Chandrapur Lok Sabha Constituency Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Lok Sabha Constituency : पक्षांतर्गत स्पर्धा प्रतिभा धानोरकरांसह काँग्रेसच्याही मार्गातील अडसर

Lok Sabha Election 2024 : सर्व घटकांचे एकत्रीकरण आमदार प्रतिभा धानोरकर करू शकणार का? त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते.

संदीप रायपुरे - Sarkarnama

Lok Sabha Election 2024 : आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी दावेदारी दाखल केली आहे. त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले राज्यातील काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते. भाजपचे दिग्गज नेते हंसराज अहीर यांचा त्यांनी पराभव केला होता.

आता आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. पक्षातूनच अन्य नेतेही लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकू लागले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, पक्षाने संधी दिली तर लोकसभा निवडणूक लढवू, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मात्र, काँग्रेसमध्येच नेत्यांचे एकमत झाले नाही, तर ही निवडणूक पक्षाला जड जाऊ शकते. अशा परिस्थितीत काँग्रेसमधील सर्व घटकांचे एकत्रीकरण आमदार धानोरकर करू शकतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नाव (Name) :

प्रतिभा बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर

जन्म तारीख ( Birth Date)

9 जानेवारी 1986

शिक्षण (Education)

बीए. (द्वितीय वर्ष)

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

यवतमाळ जिल्ह्यातील परमडोह येथील काकडे कुटुंबात प्रतिभा धानोरकर यांचा जन्म झाला. वडील सुरेश काकडे, आई गीता काकडे हे सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना एक भाऊ आहे. तत्कालीन शिवसेना नेते बाळू धानोरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. खासदार असलेल्या बाळू धानोरकर यांचे 29 मे 2023 रोजी दिल्ली येथे उपचारादरम्यान निधन झाले. प्रतिभा धानोरकर यांना मानस व पार्थ ही दोन मुले आहेत. ते दोघेही सध्या शिक्षण घेत आहेत.

नोकरी किंवा व्यवसाय (Service/Business)

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

चंद्रपूर-आर्णी

राजकीय पक्ष कोणता (Political Party Affiliation)

काँग्रेस

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढवल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

अतिशय सामान्य कुटुंबात जन्म झाल्यामुळे राजकारणाशी प्रतिभा धानोरकर यांचा दूरवर संबंध नव्हता, पण घरात असलेल्या सामाजिक कार्याचे संस्कार त्यांच्यावर होते. लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची आवड होती. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतला. पुढे सक्रिय राजकारणात असलेल्या बाळू धानोरकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. एकीकडे पती राजकारणात असताना त्या राजकारणात आल्या नाहीत. त्यांनी विवाहानंतरही अतिशय प्रभावीपणे समाजकार्याची धुरा सांभाळली.

समाजबांधवांचे संघटन करण्याच्या कार्यात त्या रमल्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वरोरा - भद्रावती मतदारसंघातून बाळू धानोरकर आमदार झाले. एकीकडे शिवसेनेच्या माध्यमातून बाळू धानोरकर सक्रिय राजकारणात असतानाही प्रतिभा मात्र राजकारणापासून दूरच होत्या. 2019 मध्ये चंद्रपुरातील राजकीय संदर्भ बदलले. त्यावेळी संपूर्ण राज्यात मोदी लाट होती. अशा स्थितीत बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीसह. पण, त्यांना कमालीचा विरोध झाला. शेवटी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर बाळू धानोरकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली.

काँग्रेसकडूनच विधानसभेच्या आपल्या हक्काच्या वरोरा-भद्रावती या मतदारसंघातून त्यांनी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळवून दिली. त्या हे आव्हान पेलतील का? असा प्रश्न त्यावेळी अनेकांनी उपस्थित केला होता. पक्षातून त्यांच्या उमेदवारीला विरोध झाला. पती खासदारकीसाठी अन् पत्नीला विधानसभेची उमेदवारी, असे म्हणत अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांनी उपस्थितांसमोर केलेले भाषण अतिशय प्रभावी ठरले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारादरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी घेतलेले मुद्दे, विकासासाठी त्यांनी मांडलेली संकल्पना लोकांना आवडली अन् त्या वरोरा -भद्रावती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात शोभा फडणवीस यांच्यानंतर त्या एक सक्षम महिला नेत्या म्हणून पुढे आल्या.

आमदार होताच त्यांनी जिल्ह्यात महिलांची मोठे संघटन केले. सामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला नवी दिशा दिली. राजकारणात नवख्या असलेल्या प्रतिभा धानोरकर आपल्या खासदार पतीच्या खांद्याला खांदा लाऊन लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल्या. सत्ताधाऱ्यांकडून प्रोटोकॉल बाजूला ठेवत जेव्हा-जेव्हा एकाधिकारशाहीची रणनीती केली गेली. त्यांच्यावर प्रतिभा धानोरकर यांनी अतिशय आक्रमकपणे हल्लाबोल केला. एवढेच नव्हे तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सत्ताधा-यांकडून करण्यात येणाऱ्या भूमिपूजनाआधी स्वतः कुदळ मारून भूमिपूजनाचे सोपस्कार पार पाडले. या वेळी सत्ताधारी त्यांच्यावर तुटून पडले, पण न डगमगता त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.

कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी आपल्या मतदारसंघात अनेकांना मोठा आधार दिला. हजारो कुटुंबीयांना अन्नधान्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. धानोरकर दाम्पत्याचा राजकीय प्रवास यशस्वीपणे सुरू असतानाच प्रतिभा धानोरकर यांच्या आयुष्यात मोठे वादळ आले. त्यांचे पती खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती अचानकपणे बिघडली. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे निधन झाले अन् संकटांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा ठाकला. अशा कठीण प्रसंगात त्यांनी न डगमगता स्वतः ला प्रचंड संयमाने सावरले. पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी शोकसभेत त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून आपली स्वयंसिद्धताही दाखवून दिली.

प्रतिभा धानोरकरांच्या आयुष्यात आलेल्या या कठीण प्रसंगात दस्तुरखुद सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांना धीर दिला. त्यांना दिल्ली येथे बोलावून आपल्या निवासस्थानी त्यांचे सांत्वन केले. कुठल्याही स्थितीत आपण तुमच्यासोबत आहोत, असा शब्द दिला. आता लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. आपल्या पतीचे स्वप्न साकार करण्यासाठी, मतदारसंघाचा सर्वांगीण विकासाचा संकल्प घेत त्या आता लोकसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in The Constituency)

आमदार झाल्यापासून प्रतिभा धानोरकर यांनी अतिशय प्रभावीपणे मतदारसंघातील प्रश्न मांडले आहेत. विधानसभेत त्यांनी विविध मागण्या मांडून त्या पूर्णत्वास कशा नेता येतील, याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. तृतीयपंथीयांसाठी पोलिस दल व इतर विभागांत दोन टक्के आरक्षण देऊन नोकरीत स्थान देण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. त्यांनी आपल्या घरी तृतीयपंथीयांसह दिवाळी साजरी केली होती.

मतदारसंघातील महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. शेतीला 24 तास पाणी मिळावे, यासाठी त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता, पण हा प्रश्न मार्गी लागला नाही. अशा वेळी त्यांनी आक्रमक रूप धारण करत महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यांचा रुद्रावतार लक्षात घेता अधिकाऱ्यांना तातडीने हा प्रश्न सोडवावा लागला. आपल्या मतदारसंघाच्या सीमा ओलांडत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात महिलांचे संघटन बांधले. ओबीसी समाज संघटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विविध चळवळींचे नेतृत्व त्यांनी केले आहे. पती बाळू धानोरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्यांनी खासदार चषकाचे आयोजन केले. यातून जिल्ह्यातील अनेक होतकरू तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली.

2019 मध्ये निवडणूक लढवली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

प्रतिभा धानोरकर यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. 2019 च्या वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी संजय देवतळे यांचा पराभव केला होता. प्रतिभा धानोरकरांना 63862 मते मिळाली, तर देवतळेंना 53665 मतांवर समाधान मानावे लागले होते.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for winning the Election)

2019 मध्ये प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपुरातील चार तर यवतमाळ जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रतिभा धानोरकर यांचा चंद्रपूर जिल्ह्यात जनसंपर्क दांडगा आहे. त्यांचे माहेर वणी तालुक्यातील असल्याने त्या ठिकाणी त्यांना ओळखणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चंद्रपुरात ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. प्रतिभा धानोरकर ओबीसी संघटनेशी सातत्याने जुळून असल्याने त्यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

प्रतिभा धानोरकर या सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजमाध्यमातील प्रत्येक घटकाचा त्या प्रभावीपणे वापर करतात. मतदारसंघातील विविध कामांची, घडामोडींची, कार्यक्रमांची माहिती त्या स्वत: शेअर करतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

प्रतिभा धानोरकर यांच्यात कमालीचा संयम आहे. त्या वक्तव्य करताना विचारपूर्वक मते मांडतात. अजूनपर्यंत तरी त्या वादग्रस्त वक्तव्यात अडकलेल्या नाहीत. प्रक्षोभक ठरतील, अशी कुठलीही विधाने त्यांनी केलेली नाहीत.

राजकीय गुरू कोण? (Political Godfather/guru)

बाळू धानोरकर

सकारात्मक मुद्दे (Positive Points about Candidate)

खासदार असलेले पती बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने प्रतिभा धानोरकर यांना मतदारसंघात सहानुभूती मिळू शकते. मागील लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे पानिपत झाले होते, त्यावेळी बाळू धानोरकर हे काँग्रेसचे एकमेव उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे पक्षाची लाज राखली गेली होती. याची दखल थेट सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी घेतली. बाळू धानोरकरांच्या निधनानंतर गांधी परिवाराने प्रतिभा धानोरकरांना दिलेला धीर, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर असलेली ओबीसींची मते, हे प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या बाबी आहेत.

नकारात्मक मुद्दे (Negative points about candidate)

दिवंगत खासदार बाळू धानोरकरांची (Balu Dhanorkar) मतदारसंघात मोठी ताकद होती. त्यांचे अकाली निधन हा धानोरकर कुटुंबीयांना मोठा धक्का होता. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाने संधी दिल्यास आपण उमेदवारी दाखल करू, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. त्यामुळे पक्षांतर्गत चाललेली धुसफूस प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गातील अडचण ठरू शकते.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते? (If didn't get chance to contest Lok sabha election what will be the consequences)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha) प्रतिभा धानोरकर यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. चंद्रपूर मतदारसंघ हा ओबीसीबहुल आहे. विशेष म्हणजे ओबीसीमधील कुणबी समाजाचे येथे प्राबल्य आहे. अशावेळी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाली नाही तर पक्षाला मोठा फटका बसू शकतो.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT