Konkan Sarkarnama
मुंबई

Konkan Development Jumla : 'मालदीव नको; चला कोकण बघू!' हा तर भाजपचा भुलभुलैया...

Maharashtra Politics : मुंबई-गोवा महामार्ग 12 वर्षांपासून रखडलेला, तर चिपी विमानतळाची दुर्दशा

Sunil Balasaheb Dhumal

संजय परब

Konkan Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी चुकीची विधाने केल्यामुळे सध्या मालदीव आणि लक्षद्वीपला बॉयकॉट करून, “चला कोकण बघू” असे नवीन कोकणप्रेम सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी सुरू केले आहे. मात्र हा केवळ भुलभुलैया असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कुठल्याही मूलभूत सुविधा नसताना देशी-परदेशी पर्यटकांना तुटके रस्ते, राहण्याची गैरसोय, आरोग्य सुविधांच्या नावाने बोंब असलेला उघडा पडलेला कोकण दाखवायचा का? असा रोखठोक सवाल यानिमित्ताने केला जात आहे.

रत्नागिरी हा जिल्हा फलोत्पादन आणि सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर करून अनेक वर्षे झाली. पण, दोन्ही जिल्ह्यांना काँग्रेस, शिवसेना आणि आता भाजपनेसुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावून मागास ठेवले आहे. यातील सगळ्यात भयंकर बाब म्हणजे या दोन्ही जिल्ह्यांसह कोकण आणि गोव्याला जोडणारा मुंबई गोवा महामार्ग 12 वर्षे झाली तरी अजून पूर्ण झालेला नाही. मात्र गेल्या एका तपात या महामार्गावरून जाताना अपघातात तीन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय कायमचे जायबंदी झालेल्या प्रवाशांची संख्या 30 हजार असल्याचे भयानक सत्य माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे.

मुंबई-गोवा हा 550 किलोमीटरचा महामार्ग 12 वर्षांत पूर्ण होत नाही. पण, त्याचवेळी यापेक्षा दुप्पट बाराशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तीन-एक वर्षांत होतो. यातून भाजप असो किंवा अन्य कोणत्याही पक्षांना मुंबई-गोवा हायवे व्हावा किंवा कोकणच्या पर्यटनाला चालना मिळावी, अशी राजकीय इच्छाशक्तीच नाही. यामुळे मालदीव नको, चला कोकण बघू या फक्त हवेत सांगायच्या गोष्टी झाल्या, बाकी शून्य, असे सत्य चित्र समोर 'आ'वासून उभे आहे.

कुठलाही भाग हा विकसित करायचा असेल तर त्या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत, हा साधा सरळ उपाय आहे. आज असंख्य अडचणींना सामोरे जात कोकण रेल्वे धावत आहे, त्याचे सारे श्रेय हे दिवंगत समाजवादी नेते आणि माजी केंद्रीयमंत्री मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रचंड इच्छाशक्तीचे एक जितेजागते उदाहरण आहे.

त्याचबरोबर आज फक्त 100 रुपयांत कोकण प्रवास करता येतो, तो ई. श्रीधरन या कोकण रेल्वेच्या मुख्य अभियंत्याच्या गरुडभरारी कामामुळे. मात्र, आज राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना तसेच वेगवान रस्ते निर्माणकर्ते म्हणून ओळख असणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सोबत असूनदेखील मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नसेल तर ‘चला कोकण बघू’ हा केवळ भुलभुलैया ठरतो!

कोकणला पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत 720 किलोमीटरचा अथांग समुद्रकिनारा लाभला आहे. फक्त समुद्रकिनाराच नाही तर त्याला आपल्या कुशीत घेणारा सह्याद्री पाठीराखा म्हणून उभा आहे. याच सह्याद्रीला मायेची ऊब देणारी जैवविविधता फक्त याच भागातून पुढे केरळला जाऊन मिळते.

समुद्राला धावत जाऊन मिळणाऱ्या नद्या, खाड्यांचे चमचमते बॅकवॉटर, नारळ-पोफळीच्या डौलदार बागा, आंबा-काजूने बहरलेले डोंगर असं पर्यटनाला साजेसे सगळे काही निसर्गनिर्मित दान पदरात आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीच्या अभावाने कोकण बाजूला उघडा पडला आहे. असा उघडा कोकण बघून स्वतःची दमछाक झालेला पर्यटक पुन्हा या भागात कसा फिरकेल, हा लाखमोलाचा सवाल उपस्थित केला जात आहे.

संपूर्ण कोकणात आज मालवण हा एकच भाग पर्यटनदृष्ट्या थोडा विकसित झाला आहे. मात्र यात कुठल्याच सरकारचे योगदान नाही. लोकांनी लोकांसाठी चालवलेला हा पर्यटन विकास आहे. काही वर्षांपूर्वी सागर कुलकर्णी नावाच्या एका अवलियाने या भागात ठाण मांडून पर्यटन, सागरी खेळ, आदरातिथ्य या गोष्टी मालवणी माणसांकडून गिरवून घेतल्या. त्यात महिला, युवकांनी पुढाकार घेत आपल्या राहत्या घरांची हॉटेल करीत आणि सागरी खेळांचे साहित्य आणत पर्यटकांना मायेचा जीव लावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज या भागात घराघरात पर्यटकांना सुविधा दिल्या जातात. पण, हा एकमेव भाग वगळता बाकी ठिकाणी सुंदर निसर्ग असून पर्यटन विकास शेकडो मैल दूर आहे. यावर विधिमंडळात वर्षानुवर्षे चर्चा होतात, पण 'जैसे थे' परिस्थिती आहे. असे असताना मालदीवशी बिघडले म्हणून चला कोकण बघू असं चित्र उभे करीत असतील तर ती फसवणूक आहे.

कोकणातील (Konkan) चिपी विमानतळाची दुर्दशा झालेली आहे. विमानतळ आहे, प्रवासी आहेत आणि पर्यटकसुद्धा. पण विमानांचा पत्ताच नाही. वेळकाळ नसल्याने तिकिटे काढून डोक्याला ताप झाल्याच्या असंख्य घटना चिपीबाबत झाल्या आहेत. चिपीपासून एक तासाभराच्या अंतरावर गोव्यात मोपासारखा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा असताना आज चिपीकडे साफ दुर्लक्ष झाले आहे.

चिपीत उतरणारा पर्यटक किमान कोकणात फिरेल, अशी अपेक्षा होती. पण, तो मोप्याकडे सरकत असेल तर तो गोव्यातच फिरणार, कोकणात तो येणारच नाही. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे निसर्गदत्त कोकण आज मागास राहिला आहे. असा मागास भाग कोणाला बघायला आवडेल? परिणामी चला कोकण बघू हा केवळ भुलभुलैयाच ठरतो.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT