Dhananjay Munde-Walmik Karad-Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

Walmik Karad Surrender : वाल्मिक कराड शरण आला; पण धनंजय मुंडेंचं काय? चौकशी कशी होणार?; आव्हाडांचा सवाल

Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे कॅबिनेटमध्ये असणार ना. उद्या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्याला बंगल्यावर बोलावलं तर प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना जावं लागतं, त्यामुळे ताकदीच्या नेत्याला मंत्रिमंडळात ठेवणार असाल तर संतोष देशमुख खून प्रकरणाची चौकशी कशी पुढे जाईल?

Vijaykumar Dudhale

Mumbai, 31 December : पोलिस आणि जनतेच्या दबावामुळे वाल्मिक कराड शरण आला आहे. पण, धनंजय मुंडे यांचे काय? पोलिसांनी त्यांचे काम केले आहे. आता सरकारने सरकारचं काम करावं. स्वतः मुंडेंनी ‘वाल्मिक कराड हा माझा खास माणूस आहे,’ असे विधान केलेले आहे. एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना कशी होईल. हा माझा प्रश्न आहे, त्यामुळे हे सर्व अस्वस्थ करणारे आहे, अशी खंत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

संतोष देशमुख खूनप्रकरणामुळे गेली काही दिवसांपासून चर्चेत आलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) आज पुणे सीआयडीच्या कार्यालयात शरण आला आहे. त्यानंतर माध्यमाशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमाशी बोलताना धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याचा पुनरुच्चार केला आहे.

धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मंत्रिपदीच का ठेवावं. प्रकाश सोळुंखे एवढं का घाबरतात? ते कॅबिनेटमध्ये असणार ना. उद्या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्याला बंगल्यावर बोलावलं तर प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना जावं लागतं, त्यामुळे ताकदीच्या नेत्याला मंत्रिमंडळात ठेवणार असाल तर संतोष देशमुख खून प्रकरणाची चौकशी कशी पुढे जाईल, असा सवाल आव्हाड यांनी केला.

महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगारी होऊन गेले. पण, एखादा गुन्हेगार गाडी घेऊन पोलिस ठाण्यात आला आहे, असे वाल्मिक कराडच्या माध्यमातून प्रथमच घडत आहे. तो स्टाईलमध्ये पोलिस ठाण्यात आला. त्यातून ‘तुम्ही काय पकडताय मला. मीच येतोय तुमच्याकडे’ असा चुकीचा ट्रेंड निर्माण होऊ पाहतोय. एक तर पोलिस त्याच्या दबावाखाली असतील. पण, त्यातून सर्वसामन्यांना धक्का बसतोय. त्यांच्यासोबत असणाऱ्या दोघांनी सांगितले की, ते दोन दिवसांपासून पुण्यात होते. म्हणजे माझी माहिती एक टक्कासुद्धा चुकीची नव्हती, असा दावा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला.

संतोष देशमुख खून प्रकरणाच्या फिर्यादीत वाल्मिक कराड याचे नाव नाही. देशमुख यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार वाल्मिक कराड याचे नाव खून प्रकरणात न घेतल्याने तो न्यायालयातही गेला आहे. त्यामुळे हे सर्व संशयास्पद आणि धक्कादायक आहे. कराड स्वतः सांगतोय की, ‘मी खुनातील आरोपी नाही. माझ्यावर खंडणीचा एक खोटा गुन्हा दाखल आहे. मला अटकपूर्व जामीन मिळाला असता,’ असे कराड स्वतः सांगत आहे. एखाद्या गुन्हेगारीची ही कुठली भाषा? या प्रकरणामुळे पोलिसांविषयी एक संशय निर्माण झालाय. हे काय करताहेत, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

संतोष देशमुख खून प्रकरणातील मूळ गुन्हेगार पकडायचे असतील तर बापू आंधळे खून प्रकरण सीआयडीने ताब्यात घ्यावं. त्या प्रकरणात गोळी मारणारा कोण होता? त्याला गोळी मारायला कोणी लावली? त्या खून प्रकरणात बबन गीते यांच्यासह इतर नावं द्यायला कोणी सांगितलं? ते विचारावे म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल, नेमकं बीडमध्ये काय सुरू होतं. त्या प्रकरणावेळी महाजन नावाचे पोलिस अधिकारी होते, तेच आता याही प्रकरणात पोलिस अधिकारी आहेत, असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला.

बापू आंधळे खून आणि बबन गीते

आमदार आव्हाड म्हणाले, वाल्मिक कराड हा त्यांचा दररोज उठबस करायचा, चहाचा माणूस. त्याचं नाव त्यांनी वाल्मिकअण्णा लिहून ठेवलं, वाल्मिक कराड नाही. त्या प्रकरणातही आंधळे कुटुंबीय फिर्यादीत नाव देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांची नाव घेतली नाहीत. त्यांचा प्लॅन असा होता की बबन गीते विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत परळीत दिसता कामा नये. आजही तो फरारी आहे. तो गाडी चालवत सीआयडीकडे येईल, एवढी तर त्याची ताकद नाही. पण हे सर्व प्रकरण राजकीय प्रभावाखाली किती आहे, हे बघितल्यानंतर महाराष्ट्राच्या मनात धडकी बसेल आणि त्यातून राज्यवस्था कुठे चालली आहे, असा प्रश्न निर्माण होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT