Kapil Patil  Sarkarnama
मुंबई

Bhiwandi LokSabha Constituency : सरपंच ते केंद्रीयमंत्री प्रवास करणाऱ्या कपिल पाटलांना हॅटट्रिकची संधी

Loksabha Election 2024 : आगरी कोळी समाजातून आलेले कपिल पाटील यांची राजकीय कारकीर्द ही सरपंच ते केंद्रीयमंत्री अशी आहे. अभ्यासू आणि विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून कपिल पाटील यांची ओळख आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे.

Anand Surwase

Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाचे कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडीचे खासदार असून, सध्या ते केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री आहेत. पाटील हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झाले होते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांतून ते भाजपमध्ये दाखल झाले आणि शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी मोदीलाटेत कपिल पाटील यांचाही विजय झाला होता. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला होता. कपिल पाटील यांना 4 लाख 11 हजार 070, तर त्यांचे विरोधक विश्वनाथ पाटील यांना 3 लाख 01 हजार 620 मते मिळाली होती.

कपिल पाटील यांना 2019 मध्ये दुसऱ्यांदा भिवंडीमधून संधी देण्यात आली. याही निवडणुकीत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा पराभव करत दुसऱ्यांदा दिल्ली गाठली. पाटील यांना 5 लाख 23 हजार 583, तर काँग्रेसचे टावरे यांना 3 लाख 67 हजार 254 मते मिळाली होती. दुसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदी यांनी पाटील यांना मंत्रिपदाची संधी दिली. जुलै 2021 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळविस्तारात केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व कमी करणे आणि भाजपचा विस्तार करणे यासाठी कपिल पाटील यांना मंत्रिपद देण्यात आले. (Bhiwandi LokSabha Constituency)

आगरी कोळी समाजातून आलेले कपिल पाटील (Kapil Patil) यांची राजकीय कारकीर्द ही सरपंच ते केंद्रीयमंत्री अशी आहे. अभ्यासू आणि विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून कपिल पाटील यांची ओळख आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. शिवाय ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर पाटील यांनी काम केल्याने त्यांचा विकासाचा दृष्टिकोन व्यापक आहे. केंद्रीयमंत्री झालेले पाटील हे ठाणे जिल्ह्यातील पहिलेच उमेदवार ठरले होते. पंचायत राज खात्याचे मंत्रिपद मिळाल्यानंतर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात, यासाठी ते प्रयत्नशील असतात. दरम्यान, संघटनावाढीचे काम पाहता आगामी लोकसभा निवडणुकीतही पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पाटील यांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत पाटील यांना विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

नाव (Name)

कपिल मोरेश्वर पाटील

जन्मतारीख (Birth date)

5 मार्च 1961

शिक्षण (Education)

पदवीधर

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

सयंमी आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे कपिल पाटील हे आगरी कोळी (Agri koli) समाजातून आलेले राजकारणी आहेत. 5 मार्च 1961 रोजी भिवंडी तालुक्यातील दिवेअंजूर गावात कपिल पाटील यांचा जन्म झाला. मोरेश्वर पाटील असे त्यांच्या वडिलांचे, तर मजीबाई मोरेश्वर पाटील असे त्यांच्या मातोश्रींचे नाव आहे. पाटील यांच्या पत्नीचे नाव मीनल पाटील असे आहे. कपिल पाटील यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

भिवंडी

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

भाजप

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

केंद्रीय राज्यमंत्री असलेले कपिल यांच्या राजकारणाचा प्रवास हा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या पंचायत राजच्या तिन्ही व्यवस्थांमधून झाला आहे. 1988 ला पहिल्यांदा ते दिवेअंजूरचे सरपंच झाले. त्यानंतर 1992 मध्ये त्यांना पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1997 ला भिवंडी पंचायत समितीचे सभापती झाले. सभापती असताना त्यांनी तालुक्यात विकासकामांचा झपाटा लावला. आगरी कोळी समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला. त्यांचा जनसंपर्क अधिकच प्रभावी होत गेला. पुढे 2002 मध्ये ते ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 2009 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या काळात त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आपल्या कामाची छाप पाडली. या काळात त्यांनी दापोली कृषी विद्यापीठाचे संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडली. ठाणे जिल्हा बँकेच्या चेअरमनपदावरही ते कार्यरत होते. राष्ट्रवादीने पाटील यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षही केले होते.

दरम्यान, ठाणे जिल्हा बँकेवरून काही वाद निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीने कपिल पाटील यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदावरून हटवले होते. त्याचदरम्यान पुढे लोकसभा निवडणूक जाहीर झाली. राष्ट्रवादीमध्ये संघर्ष करावा लागत असल्याने कपिल पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मदतीने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारीही दिली. पहिल्याच निवडणुकीत कपिल पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा पराभव केला आणि ते संसदेत पोहोचले. पुढे 2019च्या निवडणुकीतही दुसऱ्यांदा भिवंडीमधून संधी देण्यात आली. याही निवडणुकीत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा पराभव करीत दुसऱ्यांदा दिल्ली गाठली. पाटील यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकारचा मंत्रिमंडळविस्तार झाला. त्यामध्ये कपिल पाटील यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली. आता पुन्हा एकदा भाजपकडून कपिल पाटील यांनाच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे. उमेदवारी मिळाल्यास पाटील विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज असतील. यावेळी त्यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

कपिल पाटील यांचा राजकारणातील प्रवास हा सरपंचपदापासूनचा ते केंद्रीयमंत्रिपदापर्यंत झाला आहे. त्यामुळे विविध पदांवर काम करीत असताना त्यांनी विकासकामांसह सामाजिक कामांवर विशेष भर दिला आहे. मतदारसंघात पक्के रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांसह उपलब्ध करून दिल्या. तसेच सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून त्यांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले. पंचायत राज मंत्रालयाच्या विविध योजनांचा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मतदारांना लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील 24 तास वीजपुरवठा होण्यासाठी 4500 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून घेतला आहे. येथील बहुसंख्य असलेल्या आगरी समाजाची नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होती. त्यासाठी त्यांनी संसदेत आवाज उठवला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याची मागणी केली होती. कोरोनाकाळात ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे, कोविड सेंटर उभारणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. लॉकडाऊनच्या काळात अन्न-धान्याचा पुरवठा, अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम केले. नुकतेच त्यांनी भिवंडीमध्ये माता व बाल रुग्णालय मंजूर करून त्यासाठी 58 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांचा पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

पाटील यांना या निवडणुकीत श्रमजीवी आदिवासी संघटना आणि कुणबीसेना यांचा पाठिंबा मिळाला होता. त्याचाही फायदा त्यांना झाला. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. जागावाटपात भिवंडी मतदारसंघ भाजपला सुटला होता. निवडणूक शिवसेना-भाजप युतीने एकत्र लढली होती. त्यामुळे पाटील यांना या निवडणुकीत शिवसेनेचा मोठा फायदा मिळवता आला. शिवसेनेचे नेते सुरेश म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्याविरोधात केलेले बंड थोपवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले होते. याशिवाय काँग्रेस उमेदवार टावरे यांच्याकडे या मतदारसंघात कार्यकर्त्यांचे पुरेसे पाठबळ नसल्याचेही पाहायला मिळाले होते. पाटील हे मोदी सरकारने केलेली विकासकामे आणि नवीन आश्वासने घेऊन जनेतपुढे गेले होते. पुलवामा हल्ला प्रकरणाची सहानुभूती, मोदीलाटेचा प्रभाव याचाही फायदा पाटील यांना झाला.

काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने विश्वनाथ पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्याचा फटका काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार सुरेश टावरे यांना बसला होता, तर भाजपचे नेते कपिल पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातील विश्वासू उमेदवार मानले जातात. त्यामुळे फडणवीस यांनी पाटील यांच्या पाठीमागे ताकद लावली होती. त्यांनी मतदारसंघात दोन जाहीर सभाही घेतल्या होत्या. त्यामुळे पाटील यांना विजय सोपा झाला आणि त्यांनी काँग्रसेचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा पराभव करीत दुसऱ्यांदा संसद गाठली.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

भिवंडी मतदारसंघात मुस्लिम मतदारांनंतर आगरी समाजाचे प्राबल्य जास्त आहे. कपिल पाटील हे आगरी समाजातून येतात. त्यामुळे मतदारसंघात त्यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या जनसंपर्काच्या कक्षा अधिकच रुंदावलेल्या आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारलेले आहे. मतदारसंघात ते सातत्याने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असतात. या माध्यमातून मतदारांच्या संपर्कात राहण्याचा ते नेहमीच प्रयत्न करताना दिसून येतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

कपिल पाटील हे उच्चशिक्षित आहेत. ते सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करताना दिसून येतात. पंचायत राज मंत्रालयाच्या योजनांची माहिती, मतदारसंघातील विकास कामे या संदर्भातील माहिती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवत असतात. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती ते सोशल मीडियावर शेअर करतात. राजकीय घडामोडींबाबत आपली मते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनी भिवंडीमध्ये आयोजित बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानंतर हिंदूंनी वेळेवर सावध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करताना आपण गाफिल राहिलो तर तिरंग्यावर चंद्र दिसेल, असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. भिवंडी तालुक्यातील जलजीवन योजनेतून पूर्ण झालेल्या जलकुंभाचे उद्घाटन करत असताना त्यांनी सरपंच ठेकेदार असेल तर विकासकामे चांगली होतील, असे वादग्रस्त विधान केले होते. मुळात सरपंचांना अशा प्रकारचा ठेका घेता येत नसल्याने त्यांचे हे विधान चर्चेचा विषय ठरले होते. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना पाटील यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणतेच काम उरले नाही. त्यांची कामे तर शरद पवारच करतात, अशी बोचरी टीका केली होती.

राजकीय गुरू कोण? (Political Godfather/Guru)

शरद पवार

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

कपिल पाटील हे भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जातात. भिवंडी मतदारसंघात आगरी कोळी मतदारांची संख्या जास्त असून मतदारसंघातील जातीय समीकरणे पाहता पाटील यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जाते. मागील 10 वर्षांत पाटील यांनी मतदारसंघात केलेली विविध विकासकामे घेऊन ते मतदारांसमोर जातील. याशिवाय आगामी निवडणुकीत राम मंदिराचा हादेखील भाजपसाठी प्रचाराचा मुद्दा असणारा आहे. त्याचा फायदाही कपिल पाटील यांना होऊ शकतो. दुसरीकडे, भाजपकडे सध्या कपिल पाटील यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नाही. त्यातच ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो. याशिवाय ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य आहे. सध्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट सहभागी झाल्यामुळे आगामी निवडणुकीत कपिल पाटील यांना मताधिक्यासाठी फायदा होणार आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

कपिल पाटील हे सध्या केंद्रात मंत्री आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार म्हणून त्यांचेच नाव पुढे येत आहे. मात्र राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) बाजूने तयार झालेल्या सहानुभूतीचा फटका कपिल पाटील यांना बसू शकतो. सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वात या मतदारसंघातील लढत चुरशीची होऊ शकते. तसेच कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष आहे. हा संघर्ष विकोपाला गेल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत कथोरे यांच्या नाराजीचा पाटील यांना फटका बसू शकतो, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

राज्यातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकनाश शिंदे गट आणि अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीची ताकद वाढल्याचे दिसत आहे. परंतु महायुतीकडून अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. दरम्यान, भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच महायुतीची वाढलेली ताकद पाहता कपिल पाटील निवडून येतील, असा विश्वासही भाजपकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना उमेदवारी नाकारली जाणार नसल्याची चर्चा सध्या होत आहे. दरम्यान, काही कारणास्तव अथवा भाजपच्या धक्कातंत्रामुळे कपिल पाटील यांना उमेदवारी नाकारल्यास पक्ष देतील ती जबाबदारी ते स्वीकारतील.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT