Dombivli Road Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Dombivli : डोंबिवलीतील 'झगमगाटा'चा खर्च कोण करतंय? शिंदे, चव्हाण की...

Kalyan Dombivli Corporation : सण, राजकीय कार्यक्रम आणि नेत्यांचे वाढदिवसानिमित्त सहा महिन्यांपासून विद्युत रोषणाई

Bhagyashree Pradhan

Kalyan Dombivli Politics : शिवसेनेत बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकारणातील वजन कैक पटीने वाढले. त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंचाही ठाण्यासह इतर भागात वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील डोंबिवली कायम सजलेली असते.

येथील चौकात गेल्या काही महिन्यांपासून विद्युत रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळत आहे. मात्र या झगमगाटाचा खर्च नेमकं कोण करतंय? मुख्यमंत्री शिंदे, श्रीकांत शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते की याचा भार महापालिकेवर पडतोय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

गेल्या वर्षभरापासून सण, उत्सव असो किंवा राजकीय कार्यक्रम अथवा वाढदिवस, यानिमित्त डोंबिवली कायमच सजलेली असते. डोंबिवलीतील महत्त्वाच्या भागांना विद्युत रोषणाई करण्यात येत असल्याचे चित्र आहे. डोंबिवलीतील चौकात बॅनर्स मोठ्या प्रमाणात लागलेले असतात. तर मुख्य रस्त्यांवर विद्युत रोषणाई असते.

आता पुन्हा खासदार श्रीकांत शिंदेंचा वाढदिवस आहे. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही वाढदिवस आहे. या कार्यक्रमांमुळे डोंबिवलीचा मानपाडा रोड रोषणाईने सजवला आहे. मात्र या रोषणाईसाठी लागणाऱ्या वीजेचा भार कोणावर आहे. याचे बिल महापालिकेवर फाडले जाते की, कोण्या कार्यकर्त्याकडे पाठवले जाते, याची स्पष्टता व्हावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

फडके रोडचा झगमगाट

डोंबिवलीतील फडके रोड हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा रस्ता राजकीय सभांसाठी प्रसिद्ध आहे. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेले गणेश मंदिर याच रत्यावर आहे. दिवाळी पहाट, गुढीपाडवा आणि फ्रेंडशिप डे सारख्या खास दिवसांना येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा रस्ता सर्वच राजकीय पक्षांना महत्त्वाचा ठरतो. या रस्त्यावर गणपती, नवरात्र, आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या वाढदिवस त्यानंतर दिवाळी, मग राम दिवाळी आणि आता खासदार श्रीकांत शिंदे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस यानिमित्त जवळपास सहा महिने या रस्त्यावर विद्युत रोषणाई आहे.

मानपाडा रोडवर सजावट

मानपाडा येथे शिवसेना शिंदे गटाची मध्यवर्ती शाखा आहे. त्या शाखेत खासदार श्रीकांत शिंदेंचे (Shrikant Shinde) जनसंपर्क कार्यालयसुध्दा आहे. मानपाडा रोडवरही सर्व सणासुदीनिमित्त विद्युत रोषणाई केली जाते. आता पुन्हा खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्युत रोषणाई केलेली आहे. संपूर्ण रस्त्यावर होणाऱ्या या रोषणाईचा खर्च कोण करते, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

बॅनर्सला ऊत

एका पाठोपाठ एक सण उत्सव, राजकीय कार्यक्रम आणि नेत्यांचे वाढदिवस असे कार्यकम कार्यकर्त्यांसाठी पर्वणीच ठरते. या विविध प्रसंगांचे निमित्त करत चौका-चौकात मोठ्या प्रमाणात बॅनर्स झळकलेले दिसतात. एक फलक काढला की लगेच त्या ठिकाणी दुसरा फलक लागलेला पाहायला मिळतो. त्यामुळे डोंबिवलीतील सर्व चौकांचे विद्रुपीकरण झाले तरी पालिकेचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होऊ लागाल आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डोंबिवलीतील या झगमगाटाबाबत महावितरणच्या काही अधिकाऱ्यांशी सरकारनामाने चर्चा केली. अधिकारी म्हणाले, कोणाच्या मीटरवरून वीज घेणे हे बेकायदेशीर ठरते. मात्र महापालिकेच्या खांबावरुन वीज घेतली जात असेल तर त्याचा भार महापालिकेवर येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठेही रोषणाई किंवा फलक लावायचा असेल तर महापालिकेला त्याबाबत पात्र द्यावे लागते, या नियमाकडेही त्यांनी लक्ष वेधले.

यानंतर याबाबत राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. विद्युत रोषणाई करण्यासाठी पालिकेची परवानगी घेतली का, या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी बोलणे टाळले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील झगमगाटाचा भार कुणावर आहे, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT