Nagpur News : तांदूळ खरेदी आणि पुरवठ्यावरून विधानसभेत आज (ता. ११ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि यशोमती ठाकूर यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना घेरण्याचा प्रयत्न केला. (Patole, Thakur, Patil bombarded Chhagan Bhujbal with questions over corruption in rice transport)
तांदूळ वाहतूक, बारदाना व सुतळी खरेदीत गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप पटोले आणि ठाकूर यांनी केला. भुजबळांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने पुन्हा प्रश्न विचारण्यात आले. विधानसभा अध्यक्षांनीही हस्तक्षेप केला. शेवटी भुजबळांनी अशा गोष्टी झाल्याचे मी नाकारत नाही. आणखी काही प्रकरणे असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
जयंत पाटील यांनी तांदूळ वाहतूकीचा मुद्दा उपस्थित करताना ठेकेदार ‘शेड्यूल ऑफ रेटनुसार वाहतूक करत नाहीत. तांदूळ वाहतुकीचे टेंडर विदर्भातील व्यापारी दुसरे कोणाला भरू देत नाहीत. तांदूळ वाहतुकीवर होणारा खर्च फार मोठा आहे. समितीचा निर्णय होण्याआधीच तांदळाची वाहतूक केली जात आहे, असे आरोप केले. या प्रकरणी अधिकरी आणि ठेकेदार यांच्यातील संबंध तोडणार का, असा सवालही केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जयंत पाटील यांच्या प्रश्नाला छगन भुजबळ यांनी उत्तर देताना गोंदिया हा जिल्हा नगरला मार्चपासूनच जोडलेला आहे. केंद्राच्या निर्देशानुसार राज्यातील धान्याचा पुरवठा राज्यातच करण्याची सूचना आहे. त्यानुसार तांदळाचा पुरवठा केला जातो. पूर्व विदर्भात जास्तीत जास्त तांदूळ पिकतो. तो राज्यातील इतर भागात पुरवला जातो. मार्चपासूनच गोंदिया येथील सीएमआर नगरला जोडण्यात आलेला होता. त्यांना ८६ हजार क्विंटल तांदळाचा पुरवठा करण्यात आला. तत्कालीन मंत्र्यांनी सहमती दिली होती. त्यानुसार तांदूळ वितरित झाला. पण यात कुठेही तक्रार दिसत नाही. गोदामाचे भाडे दोन महिन्यांचेच दिले जाते, त्यामुळे ते धान्य उचलून आवश्यकतेनुसार पुरवठा केला जातो. सर्व काही नियमांनुसार झालेले आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले यांनी तांदूळ खरेदी आणि वाहतुकीमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला. तांदूळ खरेदी केंद्र सुरू झाल्यापासूनच यातील दलाल कामाला लागतात. संस्थेपासून मंत्रालयातपर्यंत याची लिंक आहे. तांदळासाठी सरकारने ३२ कोटी रुपयांची सुतळी खरेदी केली आहे. सुमारे ७२ रुपये किलोला मिळणारी सुतळी ४२० रुपये किलो दराने घेतली आहे. बारदाणा खरेदीतही तसेच आहे. तांदळाच्या वाहतुकीतही भ्रष्टाचार सुरू आहे. हा भ्रष्टाचार सरकार थांबवणार का, असा सवाल पटोले यांनी केला.
पटोलेंच्या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळांनी सांगितले की, एखादी गोष्ट लक्षात आणून दिली तर त्याची चौकशी करण्यात येईल. पण, विदर्भातील पाच जिल्ह्यांतील तांदूळ महाराष्ट्रभर पोचवला जातो. त्यानुसार या पाच जिल्ह्यांना उर्वरीत महाराष्ट्रातील जिल्हे जोडले जातात. सुतळी खरेदी ही वीस कोटींची घेतली आहे. ती योग्य गुणवत्तेची असून सुतळीचे भावही वेगवेगळे आहेत. असे सांगत असतानाच हा प्रश्न आऊट ऑफ स्कोप आहे. पटोले यांनी वेगळा प्रश्न विचारावा, मी त्यावर उत्तर देईन, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. भुजबळांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने नाना पटोले, यशोमती ठाकूर यांनी आक्षेप नोंदविला.
या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. नाही तर तुमच्या दालनात मंत्र्यांना आणि आम्हाला बोलवा. काय चाललेले आहे, हे आम्ही त्यांना सांगतो. अध्यक्षाच्या दालनात या प्रश्नावर बैठक बोलवा. राज्याची तिजोरी लुटली जात आहे, त्यामुळे अध्यक्षांनी मंत्र्यांना सूचना करावी. या प्रश्नी आम्हाला न्याय मिळाला नाही, अशी खंत पटोले यांनी व्यक्त केली.
राज्याची तिजोरी लुटली जात आहे, या पटोले यांच्या आरोपावर भुजबळ यांनी या तांदूळ वाहतुकीचे पैसे केंद्राकडून दिले जातात. त्यामुळे राज्याची लूट चालली आहे, असे म्हणणे योग्य वाटत नाही. यासंदर्भात त्यांनी वेगळी काही माहिती दिली, तर त्याची चौकशी करतो, असे उत्तर दिले.
याच प्रश्नावर बोलताना यशोमती ठाकूर यांनीही काही मुद्दे उपस्थित केले. एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ नागरिकांना दिला जातो. तेवढा तांदूळ देण्याची गरज आहे का. जे लोक तांदळाचा व्यापार करतात, तेच हा तांदूळ खरेदी करतात. याचे गुन्हे अनेक जिल्ह्यांत दाखल झाले आहेत. हा काळाबाजार रोखण्यासाठी तसेच तेवढ्या तांदळाची गरज नसेल तर तेवढा गहू लोकांना देणार का. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार काय करणार, अस सवाल ठाकूर यांनी केला.
यशोमती ठाकूर यांनी गैरव्यवहाराची एखादी गोष्ट लक्षात आणून दिली तर त्याची चौकशी केली जाईल. लाभार्थ्यांना तांदूळ मिळतोय, तर प्रश्न कुठे निर्माण होतो, असा सवाल भुजबळांनीच उत्तरात केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत तुमच्याकडे ठराविक माहिती असेल तर द्यावी. मंत्री त्यावर तुम्हाला उत्तर देतील, असे सांगितले. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी अमरावतीचे उदाहरण दिले.
अमरावतीत मोठ्या प्रमाणात तांदूळ पकडण्यात आला. पन्नास लाखांच्या वर माल जमा झालेला आहे. हे अमरवतीतच नव्हे तर जळगाव इतर जिल्ह्यांतही होतं. सरकार आम्हाला म्हणू शकत नाही की आम्हाला स्पेसिफिक सांगावे. पण सरकारने आम्हाला सांगावे की, तांदूळ खरेदी गैरव्यवहार प्रकरणात किती गुन्हे दाखल झाले आहेत. जिथे गुन्हे दाखल झाले आहेत, त्या ठिकाणी सरकारने काय कारवाई केली आहे, असा सवाल त्यांनी अमरावतीचे उदाहरण देताना केला.
विधानसभा अध्यक्ष तुम्ही गांभीर्याने घेत आहात, तर मंत्र्यांनाही हे प्रकरण गांभीर्याने घ्यायला सांगा. असं नाही चालणार. भुजबळसाहेब, तुम्ही भरपूर वर्षांपासून हा विभाग सांभाळत आहात, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अफरातफर चालत आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
शेवटी भुजबळांनी अशा गोष्टी झाल्याचे मी नाकारत नाही. त्यावर पोलिसांचे गुन्हेही दाखल झाले आहेत. संबंधितांवर कारवाई सुरू आहे. आणखी काही प्रकरणे असतील, तर त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.