Nitin Deskhmukh Uddhav Thackeray  Sarkarnama
विदर्भ

Shivsena News: शिवसेनेत नेत्यांची गर्दी, पण कार्यकर्त्यांची वानवा? अकोल्यात ठाकरेंचा एकटा वाघ सरकारला भिडतोय

Vidarbha Politics : आमदार नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत पक्षाची जनआंदोलनांमधील उपस्थिती कायम ठेवली आहे. त्यामुळे अकोल्यात एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची आंदोलनात्मक सक्रियता, असे चित्र निर्माण झाले आहे.

योगेश फरपट

- योगेश फरपट

शिवसेनेतील फुटीनंतर अकोला जिल्ह्यात राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत जोरदार स्पर्धा सुरू झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पक्षप्रवेशांचा धडाका लावत अनेक बड्या नेत्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना आपल्या गोटात घेतले. मात्र, नेत्यांची संख्या वाढली असली, तरी त्या तुलनेत पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसला असला, तरी आमदार नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत पक्षाची जनआंदोलनांमधील उपस्थिती कायम ठेवली आहे. त्यामुळे अकोल्यात एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेची आंदोलनात्मक सक्रियता, असे चित्र निर्माण झाले आहे.

दिग्गज नेत्यांची फळी, तरीही संघटनेची फरफट?

अकोला जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेची ओळख निर्माण करण्यात माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. बच्चू कडू, शिवसेनेचे विशेष प्रभारी ललित वानखडे आणि संघटक रामेश्वर पवळ यांच्यावरही जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी आहे. एवढ्या प्रमुख नेत्यांची फळी असतानाही तळागाळात पक्षाचा अपेक्षित विस्तार झालेला दिसत नाही.

पक्षप्रवेश आणि स्थानिक राजकीय समीकरणे जुळविण्यावर नेतृत्वाने भर दिला. मात्र, जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे, नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखण्याच्या बाबतीत पक्ष कमी पडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मे २०२६ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेची अकोला जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. पक्षातील अंतर्गत मतभेद आणि समन्वयाचा अभाव या निर्णयामागे असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दिग्गज नेत्यांकडे संघटनात्मक जबाबदारी असतानाही संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याची वेळ का आली, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ठाकरेंचे नगरसेवक फोडले; पण संघटनेचे काय?

महापालिका निवडणुकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. तत्कालीन जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यासह मनोज पाटील, सागर भारुका, सोनाली सरोदे आणि सुरेखा काळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे महापालिकेतील ठाकरे यांच्या शिवसेनेचे संख्याबळ सहावरून दोनवर आले. मूर्तिजापूर नगरपरिषदेतील पाच अपक्ष नगरसेवकांनाही शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या गोटात घेतले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये या पक्षप्रवेशांमुळे शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली. मात्र, लोकप्रतिनिधींना पक्षात आणणे आणि त्यांच्या माध्यमातून तळागाळात संघटना उभी करणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पक्षात आलेल्या लोकप्रतिनिधींना एकत्र ठेवण्यासह त्यांच्या समर्थकांना पक्षाशी जोडण्याचे आव्हान आता नेतृत्वासमोर आहे.

नितीन देशमुखांनी कायम ठेवली आंदोलनांची धार

एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशांचे सत्र सुरू असताना दुसरीकडे ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी जनतेच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याची रणनीती कायम ठेवली आहे. अतिवृष्टी, पीकनुकसान, दुष्काळ आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी देशमुख सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत.

विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनातही देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. विधिमंडळापासून ते रस्त्यावरील आंदोलनांपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या पक्षांतराने ठाकरे यांच्या शिवसेनेला संघटनात्मक धक्का बसला असला, तरी देशमुख यांच्या आक्रमक भूमिकेमुळे जनहिताच्या प्रश्नांवर पक्षाची उपस्थिती कायम आहे. मात्र, देशमुख यांच्या आंदोलनात्मक सक्रियतेचे रूपांतर पक्षाच्या संघटनात्मक ताकदीत करण्याचे मोठे आव्हान ठाकरे यांच्या शिवसेनेसमोरही आहे.

युवा सेना नावापुरतीच?

शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा सेनेची जबाबदारी सांभाळणारे विठ्ठल सरप पाटील यांच्या संघटनात्मक कामगिरीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. युवकांना पक्षाशी जोडणे, महाविद्यालयीन स्तरावर संघटन वाढविणे, बेरोजगारी, शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नांवर आंदोलने उभारणे अपेक्षित असताना या आघाडीवर ठोस सक्रियता दिसत नसल्याची चर्चा आहे.

युवा सेनेच्या संघटनात्मक विस्तारापेक्षा स्थानिक राजकीय समीकरणांना अधिक महत्त्व दिले जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे, युवती सेनेची स्वतंत्र ओळखही जिल्ह्यात निर्माण झालेली दिसत नाही. महिला आणि युवतींच्या शिक्षण, रोजगार, सुरक्षितता आणि सक्षमीकरणाच्या प्रश्नांवर संघटनेची ठोस उपस्थिती जाणवत नसल्याने या दोन्ही आघाड्यांना सक्रिय करण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर आहे.

सरनाईकांना जमणार संघटनेची विस्कटलेली घडी बसवायला?

शिंदेंच्या शिवसेनेतील शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्यावरील संघटनात्मक जबाबदारी वाढली आहे. अकोला जिल्ह्यात पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याचे आव्हान आता त्यांच्यासमोर आहे. सरनाईक यांनी अकोल्याला दोनदा भेट दिली. मात्र, या भेटींनंतर संघटनात्मक पातळीवर अपेक्षित बदल दिसून आलेले नाहीत.

जिल्ह्यात पक्षाकडे नेत्यांची मोठी फळी आहे. मात्र, केवळ नेत्यांच्या बैठका घेऊन संघटनेचा विस्तार होणार नाही. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे, नव्या पदाधिकाऱ्यांना संधी देणे, पक्षाच्या कार्यक्रमांना गती देणे आणि स्थानिक प्रश्नांवर कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, या आघाड्यांवर सरनाईक यांना काम करावे लागणार आहे.

शिंदेंकडे संख्याबळ, ठाकरेंकडे आंदोलनांची धार!

अकोल्यातील दोन्ही शिवसेनांची सध्याची राजकीय स्थिती पाहता शिंदेंच्या शिवसेनेकडे बडे नेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची फळी आहे. मात्र, या ताकदीचे रूपांतर मजबूत पक्षसंघटनेत करण्याचे आव्हान कायम आहे. दुसरीकडे, ठाकरे यांच्या शिवसेनेकडे नितीन देशमुख यांच्यासारखा आक्रमक आमदार आहे. मात्र, पक्षातून बाहेर पडलेल्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची पोकळी भरून काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या मुद्द्यांवर कोणता पक्ष अधिक सक्रिय राहतो, यावर आगामी राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. त्यामुळे अकोल्यातील वर्चस्वाची लढाई केवळ कोणाकडे किती नेते आणि नगरसेवक आहेत, यावर ठरणार नाही. जनतेशी असलेली नाळ कोण अधिक घट्ट ठेवतो, यावरच दोन्ही शिवसेनांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT