Sharad Pawar-Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session 2023 : नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादीचं कार्यालय कोणत्या गटाला मिळणार; विधिमंडळासमोर पेच...

NCP Crisis News : विधानभवन परिसरातील कार्यालय आपलेच आहे, असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात येतो.

Vijaykumar Dudhale

Vidarbha News : शिवसेनेतील फुटीनंतर नागपूर विधिमंडळात दोन्ही गटांना दोन वेगवेगळी कार्यालये देण्यात आली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दोन्ही गट मान्य करत नाहीत.

आपणच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत, असा दावा दोन्ही गट करतात. त्यामुळे नागपूर विधिमंडळ आवारातील मूळ कार्यालय कोणत्या गटाला द्यायचं, असा पेच विधिमंडळ कार्यालयाला पडला आहे. (Nagpur Winter session : Which group will get NCP office in Nagpur session?)

येत्या सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्याचा वाद सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात आहे.

मात्र, हे दोन्ही गटांकडून मान्य केले जात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आपणच आहोत, असे दोन्ही गटांकडून सांगितले जाते. तसेच, विधानभवन परिसरातील कार्यालय आपलेच आहे, असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात येतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशनाची तयारी जोरात सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ही तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, नागपूर विधिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय कोणाले मिळते, याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.

गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधिमंडळ कार्यालयावरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय कोणाला मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

दरम्यान, अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती यांच्याकडे याचिका दाखल करून शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, या याचिकेतून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या तिघांची नावे वगळण्यात आलेली आहेत.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना अपात्र ठरविण्यात आले, तर त्यांना सहानुभूती मिळू शकते, त्यामुळे त्यांची नावे कारवाईतून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आणि महंमद फजल या लोकसभेतील शरद पवार गटातील खासदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे राज्यसभेतील वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांनाही अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT