Nana Patole-Praful Patel  Sarkarnama
विदर्भ

Vidharbha Politic's : नाना पटोलेंना मोठा झटका; गोंदियानंतर भंडारा जिल्हा बॅंकेचेही दार नानांसाठी बंद, राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांचे वर्चस्व

Bhandara District Bank News : भंडारा जिल्हा बॅंकेतील विजयामुळे विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील तीनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका महायुतीच्या पॅनेलने जिंकल्या आहेत.

Rajesh Charpe

Bhandara, 14 August : भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील फुंडे पुन्हा एकदा निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांचे भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्हा बँकांवरील वर्चस्व संपुष्टात आले आहे. गोंदिया जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे समर्थक राजू जैन यांची यापूर्वीच निवड झाली आहे.

भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या (Bhandara District Bank) निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला होता. महाविकास आघाडीला 21 पैकी फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले होते. ही निवडणूक नाना पटोले यांनी प्रतिष्ठेची केली होती.

भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे (MP Prashant Padole) यांनीसुद्धा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. बँकेचे माजी अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या विरोधात खासदार प्रशांत पडोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. खासदार स्वतःच बँकेच्या निवडणुकीत उतरल्याने सर्वांचे लक्ष या लढतीत लागले होते. मात्र फुंडे यांनी खासदारांना पराभवाचा धक्का दिला.

काँग्रेसचे नाना पटोले (Nana Patole) यांनी सुरुवातीला आपण भंडारा जिल्हा बँकेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केला होता. मात्र, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि त्यानंतर भंडारा दूध संघात त्यांच्या पॅनेलचा झालेला पराभव बघून नाना पटोले यांनी आधीच भरलेला उमेदवारी अर्जही मागे घेतला होता. दूध संघाच्या निवडणुकीत भंडाऱ्याचे शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पटोले यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. यावरून महायुतीमध्ये मोठे मतभेद उफाळून आले होते.

भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भोंडेकर यांनी आपली चूक सुधारली. ते पुन्हा महायुतीत परतले. त्यामुळे महायुतीच्या पॅनेलच्या उमेदवारांची ताकद आणखी वाढली होती. याशिवाय मत विभाजनाचाही धोका टळला होता. भंडारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ४१ जणांनी उमेदवार अर्ज दाखल केले होते. नुकत्याच झालेल्या रविवारी संचालकपदासाठी मतदान घेण्यात आले होते. बॅंकेच्या १०६२ मतदारांनी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावला होता.

भंडारा बँकेची निवडणूक महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, भाजपचे आमदार परिणय फुके, शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात लढवली होती. विशेष म्हणजे विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीनही बँका महायुतीच्या पॅनेलने जिंकल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT