
Mumbai, 14 August : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांंच्यासह चौघांना वीस ऑगस्टपर्यंत ‘पीएमएलए’ न्यायालयाने ईडीची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, माजी आयुक्त पवार यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान मोठा दावा केला आहे. अनिल पवार हे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई आहेत, त्यामुळे त्यांची मुद्दाम बदनामी करण्यात येत आहे. शिवसेना-भाजपमधील वादातून हे प्रकरण घडविण्यात आले आहे, असेही वकिलांनी म्हटले आहे.
नालासोपारा येथील 41 बेकायदा इमारतींप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वसई-विरार (Vasai Virar) महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, नगरसेवक आणि बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता, बांधकाम व्यावसायिक अरुण गुप्ता आणि निलंबित टॉऊनप्लॅनर वाय. एस. रेड्डी यांना बुधवारी (ता. 13 ऑगस्ट) अटक करण्यात आली होती.
माजी आयुक्त पवार यांच्यासह संशयित चारही आरोपींना आज (ता. 14 ऑगस्ट) ‘पीएमएलए’ न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकिलाने ह्या गुन्ह्याचं गांभीर्य मोठे आहे. आर्थिक लाभासाठी अधिकार आणि कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या चौकशीत माजी आयुक्त अनिल पवार यांनी सहकार्य केलेले नाही. या प्रकरणात अनेकांचे हितसंबंध गुंतले आहेत, त्यामुळे या चौघांना वीस ऑगस्टपर्यंत ईडीची (ED) कोठडी मिळावी, अशी विनंती सरकारी वकिलाने केली होती.
दरम्यान, सुनावणीत माजी आयुक्त अनिल पवार यांचा त्यांच्या वकिलांनी जोरदार बचाव केला. ते म्हणाले, अनिल पवार हे तपासात सहकार्य करीत आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पवार यांच्या विरोधात ईडीकडे एकही पुरावा नाही. ईडीची ही मोडस ऑपरेंटी आहे. या प्रकरणात कोणी एक व्यक्ती निर्णय घेत नाही. अनेक विभागप्रमुखांकडून आलेल्या फाईलवर आयुक्तांकडून स्वाक्षरी केली जाते, असा दावा पवारांच्या वकिलाने युक्तीवादात केला आहे.
याच सुनावणीदरम्यान माजी आयुक्त अनिल पवार यांच्या वकिलांनी भाजप आणि शिवसेना वादाबाबतही मोठा दावा केला आहे. वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार हे राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे भाचेजावई आहेत. त्यामुळे त्यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. भाजप आणि शिवसेनेत वाद आहे, त्यातून हे घडवलं गेलं आहे, असेही पवारांच्या वकिलाने म्हटले आहे.
न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन दुपारी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ‘पीएमएलए’ कोर्टाने निकाल दिला आहे. त्यात त्यांनी चारही आरोपींना येत्या वीस तारखेपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.