यास सुरुवात केली होती. भाजपचे कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमात मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ भाजपमध्ये प्रवेश करण्याचे नियोजन केले होते. त्यावरून भाजपला टीका देखील सहन करावी लागली होती.
दरम्यान, गुंड मोहोळ याच्या खूनामागील मास्टर माईंड नक्की कोण आहे? हल्लेखोरांना पिस्तूल कोणी पुरवले? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. यामध्ये पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक केली आहे. सतीश संजय शेडगे (वय 28, रा. मुळशी), धनंजय मारुती वटकर (वय 25, रा. कराड ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खून प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
या दोघांनी या हल्लेखोरांना पिस्तुले पुरवठा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. मोहोळ खून प्रकरणाचा तपास सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.