Daund, 09 March : चुरशीने लढल्या गेलेल्या दौंड पंचायत समितीत आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला निसटते बहुमत मिळाले होते, त्यामुळे भाजपची सत्ता येणार हे उघड सत्य होते.
मात्र, महायुती म्हणून दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याची चर्चा रंगली होती. पण दौंड पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भाजपकडे सभापती आणि उपसभातिपद आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मागील पंचवार्षिकमधील सत्ता उलथवून लावून कुल यांनी पंचायत समितीवरही आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
दरम्यान, दौंड (Daund) पंचायत समितीच्या सभापतिपदी सुखदेव चोरमले व उपसभापतिपदी अमृता गिरमकर यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच भाजपची सत्ता आली आहे.
दौंड पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या एका बैठकीत या निवडी करण्यात आल्या. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे यांनी काम पाहिले. चदा सदस्यीय पंचायत समिती भारतीय जनता पक्षाचे (BJP) ८ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ६ सदस्य, असे बलाबल आहे.
सभापतिपदासाठी (Sabhapati) भाजपकडून सुखदेव सोनबा चोरमले (खामगाव गण) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रवीण किसन दिवेकर (वरवंड गण) यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापतिपदासाठी अमृता अभिमन्यू गिरमकर (देऊळगाव राजे गण) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनिषा संतोष ताकवणे (पारगाव गण) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवीण दिवेकर आणि मनीषा ताकवणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे सभापती व उपसभापतिपदावर भाजपचे अनुक्रमे सुखदेव सोनबा चोरमले आणि अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी यांनी जाहीर केले.
दौंड पंचायत समितीचे सभापतिपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. तालुक्यातील १४ गणांपैकी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या राहू गणातून निवडून आलेल्या भाजप उमेदवार शुभांगी किसन शिंदे, खामगाव गणातून निवडून आलेले सुखदेव सोनबा चोरमले व यवत गणातून निवडून आलेल्या तेजस्विनी दत्ता पडळकर यांच्यात सभापतिपदासाठी चुरस होती.
पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानुसार सुखदेव चोरमले यांची या पदासाठी निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार राहुल कुल यांच्या हस्ते सभापती सुखदेव चोरमले यांचा तर भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांच्या हस्ते उपसभापती अमृता गिरमकर यांचा सत्कार करण्यात आला.
खामगाव, देऊळगावराजे गटाला संधी
नूतन सभापती सुखदेव चोरमले हे खामगाव गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करून १०८४ मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. नूतन उपसभापती अमृता गिरमकर या देऊळगाव राजे गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून १०० मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत.
राहुल कुलांनी सत्तेचा समतोल साधला
पंचायत समितीचे सभापतिपद राखीव असल्याने दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील खामगाव गणातून निवडून आलेले सुखदेव चोरमले यांना त्या पदावर संधी मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून उपसभापतिपदावर तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगाव राजे गणातून निवडून आलेल्या अमृता गिरमकर यांना संधी देत समतोल साधण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.