पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांनी राजकीय अतिषबाजी केल्यानंतर कोपरगावमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी देखील थेट 2024 मध्ये लंकेच पुन्हा एकदा गुलाल उधळतील, असे भाकित वर्तवले. कोल्हे यांचे हे भाकित लोकसभा होती की, विधानसभा हे येणारा काळ निश्चित करेल.
आमदार नीलेश लंके यांच्या कामाने आपण प्रभावित आहोत. कोविड काळात त्यांनी केलेले काम वाखणण्याजोगे होते. लंकेंना आता तालुक्यापुरते ठेवू नका. त्यांनी राज्यात काम केले पाहिजे. तशा विवेक कोल्हे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. अहंकारी विचारांचे रावणस्वरुपी लोक समाजात आहेत, अशांना खाली बसवण्यासाठी आमदार लंकेंच्या मागे सक्षमपणे उभे राहिले पाहिजे, असे विवेक कोल्हे म्हणताच नेमका रोख कोणाकडे अशी चर्चा आता रंगली आहे.
आमदार नीलेश लंकेंनी त्यांच्याबरोबर असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये नीलेश लंके साकारला आहे. हा नीलेश लंके समूहात असून, तो प्रत्येकामध्ये सेवाभावी वृत्तीने काम करतो आहे. येणाऱ्या 2024 चा गुलाल लवकरच त्यांच्यावर उधळला जाईल. नीलेश लंके यांच्या मनात जो गुलाल असेल तो उधळाला जाऊ दे, असे म्हणून विवेक कोल्हे यांनी दिवाळीच्या शुभेच्या दिल्या.
राहता तालुक्यातील गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या पॅनलच्या प्रचारासाठी आमदार निलेश लंके यांनी अनेक सभा घेतल्या आणि या सभांमधून त्यांनी जाहीरपणे राधाकृष्ण विखे आणि एकूणच विखे परिवारावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जोरदार टीका केली होती. त्या टीकेला विखे परिवाराकडूनही तेवढेच खोचकपणे प्रत्युत्तर आलं होतं. आता 'गणेश' कारखान्याचा उत्तरेतील वाद आता नगर दक्षिणेत येऊ पाहत असून येणाऱ्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकातून तो प्रत्यक्ष समोर येईल, अशीच परिस्थिती एकूण दिसून येत आहे.