Eknath Shinde politics : शांतीगिरी महाराज यांनी नाशिक मतदारसंघातून निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. त्यांनी काल सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत भाजपचे काही नेतेदेखील होते. त्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराज आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली.
या भेटीत श्री शांतीगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवारी मिळावी अशी चर्चा केली आहे. या वेळी त्यांच्या समर्थकांनी शांतीगिरी महाराज यांचा प्रभाव आणि नाशिक मतदारसंघात सुरू केलेला प्रचार आदींची सविस्तर माहिती दिली. श्री शांतिगिरी महाराज उमेदवारी मिळाल्यास शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हा शिवसेनेचा शिंदे गटातील स्थानिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनादेखील मोठा धक्का आहे. त्यामुळे या भेटीची विशेष चर्चा सुरू आहे.
शांतीगिरी यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीदेखील उमेदवारीबाबत चर्चा केली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. शांतीगिरी नाशिक लोकसभा मतदारसंघातून यंदा निवडणूक लढवू इच्छितात. त्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांना प्रचारालादेखील लावले आहे. या पार्श्वभूमीवर शांतीगिरी यांना कुठल्यातरी पक्षाची उमेदवारी अपेक्षित आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी त्यांनी राजकीय भेट घेतली. यासंदर्भात उद्या पुन्हा भेट होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे शांतीगिरी महाराज यांना एकनाथ शिंदे गट महायुतीची उमेदवारी देणार का ही चर्चा जोमात आहे. शांतीगिरी महाराज यांच्या या भेटीने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे टेन्शन वाढले आहे.
खासदार गोडसे यांच्या विरोधात पक्षातील काही नेते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काम करीत आहेत. खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला खोडा घालण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे लपून राहिलेले नाही. शांतीगिरी महाराज यांचे शिंदे यांची राजकीय भेट थेट हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उमेदवारीवर बालंट ठरणार आहे. त्यामुळे नाशिकच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील खळबळ उडाली आहे. शांतीगिरी महाराजांची भेट किती फलदायी ठरते, हे येत्या एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शांतीगिरी महाराज यांनी २०१९ मध्ये औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केली होती. त्यावेळी त्यांना अपेक्षित मते मिळालेली नाहीत. या पार्श्वभूमीवर यंदा भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर भागवत कराड हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. शांतीगिरी यांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास त्याचा औरंगाबाद मतदारसंघात डॉ. कराड यांना लाभ होईल, असा एक दृष्टिकोन आहे.
त्यामुळे शांतीगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये भाजपच्या नेत्यांना अधिक रस होता. शांतीगिरी आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीवेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडदेखील उपस्थित होते हे विशेष. एकंदरच शांतीगिरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते अचानक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.