RTO Firing Case Sarkarnama
विदर्भ

Nagpur Firing : वसुलीच्या कारणावरूनच संकेत गायकवाड यांच्यावर झाडली गोळी

प्रसन्न जकाते

Financial Dispute : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील निरीक्षक गीता शेजवळ यांनी निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर नागपूर येथे केलेला गोळीबार हा भरारी पथकांच्या वसुलीचा हिशोब न जुळल्याच्या कारणावरून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गीता शेजवळ या आरटीओच्या भरारी पथकाच्या प्रमुख होत्या. शेजवळ यांना पथक प्रमुख पदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागेवर संकेत गायकवाड यांनी नियुक्ती करण्यात आली होती.

शेजवळ आणि गायकवाड यांनी केलेल्या वसुलीचा हिशोब जुळत नव्हता. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यांने त्यांना वसुलीचा हिशोब जुळविण्याची जबाबदारी दिली होती. यातूनच शेजवळ आणि गायकवाड यांच्यात वाद झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. हा वाद केवळ आर्थिक वसुलीपर्यंतच मर्यादीत नसून आणखीही काही धक्कादायक बाबी पोलिस तपासात पुढे येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नागपूर न्यायालयाने गीता शेजवळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचे पथक नगर जिल्ह्यात त्यांचा कसून शोध घेत आहे. शेजवळ यांना शोधून काढण्यासाठी पथकांनी नगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला आहे. याशिवाय नागपूर, पुणे, मुंबई येथेही त्यांचा शोध घेण्यात येत आहे. नागपूर न्यायालयाने जामीन नाकारल्याने शेजवळ यांनी नागपुरातील सर्वांत वरिष्ठ अधिवक्त्त्यांपैकी असलेल्या असलेले अनिल मार्डीकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

शेजवळ यांच्या वकिलांनी अंतरिम दिलासा मिळावा अशी विनंती न्यायालयाला केली. मात्र न्यायमूर्ती उर्मिला फाळके यांनी तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. अॅड. देवेंद्र चौहान यांनी तक्रारपक्षाची बाजू मांडली. गीता शेजवळ आणि संकेत गायकवाड गोळीबार प्रकरणात जसजसा पोलिस तपास पुढे जात आहे, तसतशा धक्कादायक बाबी उघडकीस येणार आहेत. याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप न झाल्यास पोलिस आयुक्त अमितेश कुमार नागपूर आरटीओतून परिवहन आयुक्त कार्यालय व त्यानंतर मंत्रालयातील काही मजल्यापर्यंतही पोहोचू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आर्थिक वसुलीतून झालेला हा गोळीबार 7 मे 2022 रोजीचा होता. बजाजनगर पोलिसांनी याप्रकरणी केवळ अनावधानाने ‘सर्व्हिस रिव्हॉल्वर’मधून गोळी सुटत अधिकारी जखमी झाल्याची तेवढी नोंद घेतली होती. परंतु पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना संशय आल्याने त्यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपिवला. आता या तपासातून मोठे वसुली रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. मात्र हा तपास केवळ गोळीबारापुरतीच मर्यादीत राहावा, यासाठी राजकीय ‘फिल्डिंग’ सुरू झाली आहे.

आयुक्तांच्या ‘बंदोबस्तासाठी’ फिल्डिंग

शेजवळ यांच्या हातातील बंदुकीतून सुटलेली ती गोळी आपल्यापर्यंत पोहचू नये, यासाठी परिवहन विभाग आता चांगलाच सक्रिय झाला आहे. याप्रकरणाच्या मुळाशी असलेल्या अधिकारी, बाबू व राजकीय व्यक्तींनी आपापले वजन वापरण्यास सुरुवात केली आहे. अशात पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे कोणत्याही दबावाला जुमानत नाहीत. नागपुरातील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरकारने त्यांना मुदतवाढ दिली आहे. अशात आरटीओच्या या प्रकरणामुळे त्यांनी बदली करता येते काय, असा प्रयत्नही चालला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही बदली व्हावी, यासाठी अनेक जण सक्रिय झाले आहेत.

गीता शेजवळ या सातत्याने धमक्या देताना ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’ या नावाचा वापर करतात, असा आरोप याप्रकरणात प्रदेश काँग्रेसने केला आहे. आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार अनुक्रमे गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यामुळे याप्रकरणात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुदतवाढ मिळाली असताना बदली झाल्यास परिवहन विभागातील भ्रष्टाचाराला राजकीय पाठबळ असल्याचा संशय बळावणार आहे. त्यामुळे आयुक्तांची बदली न करता तपास कसा थांबवता येईल, यासाठी काही जण मुंबईत तळ ठोकून आहेत.

शेजवळविरुद्ध सहा गुन्हे

परिवहन विभागातील निरीक्षक गीता शेवजळ या अनेक कारणांमुळे चर्चेत आहेत. लाच घेण्यासह सहा गुन्ह्यांची त्यांच्या नावे नोंद आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पत्र दिल्यानंतर व परिवहन अधिकाऱ्यांनी निलंबनाचा प्रस्ताव पाठविल्यानंतरही तो आयुक्तांनी अद्याप मान्य न केल्याने मंत्रालयातून परिवहन आयुक्त कार्यालयापर्यंत कुणीतरी ‘जबरदस्त वजनदार’ व्यक्ती शेजवळ यांची ढाल बनल्याचेच दिसत आहे.

आताही हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा शेजवळ यांच्याविरूद्ध दाखल आहे. शासकीय बंदुकीतून हा गोळीबार झाला आहे. अशात नागपूर पोलिसांनी परिवहन विभागाला कळविल्यानंतरही शेजवळ, गायकवाड व या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई न झाल्याने परिवहन विभागील ‘करते करविते धनी कोण?’ असा प्रश्न प्रकर्षाने उपस्थित होत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT