Pune News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने आज आणखी एक पाऊल पुढे टाकत प्रभागांमधील आरक्षणाची सोडत काढली. हे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अनेकांना अपेक्षित असे आरक्षण न पडल्याने त्यांना सर्वसाधारण गटातून (खुल्या जागेवर) निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे.
महिलांचे आरक्षण (Reservation) गेल्याने नगरसेविकेचे पती, मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. वडगाव शेरी, खडकवासला मतदारसंघात फार काही बदल न झाल्याने याठिकाणच्या प्रस्थापितांना दिलासा मिळाला आहे. तर कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसरमध्ये रस्सीखेच वाढल्याने राजकीय गणिते बदलणार आहेत.
प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण न पडल्याने उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राहूल भंडारे यांना याच प्रभागातून सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागेल किंवा दुसऱ्या प्रभागात संधी शोधावी लागणार आहेत.
प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी-
प्रभाग क्रमांक 4 खराडी वाघोली,
प्रभाग क्रमांक 5 कल्याणीनगर वडगाव शेरी,
प्रभाग क्रमांक 6 येरवडा-गांधीनगर या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सर्व माजी नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित राहिलेले आहेत. पठारे, मुळीक, टिंगरे या सर्वांना त्यांच्या त्यांच्या हक्काच्या प्रभागात सोईचे आरक्षण पडले आहेत.
प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर वाकडेवाडी- ओबीसी सर्वसाधारण ऐवजी ओसीबी महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे आदित्य माळवे यांना घरातील महिलेला निवडणूक लढविण्यासाठी तयार करावे लागेल किंवा ते स्वतः सर्वसाधरणमधून निवडणूक लढवू शकतात. येथे दोन सर्वसाधारण जागा असल्याने सतीश बहिरट, दत्ता बहिरट, नीलेश निकम, रेश्मा भोसले येथून निवडणूक लढवू शकतात.
प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडी- अनुसूचित जातीमधून सुनीता वाडेकर किंवा परशुराम वाडेकर, अर्चना मुसळे या माजी नगरसेवकांना सोईचा प्रभाग झाला आहे. सर्वसाधारण गटातून आनंद छाजेड, प्रकाश ढोरे, सनी निम्हण यासह अन्य इच्छुक असल्याने येथे मोठी रस्सीखेच असणार आहे.
प्रभाग क्रमांक 9 सूस बाणेर- पाषाण येथील दोन ओबीसी महिलांचे आरक्षण गेले आहे. अनुसूचित जमाती आरक्षणामुळे राजश्री काळे येथे निवडणूक लढवू शकतात. ओबीसी महिलांचे आरक्षण गेल्याने माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर यांची अडचण झाली आहे. कळमकर यांचे पत्नी गणेश कळमकर हे ओबीसी सर्वसाधरणमधून निवडणूक लढवू शकतात.
बाबूराव चांदेरे, प्रमोद निम्हण, राहूल बालकडकर अमोल बालडकर, लहू बालवडकर हे सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवू शकतात. येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगली रस्सीखेच आहे. मयूरी कोकाटे, पूनम विधाते, रोहिणी चिमटे या देखील निवडणुकीच्या रिंगणात महिला जागेवर असू शकतात.
प्रभाग क्रमांक 10 बावधन- भुसारी कॉलनी
प्रभाग क्रमांक 11 रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर
प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी
प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी
प्रभाग क्रमांक 12 शिवाजीनगर मॉडेल कॉलनी- येथे ओबीसी (OBC) महिला आरक्षण नसल्याने नीलिमा खाडे यांच्या ऐवजी घरातील पुरुष उमेदवाराला निवडणूक लढवावी लागेल किंवा पक्षाला अन्य पर्याय बघावे लागले. अनुसूचित जातीमधून स्वाती लोखंडे या पुन्हा निवडणूक लढवू शकतात.
सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण गटातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. ज्योत्स्ना एकबोटे, निवेदिता एकबोटे, संदीप काळे, शैलेश बडदे, सुनील पांडे, मुकारी अलगुडे, बाळासाहेब बोडके, दयानंद इरकल यांना निवडणूक लढण्याची संधी आहे.
प्रभाग क्रमांक 13 पुणे स्टेशन- जयजवान नगर येथे सर्वसाधारण गटाची एकच जागा असल्याने अरविंद शिंदे, संजय भोसले एकमेकांसमोर निवडणूक लढवू शकतात.
प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क-घोरपडी पेठ- मुंढवा येथे सर्वसाधरणमधून उमेश गायकवाड, बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, ओबीसीतून किशोर धायरकर, अनुसूचित जातीमध्ये हिमाली कांबळे यांची संधी कायम आहे. भाजपशिवाय अन्य पक्षाना याठिकाणी पुरुषांना निवडणूक लढवता येणार नाही.
प्रभाग क्रमांक 15- हा केशवनगर मांजरी साडेसतरानळी हा नवीन गावांचा प्रभाग आहे. येथे अनुसूचित जाती महिला, ओबीसी महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण महिलेची जागा आरक्षित. येथून सर्वच नवीन चेहरे निवडणुकीत असतील.
प्रभाग क्रमांक 16- हडपसर सातववाडी येथे ओबीसी महिला आरक्षण पडल्याने योगेश ससाणे यांची अडचण झाली. उज्वला जंगले, मारुती तुपे, वैशाली बनकर यांच्या जागा सुरक्षित आहेत.
प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी येते राष्ट्रवादीचे अशोक कांबळे, आनंदा आलकुंडे यांची अडचण झाली आहे. आमदार चेतन तुपे यांचा हा प्रभाग असून, येथून सर्वसाधारण गटातून तुपे यांचा मुलगा इशान यांना संधी मिळू शकते. हेमलता मगर यांचा संधी मिळू शकते.
प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंखेविहारमध्ये प्रशांत जगताप, धनराज घोगरे स्वतंत्र निवडणूक लढवू शकणार आहेत. तसेच ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे रत्नप्रभा जगताप, कालिदां मंत्री यांनाही संधी मिळू शकते.
प्रभाग क्रमांक 19 कोंढवा कौसरबाग प्रभागातून माजी नगरसेवकांची संधी कायम आहे.
प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ-बिबवेवाडी येथून राजेंद्र शिळीमकर ओबीसी मधून निवडणूक लढवू शकतात, मानसी देशपांडे सर्वसाधारण लढवतील, तर उर्वरित दोन जागांवर शहरातील आमदारांचा मुलगा आणि मुलगी निवडणूक लढवू शकतात अशी स्थिती आहे.
प्रभाग क्रमांक 21 मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क येथे श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले या दोघांपैकी एकाचा पत्ता कट होणार आहे. महिलांमधून मनीषा चोरबेले, राजश्री शिळीमकर यांना निवडणूक लढवता येईल. अनुसूचित जातीच्या जागेवर सर्वच पक्षांकडून उमेदवाराची शोधाशोध सुरु आहे.
प्रभाग क्रमांक 22 काशेवाडी-डायसप्लॉट येथे अनुसूचित जाती महिलेसाठी जागा आरक्षित झाल्याने माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागेल. अनुसूचित जाती महिलांमध्ये कविता वैरागे, इंद्रा बागवे, हीना मोमीन, ओबीसीमधून संदीप लडकत किंवा त्यांची पत्नी, अनिल दामजी, जावदे खान, रफिक शेख, दिनेश रासकर हे निवडणूक लढवू शकतात. सर्वसाधारण महिलेतून अर्चना पाटील, दिलशाद शेख, बिना आगरवाल यांच्यात लढत होऊ शकते. सर्वसाधारण गटातून तुषार पाटील, रफीक हबीब शेख, कनौव चव्हाण आदी आमनेसामने येऊ शकतात.
प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठे नाना पेठ- मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले विशाल धनवडे यांना संधी आहे. गेल्या काही महिन्यातील गुन्ह्यांमुळे आंदेकर कुटुंबावर पोलिसानी कारवाई केली आहे. हे संपूर्ण कुटुंब गजाआड असल्याने या भागातून त्यांच्याकडून निवडणूक कोण लढवणार हे स्पष्ट झालेले नाही. अनुसूचित जाती प्रवर्गातून सुधीर जानजोत निवडणूक लढवू शकतात. सर्वसाधारण गटातून वीरेंद्र किराड, संजय मोरे, चेतन मोरे आदी निवडणूक लढवू शकतात.
प्रभाग क्रमांक 24 मधील अनुसूचित जातीचे आरक्षण नसल्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पल्लवी जावळे यांची अडचण झाली आहे. त्यांना अन्य प्रभागात जागा शोधावी लागणार आहे. ओबीसी महिला आरक्षणामुळे रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी तेथून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्धी भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध धंगेकर अशी लढत होण्याची शक्यता कमी आहे. धंगेकर यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास बिडकर विरुद्ध धंगेकर अशी निवडणूक होऊ शकते.
प्रभाग क्रमांक 25 हा भाजपचा प्रमुख बालेकिल्ला आहे येथे भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे. कुणाल टिळक, स्वरदा बापट, बापू मानकर या नवीन चेहऱ्यांसह जुन्यांमध्ये कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक 26 घोरेपडी पेठ, गुरुवार पेठ, समताभूमीमध्ये मध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामुळे विष्णू हरिहर किंवा त्यांची भावजय विजयालक्ष्मी हरिहर यांच्यापैकी एकजण निवडणूक लढवेल. अनुसूचित जातीच्या जागेवर रवी पाटोळे, गणेश कल्याणकर, रूपेश पवार आणि हरिहर यांच्यात लढत होऊ शकते. सर्वसाधारण महिला गटातून कमल व्यवहारे निवडणूक लढवू शकतात. सर्वसाधारण गटात सम्राट थोरात, अजय खेडेकर, अजित दरेकर, संजय बालगुडे, मिलिंद काची, नारायण चव्हाण हे आमनेसामने असण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ-पर्वती अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. त्या ठिकाणी माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांची जागा धोक्यात आली आहे. तिथे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. ओबीसी महिला आरक्षण पडल्याने येथून दिवंगत माजी नगरसेवक महेश लडकत यांच्या कुटुंबातून कोण निवडणूक लढवणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेही येथून निवडणूक लढवतील.
प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत हिंगणे खुर्द येथे दोन सर्वसाधारण जागा आहेत. त्यामुळे आनंद रिठेंची अडचण झाली आहे. शंकर पवार यांनाही खुल्या गटात संधी आहे. तर प्रिया गदादे पाटील, अनिता कदम एकमेकींच्या विरोधात निवडणूक लढू शकतात.
प्रभाग क्रमांक 31 मयूर कॉलनी-कोथरूड या ओबीसी, सर्वसाधारण महिलांसाठीचे दोन व सर्वसाधारण एक असे आरक्षण पडले आहेत. त्यामुळे येथे आरक्षण काय पडले यापेक्षा उमेदवारी कोणाला मिळणार यासाठी इच्छुकांमध्ये लढाई असणार आहे.
प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगर येथे अनुसूचित जाती महिला, ओबीसी सर्वसाधरण, महिला सर्वसाधारण व सर्वसाधरणा असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे या प्रभागात सचिन दोडके, दिलीप बराटे, किरण बारटक्के, प्रदीप धुमाळ, दिपाली धुमाळ, सायली वांजळे हे एकमेकांच्या समोर येणार आहेत.
प्रभाग क्रमांक 33 शिवणे-खडकवासला-धायरी पार्टमध्ये अश्विनी पोकळे यांची जागा कायम आहे. हा नवीन गावांचा प्रभाग असल्याने सर्वसाधारण गटातून अनेक जण इच्छुक आहेत.
प्रभाग क्रमांक 34 नऱ्हे-वडगाव बुद्रूक- धायरी या प्रभागात दोन जागा सर्वसाधारण महिला, तर उर्वरित दोनमध्ये सर्वसाधारण व ओबीसीची जागा राखीव आहे. त्यामुळे राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, राजश्री नवले, नीता दांगट यांना पुन्हा संधी मिळू शकते. याप्रभागात आरक्षणापेक्षा गावकी भावकीचे राजकारण महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक 35 या ठिकाणी ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्याने महिलांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांना सर्वसाधारण महिला येथून संधी मिळू शकणार आहे. पुरुषांमध्ये श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप यांना ही संधी मिळू शकते.
प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर पद्मावती अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांचा मार्ग सोपा झाला आहे. ओबीसी महिला आरक्षण पडल्याने अश्विनी कदम यांना दिलासा. त्यामुळे आबा बागूल यांना सर्वसाधारण प्रवर्गातून किंवा अन्य प्रभागातून संधी शोधावी लागणार आहे. महेश बावळे यांनाही दिलासा मिळाला आहे.
प्रभाग क्रमांक 36 धनकवडी कात्रज डेअरी माजी नगरसेवक नगरसेवक विशाल तांबे, वर्षा तापकीर यांना अडचण नाही. ओबीसी सर्वसाधारण पुरुष बाळा धनकडवडे, अश्विनी भागवत यांना खुल्या गटातून लढवावे लागणार आहे.
प्रभाग क्रमांक 38 पाच सदस्यीय प्रभागातून तीन महिलांसाठी आरक्षित आहेत. दत्ता धनकवडे, युवराज बेलदरे हे ओबीसीतून लढणार असणार आहेत. वसंत मोरे, प्रकाश कदम, स्वराज बाबर यांचा मुलगा खुल्या प्रवर्गातून लढतील.
प्रभाग क्रमांक 39 मध्ये प्रकाश कदम किंवा त्यांच्या मुलाला भाजपमध्ये निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. त्यामुळे बाळा ओसवाल, वर्षा साठे, रूपाली धाडवे हे भाजपच्या तिन्ही माजी नगरसेवकांसह कदम यांच्या मदतीने पॅनल तयार केले जाईल.
प्रभाग क्रमांक 40 कोंढवा येवलेवाडी- येथे अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण आरक्षण असल्याने या चारही ठिकाणी वीरसेन जगताप, वृषाली कामठे, रंजना टिळेकर व संगीता ठोसर यांच्या जागा सुरक्षित आहेत. या प्रभागात गंगाधर बधे यांच्या भाजप प्रवेशामुळे या प्रभागातील वातावरण तापले आहे. वसंत मोरे यांचा मुलगा या प्रभागातून निवडणूक लढू शकतो.
प्रभाग क्रमांक 41 नाना भानगिरे, संजय घुले, प्राची अल्हाट हे २०१७ चे नगरसेवक सुरक्षित आहेत. या प्रभागात नाना भानगिरे आणि फारुक इनामदार हे एकमेकांच्या समोरासमोर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
कोथरूडमध्ये आरक्षणापेक्षा उमेदवारीसाठी लढाई
कोथरूड भागातील प्रभागांमध्ये पडलेल्या आरक्षणाचा फार मोठा परिणाम येथील माजी नगरसेवकांवर होणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.